नवी दिल्ली - मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत लोकसभेच्या एकूण जागांपैकी २३० जागांबाबत मतभेद किंवा तिढा निर्माण होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. हा तिढा आघाडीतील घटकपक्ष कसा सोडविणार, यावरच या जागावाटपावर होणाऱ्या या बैठकीचे यश अवलंबून राहणार आहे.
इंडिया आघाडीत असलेल्या २६ पक्षांच्या नेत्यांची बैठक मुंबईत होणार आहे. यात लोगो, झेंडा व जागा वाटपावरच प्रामुख्याने चर्चा होणार आहे. यात उत्तर प्रदेश (८०), महाराष्ट्र (४८), पश्चिम बंगाल (४२), बिहार (४०), पंजाब (१३) व दिल्लीतील ७ जागा अशा २३० लोकसभा मतदारसंघांवरून आघाडीच्या नेत्यांची कसोटी लागणार आहे.
या राज्यांमध्ये काँग्रेस पक्ष काहीसा कमजोर व आघाडीतील इतर पक्ष प्रबळ आहेत. या सहा राज्यांमधील २३० लोकसभा मतदारसंघात २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे केवळ १२ खासदार निवडून आले होते. पंजाबमध्ये सात, पश्चिम बंगालमध्ये २ तर उत्तरप्रदेश, बिहार व महाराष्ट्रात प्रत्येकी एक खासदार निवडून आला होता.
दिल्लीत तर सातपैकी एकाही जागेवर काँग्रेसला यश मिळविता आले नाही. या राज्यांमध्ये आघाडीतील इतर पक्ष उलट अधिक प्रबळ आहे. उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाचे पाच खासदार निवडून आले होते.
परंतु गेल्या विधानसभा निवडणुकीत ‘सप’ने मतांच्या टक्केवारीत चांगलीच वाढ केल्याने ‘सप’ अधिकाधिक जागांवर हक्क सांगण्याची शक्यता आहे. गेल्या विधानसभेत केवळ दोन टक्के मते काँग्रेसला मिळाली होती. या पार्श्वभूमीवर काँग्रेसला दोन आकडी जागा देण्यास आघाडीतील नेते तयार होणार नाहीत.
महाराष्ट्रातही गेल्या निवडणुकीत काँग्रेसतर्फे केवळ बाळूभाऊ धानोरकर यांनी चंद्रपूरची जागा राखली होती. शिवसेनेने किमान १८ जागांवर निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेससुद्धा १५ जागांवर हक्क सांगण्याची शक्यता आहे. यामुळे काँग्रेसला १० ते १५ जागांवरच समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे.
बिहारमध्ये जेडीयू व राजद हे प्रमुख पक्ष आहेत. जेडीयूच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तेथे किमान २०-२२ जागांवर जेडीयू व १० ते १५ जागांवर राजदचे उमेदवार उभे राहतील. त्यामुळे काँग्रेसला तेथेही केवळ ५-७ जागांवर समाधान मानावे लागणार आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूलचे २२ खासदार आहेत. त्यामुळे येथेही काँग्रेसला जास्तीत जास्त त्याग करावा लागण्याची शक्यता आहे.
काँग्रेस नेते तडजोड करणार का?
पंजाबमध्ये काँग्रेसचे सध्या ७ खासदार आहेत. तेथे आपचा एक खासदार आहे. त्यामुळे तेथे आपची सत्ता असल्याने ५०-५० चा फॉर्म्युलावर काम होण्याची अधिक शक्यता आहे. दिल्लीत आप व काँग्रेसचा एकही खासदार नसला तरी दिल्लीत आपची सत्ता असल्याने आपने दिल्लीत काँग्रेससाठी केवळ दोन जागा सोडण्याची तयारी ठेवली आहे.
या सहा राज्यांमधील २३० लोकसभा जागांपैकी काँग्रेसच्या वाट्याला केवळ ३५ ते ४० जागा देण्यास इंडिया आघाडीतील घटकपक्ष तयार होतील. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षश्रेष्ठी या तडजोडीसाठी तयार होईल काय? यावर या चर्चेचे यश अवलंबून राहणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.