अपघाताची माहिती समजताच चित्रदुर्ग ग्रामीण पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी धाव घेवून मोटारीत अडकून पडलेल्या तिन्ही मुलांना तातडीने उपचासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
बेळगाव / बंगळूर : भरधाव मोटारीने थांबलेल्या ट्रकला मागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात (Car-Truck Accident) चौघे जागीच ठार, तर तीन मुले गंभीर जखमी झाली आहेत. सोमवारी (ता. ४) सकाळी ७.१५ च्या दरम्यान पुणे-बंगळूर महामार्गावरील (Pune-Bangalore Highway) चित्रदुर्गजवळ ही घटना घडली.
मृतांपैकी दोघे बाप-लेक विष्णू गल्ली वडगाव येथील असून, दोघे पती-पत्नी तुमकूर येथील आहेत. तिन्ही जखमी मुलांवर चित्रदुर्ग जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती देखील चिंताजनक आहे. अपघाताची नोंद चित्रदुर्ग ग्रामीण पोलिस (Chitradurga Rural Police) ठाण्यात झाली आहे.
शमशुद्दीन मक्तुमसाब शेख (वय ५७), तबरेज शमशुद्दीन शेख (१२, दोघेही रा. धामणे रोड, विष्णू गल्ली, वडगाव), खलील शरिफ (४६), मलिका खलिल शरिफ (४५, दोघेही रा. तुमकूर) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. रिहान शरिफ (वय १२), रेहमान (वय १०) आणि महजबीन (वय ७, तिघेही रा. तुमकूर) अशी जखमींची नावे आहेत.
याबाबत पोलिस आणि सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, मलिका हिचे माहेर विष्णू गल्ली वडगाव असून, त्या गेल्या चार दिवसांपूर्वी पती आणि आपल्या तीन मुलांसह माहेरी भावाकडे आल्या होत्या. काल (ता. ३) रात्री ते तुमकुरला परत जाण्यासाठी मोटारीतून रात्री १ च्या सुमारास बेळगावहून रवाना झाले. त्यांच्यासोबत भाऊ शमशुद्दीन आणि मुलगा तबरेज यांच्यासह एकूण सात जण होते. खलिल हे मोटार चालवत होते.
सकाळी ७.३० च्या दरम्यान मल्लापूर- गोल्लरट्टी (चित्रदुर्गजवळ) आले असताना त्यांच्या मोटारीची महार्गाच्याकडेला थांबलेल्या ट्रकला धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की, मोटारीचा समोरील भागाचा चक्काचूर झाला. यात चौघेजण जागीच ठार झाले; तर तीन मुले जखमी झाली.
अपघाताची माहिती समजताच चित्रदुर्ग ग्रामीण पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी धाव घेवून मोटारीत अडकून पडलेल्या तिन्ही मुलांना तातडीने उपचासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. जखमींची प्रकृती देखील चिंताजनक असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, मृतांची ओळख पटल्यानंतर नातेवाईकांना संपर्क साधून माहिती देण्यात आली. त्याबरोबर नातेवाईकांनी चित्रदुर्गकडे धाव घेतली. जिल्हा रुग्णालयातील शवागारात शल्यचिकित्सा करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. शमशुद्दीन आणि तबरेज या बाप-लेकावर वडगाव येथील मुस्लिम स्मशानभूमीत; तर खलिफ आणि मल्लिका यांच्यावर तुमकुर येथील दफनविधी केला जाणार आहे.
घटनास्थळी चित्रदुर्गचे जिल्हा पोलिस प्रमुख धर्मेंद्र कुमार मीना यांनी भेट देऊन माहिती घेतली. महामार्गावर ट्रक उभा असल्याचे लक्षात न आल्याने व गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने मोटार आदळली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक एस. के. मंजुनाथ अधिक तपास करीत आहेत.
या महामार्गावर सतत असे भीषण अपघात घडत आहेत. लॉरीसह मोठी वाहने महामार्गावर थांबलेली असतात. वाहने थांबल्याचे भान न ठेवता भरधाव जाणाऱ्या गाड्यांच्या धडकेने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. अशी वाहने महामार्गावरून हटवावीत, तसेच थांबवणाऱ्यांना योग्य ती शिक्षा द्यावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.