कोलकता : हावडा येथे रामनवमीच्या दिवशी झालेल्या दंगलीला भाजप आणि अन्य कट्टरपंथीय संघटना जबाबदार असल्याचा आरोप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज केला आहे. या वेळी त्यांनी नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहन केले आहे.
दरम्यान, भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी तृणमूल काँग्रेसचे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. कालच्या घटनेला प्रशासनच जबाबदार असल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला आहे. दरम्यान, गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यपाल सीव्ही आनंदा बोस यांना फोन करून घटनेची माहिती घेतली.
हावड्यातील काझीपाडा भागात काल रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान हिंसाचार उसळला. याप्रकरणी आतापर्यंत ३५ हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून संशयितांची धरपकड केली जात आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, की कालची हावड्यातील घटना दुर्देवी आहे.
ही घटना घडवणारे हिंदू नव्हते ना मुस्लिम. भाजपसह बजरंग दल आणि अन्य कट्टरपंथीय संघटना शस्त्रांसह या हिंसाचारात सामील झाल्या. या घटनेत अनेकांच्या मालमत्तांचे नुकसान झाले असून त्याची भरपाई दिली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा दाखविल्याचा दावा त्यांनी केला. हिंसाचार घडवून आणणाऱ्याविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला. भाजपने राज्यात जातीय दंगल घडवून आणण्यासाठी अन्य राज्यांतून गुंड आणले.
शेवटच्या टप्प्यात मिरवणुकीचा मार्ग का बदलला आणि एका समुदायाला टार्गेट करण्यासाठी आणि हल्ला करण्यासाठी आडवळणाचा मार्ग का निवडला? असा सवाल बॅनर्जी यांनी केला. अन्य गटावर हल्ला करून कायद्याच्या कचाट्यातून सहीसलामत बाहेर पडू, असे जर त्यांना वाटत असेल तर एक दिवस लोक तुम्हाला सत्तेतून पायउतार केल्याशिवाय राहणार नाहीत, असे ममता म्हणाल्या.
भाजप नेत्यांकडून तृणमूलवर हल्लाबोल
भाजपकडून तृणमूल काँग्रेसकडून होणारे आरोप फेटाळून लावण्यात आले आहेत. पश्चिम बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुकांत मजूमदार म्हणाले, तृणमूल काँग्रेस खोटे बोलत आहे. कारण आम्ही ज्या मार्गाने गेलो तो चुकीचा रस्ता नव्हता. हावडा मैदानापर्यंत जाण्याची परवानगी होती आणि तो एकमेव मार्ग होता.
कालची स्थिती पाहून असे वाटते की भारतात असे दिवस आले की, आपण ठराविक भागातच रामनवमीची मिरवणूक काढू शकता आणि अन्य ठिकाणी जाऊ शकत नाही. भाजपचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते सुवेंदू अधिकारी म्हणाले,
की गेल्यावर्षी हावडा येथे याच ठिकाणी दंगल उसळली होती. आपण कोणत्याही समुदायाला जबाबदार धरत नाही. हे प्रशासनाचे अपयश आहे. केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी ममता बॅनर्जी यांनी रोहिग्यांना रेड कार्पेट टाकले असून देश त्यांना कधीही माफ करणार नाही, अशा शब्दांत टीका केली.
हावडा येथे कडक बंदोबस्त
रामनवमीच्या दिवशी काझीपाडा भागात हिंसाचार घडल्याने तणावाचे वातावरण असताना आज काही भागात दगडफेकीचा प्रकार घडला. कालपासून तैनात केलेल्या बंदोबस्तात आणखी वाढ करण्यात आली. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या हावडा येथील स्थितीवर लक्ष ठेवून आहेत. त्या म्हणाल्या, की प्रशासनाकडून चांगले काम केले जात आहे.
परंतु काही पोलिस कर्मचारी भयभीत झाले आहेत. काही जण हलगर्जीपणा बाळगत आहेत. या संपूर्ण भागात बॅरिकेडिंग करायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली. काल हावडा येथील रामनवमीच्या दिवशी दोन गटात संघर्ष पेटला. यात अनेक गाड्या जाळण्यात आल्या. तसेच दुकानांची मोडतोड करण्यात आली. काझीपाडा भागात आज तणावपूर्ण शांतता आणि नियंत्रणात राहिली. मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.