Haryana Vidhansabha Election Result sakal
देश

Vidhansabha Election Result : भाजपच ‘हरियाना केसरी’; नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेसची जम्मू-काश्मीरमध्ये सत्ता

भाजपने सलग तिसऱ्यांदा विधानसभेचे मैदान मारले.

वृत्तसंस्था

श्रीनगर-चंडीगड - अगदी शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठावर्धक ठरलेली हरियानाच्या आखाड्यातील विधानसभेची ‘दंगल’ अखेर भाजपने जिंकत काँग्रेसला धोबीपछाड दिला. जम्मू-काश्मीरमध्ये मात्र नॅशनल कॉन्फरन्स- काँग्रेस आघाडीची सरशी झाली असून दशकभरानंतर येथे झालेल्या निवडणुकीत भाजपला मात्र अपेक्षेप्रमाणे यश मिळू शकलेले नाही. हरियानातील विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी देशभर फटाके फोडून मिठाई वाटत आनंदोत्सव साजरा केला. जम्मू- काश्मीरमध्येही काँग्रेसला फारशी चमक दाखविता आलेली नाही.

बहुचर्चित ३७० वे कलम रद्द करण्यात आल्याने त्याचा या निवडणुकीत भाजपला फायदा होईल असे बोलले जात होते, पण त्याचाही येथे फारसा परिणाम झाल्याचे दिसत नाही. येथे प्रादेशिक प्रश्नांचा आधार घेत निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या नॅशनल कॉन्फरन्सने जोरदार मुसंडी मारली.

यंदाच्या जम्मू- काश्मीरच्या निवडणुकीमध्ये इंजिनिअर रशीद यांची अवामी इत्तेहाद पार्टी, जमाते इस्लामी हे कट्टरपंथीय विचारांचे पक्ष देखील मैदानात उतरले होते पण त्यांनाही जनतेने नाकारल्याचे दिसून येते. नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष उमर अब्दुल्ला हे बडगाम आणि गंदरबाल या दोन्ही मतदारसंघांतून विजयी झाले आहेत. आता तेच राज्याचे मुख्यमंत्री होतील अशी घोषणा पक्षाकडून करण्यात आली आहे.

किश्तवाडमधील भाजपच्या एकमेव महिला उमेदवार शगून परिहार या विजय झाल्या आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव हा मतदारसंघ चर्चेचा विषय ठरला होता. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला हरियानात खातेही उघडता आलेले नाही. पक्षाने जम्मू- काश्मीरमधील डोडा या मतदारसंघात मात्र विजय मिळविला आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्ती यांच्या पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षालाही (पीडीपी) जबरदस्त फटका बसल्याचे दिसून येते. तत्पूर्वी अनेक माध्यमांच्या मतदानोत्तर कल चाचण्यांमध्ये त्यांचा पक्ष हा किंगमेकर ठरेल असा अंदाज वर्तविण्यात आला होता. प्रत्यक्षात मेहबूबा यांनाही जनतेने नाकारल्याचे दिसून येते.

‘पीडीपी’चा अखेर भ्रमनिरास

भाजपशी २०१४ मध्ये हातमिळवणी करून सत्ता स्थापन करणाऱ्या मेहबूबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाला (पीडीपी) याखेपेस तीनच जागांवर विजय मिळाला आहे. या पक्षाने तब्बल ८४ जागा लढविल्या होत्या. खुद्द मेहबूबा मुफ्ती यांनी २०१६ ते २०१८ या काळामध्ये मुख्यमंत्रिपद भूषविले होते, यावेळेस मात्र त्या निवडणुकीपासून दूर होत्या.

त्यांच्या कन्या इल्तिजा मुफ्ती या श्रीगुफवाडा- बिजबेहरा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या पण त्यांनाही पराभवाचे तोंड पाहावे लागले. या निवडणुकीत आपण किमान किंगमेकर तरी ठरू अशी मेहबूबा मुफ्ती यांना आशा होती पण ती देखील फोल ठरली.

