Rahul Gandhi sakal
देश

Rahul Gandhi : ‘हिंदू’वरून तांडव;राहुल यांची मोदी, संघावर टीका

लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेतेपदावरून आज राहुल गांधी यांनी केलेल्या पहिल्याच भाषणामुळे सत्ताधारी आणि विरोधकांध्ये संघर्षाची ठिणगी पडली. ‘‘ स्वतःला हिंदू म्हणविणारे सतत हिंसा करतात आणि असत्य बोलतात,’’ या राहुल यांच्या विधानावर खुद्द पंतप्रधान मोदींनी आक्षेप घेत

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेतेपदावरून आज राहुल गांधी यांनी केलेल्या पहिल्याच भाषणामुळे सत्ताधारी आणि विरोधकांध्ये संघर्षाची ठिणगी पडली. ‘‘ स्वतःला हिंदू म्हणविणारे सतत हिंसा करतात आणि असत्य बोलतात,’’ या राहुल यांच्या विधानावर खुद्द पंतप्रधान मोदींनी आक्षेप घेत ‘‘ संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक ठरविले जात आहे,’’ असे प्रत्युत्तर दिले. ‘‘ हिंदू धर्म हा भाजपचा ठेका नाही आणि मोदी, भाजप आणि रा.स्व. संघ म्हणजे हिंदू नाही,’’ असा घणाघाती हल्ला राहुल यांनी चढविला. ‘पुढील निवडणुकांमध्ये गुजरातमध्ये तुम्हाला इंडिया आघाडी हटविणार’ असा इशाराही त्यांनी पंतप्रधानांना दिला.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान राहुल गांधींनी राष्ट्रपतींचे आभार मानण्याचा उल्लेख केला नाही. मात्र आपल्या तासाभराच्या भाषणात भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले. अभिभाषणावरील चर्चेला पंतप्रधान मोदी उद्या सायंकाळी उत्तर देणार आहेत. आजच्या भाषणादरम्यान ‘‘मोदींचा थेट देवाशी संपर्क असून ते अजैविक पंतप्रधान आहेत,’’ असे सातत्याने व्यक्तिगत स्वरूपाचे जोरदार हल्ले चढवून राहुल गांधी यांना त्यांना अक्षरशः डिवचले.

पंतप्रधान मोदींना लक्ष्य करण्याच्या या प्रकारांमुळे संतप्त झालेल्या सत्ताधारी बाकांवरून राहुल गांधींच्या भाषणात अडथळे आणण्याचा झालेला प्रयत्न आणि विरोधी बाकांवरील काँग्रेससह अन्य पक्षांच्या खासदारांकडून त्यावर आक्रमकपणे घेण्यात आलेला आक्षेप त्यामुळे सभागृहातील वातावरण तापले होते. विरोधी पक्षनेता या नात्याने राहुल गांधींची आजची शैली विलक्षण आक्रमक आणि पंतप्रधान मोदींना डिवचणारी होती. त्यांचे पहिले भाषण ऐकण्यासाठी मातुःश्री सोनिया गांधी व भगिनी प्रियांका गांधी या लोकसभेच्या प्रेक्षक सज्जामध्ये उपस्थित होत्या.

पंतप्रधानांकडून हस्तक्षेप

विरोधी पक्ष नेत्यांचे भाषण होत असताना पंतप्रधानांनी सभागृहात उपस्थित राहण्याच्या संसदीय संकेतांचे त्यांनी पालन केले. पंतप्रधान मोदी हे राहुल गांधींचे भाषण सुरू होताच सभागृहात दाखल झाले. त्यावेळी सत्ताधारी बाकांवरून भारत माता की जय अशा घोषणांनी त्यांचे स्वागत झाले. परंतु, विरोधी पक्षनेते पदावरील पहिल्या भाषणादरम्यान राहुल गांधींनी टोकदार हल्ले केल्यामुळे त्यांना रोखण्यासाठी पंतप्रधान मोदींना चक्क दोन वेळा उभे राहून हस्तक्षेप करावा लागला.

त्यांच्याच शेजारी बसलेले संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांना देखील दोनदा आणि गृहमंत्री अमित शहा यांना तब्बल सहा वेळा उभे राहून संसदीय नियमावलीचा दाखला देत राहुल गांधींना रोखण्याचा प्रयत्न करावा लागला. याशिवाय, कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, वने व पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू, वाणिज्यमंत्री, पीयुष गोयल, कायदा राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनीही उभे राहून राहुल गांधींना थांबविण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर राहुल गांधींच्या भाषणामुळे संतप्त झालेले संपूर्ण मंत्रिमंडळातील सदस्य आणि सत्ताधारी खासदार उभे राहिले होते.

राहुल गांधी हे भाजपला हिंसेसाठी जबाबदार ठरवीत आहेत. सभागृहामध्ये कोठेही नियमाचे पालन होताना दिसत नाही. अशा पद्धतीने सभागृहाचे कामकाज चालू शकत नाही.

- अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

राहुल गांधी ‘एमएसपी’बाबत चुकीचे वक्तव्य करत आहेत. काँग्रेसच्या काळामध्ये त्यांनी शेतकऱ्यांना ‘एमएसपी’ दिला का? सध्या ‘एमएसपी’च्या आधारेच खरेदी होते.

- शिवराजसिंह चौहान, केंद्रीय कृषिमंत्री

सीमेवर देशाचे संरक्षण करताना हुतात्मा झालेल्या अग्निविरास केंद्र

सरकार एक कोटी रुपयांची भरपाई देते. राहुल हे सभागृहाची दिशाभूल करत आहेत.

- राजनाथसिंह, संरक्षणमंत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT