भुवनेश्वर : ‘यास’ चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर चारच महिन्यांत ओडिशाला ‘गुलाब’ चक्रीवादळाने धडक दिली आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या या चक्रीवादळाने आज संध्याकाळी सहाच्या सुमारास किनारपट्टीला स्पर्श केला.
या वादळामुळे आंध्र प्रदेशच्या उत्तर आणि ओडिशाच्या दक्षिण किनारपट्टीवर ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. हे वादळ रात्री नऊच्या सुमारास पुढे सरकले असून रात्रीतून तीव्रता कमी होत त्याचे कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर होण्याचा अंदाज आहे. चक्रीवादळातील वाऱ्यांचा वेग ताशी ७५ ते ८५ किलोमीटर इतका असल्याचे हवामान विभागाने सांगितले.
किनारपट्टीवरील ११ जिल्ह्यांमधील सर्व शैक्षणिक संस्था उद्या (ता. २७)बंद ठेवल्या जाणार आहेत. आज दिल्लीत असलेले मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेत वादळाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या तयारीचा आढावा घेतला. वादळामुळे किनारी भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. ओडिशा सरकारने दरडी कोसळण्याची शक्यता असलेल्या भागातून आधीच नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यास सुरुवात केली आहे. ओडिशा आपत्कालीन बचाव दलाची ४२ पथके नागरिकांच्या मदतीसाठी तैनात करण्यात आली आहेत. याशिवाय, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची २४ आणि अग्निशमन दलाची १०२ पथकेही सज्ज ठेवण्यात आली आहेत.
या चक्रीवादळामुळे या भागातील रेल्वे सेवा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. चक्रीवादळामुळे केंद्रपाडा, जगतसिंगपूर, पुरी, खोरधा, गंजम, नयागड, कंधमाल आणि कटक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. किनारपट्टीवरील भागात पुढील दोन दिवस अत्यंत मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे. समुद्र खवळल्याने एका बोटीतील सहा मच्छीमार पाण्यात पडले असून त्यांचा शोध सुरू आहे.
मोदींचे मदतीचे आश्वासन
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. या दोघांनाही मोदींनी केंद्र सरकारतर्फे सर्व प्रकारे मदत करण्याचे आश्वासन दिले.
महाराष्ट्रात पावसाचा इशारा
‘गुलाब’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात उद्या (ता. २७) आणि मंगळवारी (ता. २८) जोरदार पाऊस कोसळण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. चंद्रपूरमध्ये उद्या अत्यंत मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. तसेच, मुंबई, ठाणे, पालघरसह १७ जिल्ह्यांमध्ये जोरदार वाऱ्यांसह पाऊस कोसळू शकतो. सोमवारसाठी रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, नाशिक, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड, यवतमाळ आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.