Raksha Khadse News : नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या टर्मचा रविवारी शपथविधी सोहळा संपन्न झाला. मोदींसोबत ७१ जणांनी शपथ घेतली. मंत्रिमंडळात राज्यातील एकूण ६ खासदारांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीत 14 जागा गमावल्यानंतरही भाजपने महाराष्ट्राच्या वाट्याला सहा मंत्रिपदं दिली आहेत. यामध्ये भाजपला चार तर मित्रपक्षांना दोन जागा मिळाल्या आहेत.
भाजपने महाराष्ट्रातून नितीन गडकरी आणि पियुष गोयल या दोन ज्येष्ठ नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला आहे. याशिवाय भाजपच्या रक्षा खडसे आणि मुरलीधर मोहोळ या आणखी दोन खासदारांचाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. तसेच शिवसेनेचे प्रतापराव जाधव आणि रिपाइंचे रामदास आठवले यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आलेली आहे.
२०१४ ते २०२४पर्यंत लोकसभेत एकाच बाकावर बसणाऱ्या डॉ. प्रितम मुंडे आणि रक्षा खडसे यांची लोकसभेतली मैत्री आता तुटली आहे. त्याचं कारण प्रितम मुंडेंना पक्षाने तिकिट नाकारलं होतं. त्यांच्याऐवजी पंकजा मुंडेंना तिकीट दिलं होतं. परंतु पंकजांचा बीड लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. दुसरीकडे रक्षा खडसे ह्या मात्र तिसऱ्यांदा खासदार झाल्या. त्यामुळे पक्षाने त्यांना केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री म्हणून कम करण्याची संधी दिली आहे.
रक्षा खडसेंना मंत्रिपदाची संधी मिळाल्यानंतर त्यांची जीवलग मैत्रीण माजी खासदार प्रितम मुंडे यांनी एक भावनिक पोस्ट शेअर करत रक्षा खडसेंना शुभेच्छा दिल्या. आपली मैत्री दृष्ट लागण्यासारखी होती, असं म्हणत दोघींनी सोबत घालवलेल्या क्षणांची आठवण मुंडेंनी करुन दिली आहे.
10 वर्ष ही खूप काही देऊन गेली , बहुतेक चांगलंच. मंत्रिपदावर विराजमान झाल्यानंतर जल्लोष साजरा करण्यापेक्षा आपली मैत्रीण संसदेत नाही म्हणून गहिवरून येणारी तू ! रक्षा;आजच्या एवढ्या स्वार्थी जगात आपली मैत्री दृष्ट लागण्यासारखीच आहे.. पक्षातील निवडणूक निरीक्षकांना एकमेकांच्या शिफारसी करणाऱ्या, स्वतःच तिकीट जाहीर झालं की नाही यापेक्षा मैत्रिणीचं तर झालं न हे बघणाऱ्या, निकालाच्या दिवशी स्वतःचे उतार चढाव हाताळताना देखील एक नजर कायम दुसरीच्या निकालाकडे ठेवणाऱ्या. १० वर्षे सतत संसदेत शेजारी बसणाऱ्या, पक्षाच्या बैठकांना एकत्रच जाणाऱ्या, दिल्लीत एकाच मजल्यावर राहणाऱ्या, एकमेकींना राजकीय घटनांपासून कपड्यांच्या रंगसंगतींपर्यंत सल्ले देणाऱ्या आपण. संसदेतली विधेयकांची चर्चा करणाऱ्या आपण, अनेक देवदर्शनांना देखील एकत्रच गेलो!
१० वर्षातला प्रवास तुमच्या सगळ्यांच्याच सोबतीने खूप छान झाला, पण तुझं स्थान माझ्या आयुष्यात खास होतं आणि नेहमी राहील. आजच्या या स्वार्थी जगात निस्वार्थ मैत्री जपणारी माझी मैत्रीण रक्षा तुला या यशाच्या कोटी कोटी शुभेच्छा आणि तुझ्या हातून आजपर्यंत घडलं तसंच चांगलं कार्य घडो, सतत लोकसेवा तुझ्या हातून घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..
अशी पोस्ट माजी खासदार डॉक्टर प्रितम मुंडे यांनी इन्स्ट्राग्रामवरुन शेअर केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.