नवी दिल्ली : लसीकरण मोहिमेतंर्गत दिल्या जाणाऱ्या जीवनरक्षक लशी सर्व बालकांना मिळण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) आग्नेय आशियातील देशांना केले आहे. यात लशीचे सर्व किंवा काही डोस न घेतलेल्या आणि मुलींना गर्भाशयमुखाच्या कर्करोगाची लस देण्यावर लक्ष्य केंद्रित करण्यात यावे, असेही सुचविले आहे.
‘डब्लूएचओ’च्या आग्नेय आशियाच्या प्रादेशिक संचालिका साईमा वाझेद म्हणाल्या, की लशीचा एकही डोस न दिलेल्या किंवा काही डोस राहिलेल्या मुलामुलींचे संपूर्ण लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आपण ठेवले पाहिजे. कोरोना साथीच्या काळात लसीकरणाची कोलमडलेली मोहीम पूर्वपदावर आणायला हवी. सर्व मुलींचे गर्भाशयाच्या कर्करोगापासून संरक्षण करायला हवे. त्याचप्रमाणे, २०२६ पर्यंत आग्नेय आशियातून गोवर आणि रुबेलाचे उच्चाटन करण्यासाठी प्रयत्नांची गती वाढवायला हवी. गेल्या ५० वर्षांत लसीकरण मोहिमेमुळे या प्रदेशातील लक्षावधी लोकांना चांगले, प्रदीर्घ, समृद्ध आणि अधिक उत्पादक जीवन जगण्याची संधी दिल्याबद्दलही त्यांनी सर्व तज्ज्ञ, लसीकरण मोहिमांचे आयोजक, स्वयंसेवक याचे आभार मानले.
त्या म्हणाल्या,‘‘ आग्नेय आशियातील जवळपास २७ लाख मुलांना अजूनही कोणतीही लस मिळालेली नाही. इतर सहा लाख जणांचे २०२३ मध्ये अंशत: लसीकरण झाले आहे. ही मुले लसीकरणापासून वंचित का राहिली, हे लक्षात घेऊन त्यांचे लवकरात लवकर लसीकरण करण्याची गरज आहे. लशीमुळे टाळता येण्याजोग्या कोणत्याही आजारापासून एकाही मुलाचा मृत्यू होता कामा नये. त्याचबरोबर सर्व किशोरवयीन मुलींनाही गर्भाशयमुखाच्या कर्करोगाची लस मिळायला हवी.’’
आग्नेय आशिया पोलिओच्या संसर्गातून मुक्त झाला आहे. पाच देशांनी गोवर व रूबेलावर मात केली असून सहा देशांनी लसीकरणातून हेपटायटिस बी वर नियंत्रण मिळविले आहे. घटसर्प, धनुर्वात आणि डांग्या खोकला (डीटीपी३) च्या लशीचे तीन डोस ९० टक्के मुलांना देण्यात सात देशांनी सातत्य राखले आहे. मात्र, आग्नेय आशियाला २०२३ पर्यंत गोवर, रुबेलाचे उच्चाटनाचे ध्येय गाठण्यात अपयश आहे.
- साईमा वाझेद, प्रादेशिक संचालिका, डब्लूएचओ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.