सैनी पुन्हा मुख्यमंत्री शक्य

हरियानामध्ये भाजपकडून नेतृत्व बदल होण्याची शक्यता तशी कमीच आहे. अनिल विज यांचे नाव चर्चेत असले आणि तेदेखील उत्सुक असले तरी नायबसिंह सैनी यांच्याकडेच पुन्हा मुख्यमंत्रिपदाची धुरा सोपविली जाऊ शकते. तीव्र जातीय समीकरणामुळे सैनी यांची गच्छंती होण्याची शक्यता वर्तविली जात होती पण आता विजयामुळे त्यांचे स्थान सुरक्षित झाल्याचे बोलले जाते. सैनी हे अतिमागास घटकांचे प्रतिनिधित्व करतात त्यामुळे जाटबहुल राज्याची सूत्रे त्यांच्याकडे नको, अशी चर्चा पक्षांतर्गत दबक्या आवाजात सुरू झाली होती.

‘जेजेपी’, ‘आयएनएलडी’ साफ

हरियानात मागील विधानसभा निवडणुकीत जननायक जनता पक्ष (जेजेपी) किंगमेकर ठरला होता. यावेळेस मात्र पक्षाचा पूर्ण सुपडा साफ झाल्याचे दिसून येते. भारतीय राष्ट्रीय लोकदलास (आयएनएलडी) देखील फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नाही.

दोन्ही पक्षाचे सर्वेसर्वा अनुक्रमे दुष्यंत चौताला आणि अभयसिंह चौताला हे पराभूत झाले आहेत. जननायक जनता पक्षाने मागील निवडणुकीत दहा जागा जिंकल्या होत्या यावेळेस त्यांना एकही जागा जिंकता आलेली नाही. भारतीय राष्ट्रीय लोक दलास केवळ दोनच जागा मिळाल्या आहेत.

उमर अब्दुल्ला हेच राज्याचे मुख्यमंत्री होतील. राज्यातील जनतेने दहा वर्षांनंतर आमच्या बाजूने कौल दिला आहे. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे बळ अल्लाने आम्हाला द्यावे अशी प्रार्थना आम्ही करतो. आमचे सरकार हे पोलिस राज नव्हे तर जनतेचे राज असेल. सध्या तुरुंगात असलेल्या निर्दोष लोकांची मुक्तता करण्याचा प्रयत्न आम्ही करू. आमच्या राजवटीत माध्यमे मुक्त असतील. हिंदू आणि मुस्लिम समुदायांत विश्वासाचे नाते तयार करावे लागेल.

- फारुख अब्दुल्ला, नॅशनल कॉन्फरन्सचे सर्वेसर्वा

ऐतिहासिक निवडणूक प्रक्रिया यशस्वी करून दाखविल्याबद्दल निवडणूक आयोग, जम्मू-काश्मीरचे प्रशासन, सुरक्षा दले आणि राज्यातील जनतेचे आम्ही आभार मानतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच जम्मू- काश्मीरमध्ये शांततेत निवडणुका होतील असे आश्वासन दिले होते आणि ते प्रत्यक्षातही आणले.

- अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

अनेक मतमोजणी केंद्रांमध्ये ईव्हीएम मशिनची बॅटरी ९९ टक्के होती. ही साधारणतः ६० ते ७० टक्के एवढी राहते. ज्या ईव्हीएमची बॅटरी ९९ टक्के होती. त्या मशिनमधील निकाल भाजपच्या बाजूने लागले तर ज्या मशीनची बॅटरी ६० ते ७० टक्के होती त्या मशिनमधील निकाल काँग्रेसच्या बाजूने लागले. हे होऊ शकत नाही. हरियानात डबल इंजिनचे सरकार असून या मतमोजणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर केंद्र व राज्य सरकारचा दबाव होता हे स्पष्टपणे दिसून येते.

- जयराम रमेश, काँग्रेसचे सरचिटणीस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT