पाळत ठेवण्यासाठी संभाव्य लक्ष्य म्हणून जगभरातील व्यक्तींच्या नावांची तयार केलेली यादी ‘लिक’ झाली असून यामध्ये चाळीस भारतीय पत्रकारांची नावे असल्याचे उघड झाले आहे.
नवी दिल्ली- पाळत ठेवण्यासाठी संभाव्य लक्ष्य म्हणून जगभरातील व्यक्तींच्या नावांची तयार केलेली यादी ‘लिक’ झाली असून यामध्ये चाळीस भारतीय पत्रकारांची नावे असल्याचे उघड झाले आहे. हे सर्व पत्रकार संवेदनशील विषयांवर काम करत होते. ‘द वायर’ या वृत्तसंस्थेने ही माहिती उघड केली आहे. एका अज्ञात संस्थेने ‘पिगॅसस’ स्पायवेअरचा वापर करून ही हेरगिरी केल्याचेही उघड झाले आहे.
भारतातील हिंदुस्तान टाइम्स, इंडिया टुडे, नेटवर्क १८, द हिंदू आणि इंडियन एक्स्प्रेस या वृत्त समूहांच्या वरिष्ठ पत्रकारांचे मोबाईल क्रमांक या यादीत असल्याचे दिसून आले आहे. यादीत नाव असलेल्या सर्वच व्यक्तींच्या मोबाईल अथवा इतर डिव्हाइसमध्ये सायबर हल्ला झाला नसला तरी त्याबाबत खात्रीशीर माहिती उपलब्ध झालेली नाही. एका खासगी संस्थेने केलेल्या डिजिटल न्यायवैद्यक विश्लेषणामध्ये मात्र १० पत्रकारांना लक्ष्य करण्यात सायबर हल्लेखोरांना यश आले आहे. पिगॅसस हे सॉफ्टवेअरची ‘एनएसओ’ या इस्रायली कंपनीकडून विक्री होते. मात्र, आपण केवळ देशांच्या सरकारांनाच विक्री करतो, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. ‘लिक’ झालेली माहिती ही कोणत्याही सरकारने लक्ष्य म्हणून निश्चित केलेल्या लोकांची नसावी, असा संशयही ‘एनएसओ’ने व्यक्त केला आहे.
फ्रान्समधील ‘फॉरबिडन स्टोरीज्’ आणि ॲम्नेस्टी इंटरनॅशनल या संस्थांच्या हाती सर्वप्रथम ही यादी लागली. त्यांनी ती ‘द वायर’ आणि जगभरातील १५ वृत्तसंस्थांना दिली. या सर्व संस्था ‘पिगॅसस प्रोजेक्ट’बद्दल माहिती मिळवत होत्या. त्यांच्या एकत्रित प्रयत्नांतून, १० देशांमधील १५७१ व्यक्तींच्या मोबाईल अथवा इतर डिव्हाइसमध्ये ‘पिगॅसस’ स्पायवेअर सोडून हेरगिरी केली जात असल्याचे उघड झाले आहे.
यादीत कोणाचा समावेश
‘द वायर’चे दोन संस्थापकांबरोबरच रोहिणी सिंह या सदर लेखिकेचेही नाव यादीत आहे. गृहमंत्री अमित शहा यांचे पुत्र जय शहा यांच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय असणाऱ्या निखिल मर्चंट यांच्या व्यावसायिक घडामोडींबाबत रोहिणी सिंह यांनी माहिती गोळा केली होती. याशिवाय, सुशांत सिंह (माजी पत्रकार, इंडियन एक्स्प्रेस), शिशिर गुप्ता, प्रशांत झा, राहुल सिंह (सर्व हिंदुस्तान टाइम्स ग्रुप), रितिका चोप्रा, मुझम्मिल जमिल (इंडियन एक्स्प्रेस), संदीप उन्नीथन (इंडिया टुडे), मनोज गुप्ता (टिव्ही १८), विजेता सिंह (द हिंदू), प्रेमशंकर झा, स्वाती चतुर्वेदी, सैकत दत्ता, परंजय ठाकुरता, स्मिता शर्मा, एस. एन.एम अब्दी यांचे ‘लक्ष्य’ म्हणून यादीत नाव आहे.
पिगॅसस आणि भारत
इस्राईलमधील ‘एनएसओ’ कंपनीने पिगॅसस या सॉफ्टवेअरची निर्मिती केली आहे. दूर अंतरावरील स्मार्ट फोन हॅक करून त्यातील सर्व माहिती याद्वारे काढून घेता येते. हे सॉफ्टवेअर कोणत्याही खासगी कंपनीला विकलेले नाही, तसेच सरसकट सर्वच देशांना विकले नाही, असाही त्यांचा दावा आहे. त्यांनी भारत सरकारला हे सॉफ्टवेअर विकले अथवा नाही, याबाबत माहिती मिळालेली नाही. मात्र, अनेक भारतीय पत्रकारांची नावे यादीत असल्याने तशी शंका व्यक्त होते आहे. या सॉफ्टवेअरचा वापर केल्याचे सरकारने मान्य अथवा अमान्य केले नसले तरी याद्वारे बेकायदा पाळत ठेवली जात असल्याचे वारंवार नाकारण्यात आले आहे.
केंद्र भूमिकेवर ठाम
सॉफ्टवेअरच्या माध्यमातून भारतीय पत्रकारांची माहिती मिळविण्यात आल्याच्या वृत्तानंतरही ‘कोणताही अनधिकृत प्रकार घडलेला नाही,’ हीच भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे. मूलभूत हक्क म्हणून आपल्या सर्व नागरिकांच्या गोपनीयतेचा अधिकार सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे,’’ असे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच सोशल मीडियावरील वैयक्तिक माहितीचे संरक्षण व्हावे यासाठीच माहिती तंत्रज्ञान (इंटरमिडिअरी गाइडलाइन्स अँड डिजिटल मीडिया इथिक्स कोड) कायदा २०२१ चे विधेयक तयार करण्यात आले आहे, असेही मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे.
कोणत्या देशातील किती?
१८० - जगभरातील पत्रकार आणि संपादक.
४८ - अझरबैजानमधील पत्रकार
३८ - भारतातील पत्रकार, यात पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करणाऱ्यांचा प्रामुख्याने समावेश
३८ - मेक्सिकोतील
१२ - यूएई,यात फायनान्शिअल टाइम्सच्या संपादकांचा आणि वॉल स्ट्रीट जर्नलच्या शोधपत्रकारिता करणाऱ्या पत्रकाराचा समावेश
(याशिवाय, हंगेरी, कझाकीस्तान, बहारीन, सौदी अरेबियातील पत्रकारांचीही समावेश)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.