Ghulam Nabi Azad Party Name : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी नव्या पक्षाची घोषणा केली आहे. त्यांच्या पक्षाचे नाव 'डेमोक्रेटिक आझाद पार्टी' असे घोषित करण्यात आले आहे. जम्मूमध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी नाव जाहीर केले आहे. आझाद यांनी गेल्या महिन्यात काँग्रेसला रामराम करत बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आज त्यांनी नव्या पक्षासह नावाची घोषणा केली आहे. पक्षाची घोषणा यापूर्वीच करायची होती. मात्र, नवरात्रीच्या शुभमूहूर्तावर याची घोषणा केल्याचं त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बोलताना आझाद म्हणाले की, पक्षाची विचारधारा नावासारखी असेल आणि सर्व धर्मनिरपेक्ष लोक त्यात सामील होतील असे स्पष्ट केले आहे. आझाद यांनी यापूर्वीच पक्षाचा अजेंडा स्पष्ट केला असून, यामध्ये जम्मू आणि काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करणे, स्थानिक लोकांसाठी जमीन आणि नोकऱ्यांचे हक्क सुरक्षित करण्यासाठी संघर्ष सुरू ठेवणे आदी मुद्द्यांचा समावेस आहे. मार्च 2022 मध्ये गुलाम नबी आझाद यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
आपल्याकडे जनतेला देण्यासारखे खूप काही आहे आणि ज्यांच्याकडे जनतेला देण्यासारखे काही नाही ते शिव्या देतात. आमच्या पक्षाची विचारधारा ही गांधींची विचारधारा आहे. आमची धोरणे जात आणि धर्मावर चालणार नसल्याचेही आझाद म्हणाले. राजकारणात आपल्याला सर्व धर्मांबद्दल आदर असून, आम्ही सर्व पक्षांचा आदर करतो. आमचे कोणाशीही राजकीय वैर नसल्याचे आझाद यांनी यावेळी स्पष्ट केले.
1973 मध्ये गुलाम नबी आझाद यांनी डोडा जिल्ह्यातील भालेसा ब्लॉक काँग्रेस कमिटीचे सचिव म्हणून राजकारणात प्रवेश केला होता. यानंतर त्यांची कार्यशैली पाहून काँग्रेसने त्यांची युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड केली होती. 1980 मध्ये त्यांनी महाराष्ट्रातून पहिली लोकसभा निवडणूक लढवली आणि त्यात विजयी पतका फडकवली होती. त्यानंतर 1982 मध्ये त्यांचा केंद्रीय मंत्री म्हणून मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला.
आझाद यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील दुसऱ्या UPA सरकारमध्ये देशाचे आरोग्यमंत्री म्हणूनही काम पाहिले आहे. नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये ते संसदीय कामकाज आणि नागरी विमान वाहतूक मंत्रीही होते. आझाद जम्मू-काश्मीर प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष असताना विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 21 जागा जिंकल्या होत्या. या विजयामुळे काँग्रेस राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा राजकीय पक्ष म्हणून उदयास आला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.