नवी दिल्ली - विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीचे प्रमुख म्हणून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नावाला आज संमती देण्यात आल्याचे कळते. यामुळे गेल्या ६ महिन्यांपासून सुरू असलेल्या नेतृत्वाच्या वादावर पडदा पडला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी ‘इंडिया’चे संयोजक होण्यास नकार दिला होता. विशेष म्हणजे आजच्या बैठकीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठ फिरविली.
पश्चिम बंगालमध्ये जागा वाटपात माघार घेण्यास तृणमूल काँग्रेसने नकार दिला असून काँग्रेसने आपली कमकुवत बाजू मान्य करावी, असे पक्षाने म्हटले आहे. केंद्रातील मोदी सरकारविरोधात स्थापन झालेल्या ‘इंडिया’ आघाडीचे नेतृत्व अधिकृतपणे कुणाकडेही सोपविण्यात आले नव्हते.
दिल्लीत झालेल्या १९ डिसेंबरच्या बैठकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव सुचविले होते. यावरून बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार नाराज झाल्याचे बोलले जात होते. आज आभासी पद्धतीने ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. यात १० पक्षांचे नेते सहभागी झाले होते.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे व राहुल गांधी, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (जेडीयू), तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन व खासदार कनिमोळी (डीएमके), दिल्लीचे मुख्यमंत्री आणि ‘आप’चे समन्वयक अरविंद केजरीवाल व खासदार राघव चढ्ढा (आप), झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (जेएमएम), बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव व माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव (राजद), ज्येष्ठ नेते शरद पवार (राष्ट्रवादी काँग्रेस), माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला (नॅशनल कॉन्फरन्स), माजी खासदार सीताराम येचुरी (माकप), माजी खासदार डी. राजा (भाकप) यांचा समावेश होता.
नितीशकुमारांच्या नावाचा प्रस्ताव
आजच्या बैठकीत ‘इंडिया’ आघाडीचे संयोजक आणि अध्यक्ष निवडीवर बराच वेळ चर्चा झाली. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी संयोजकपदासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. परंतु नितीशकुमार यांनी संयोजक होण्यास नकार दिला. काँग्रेसच्या नेत्याकडे हे प्रमुखपद सोपविणे योग्य राहील, असे मत त्यांनी व्यक्त केले. यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे इंडिया आघाडीचे प्रमुखपद देण्यास संमती दर्शविण्यात आली. या प्रस्तावाला उपस्थित असलेल्या सर्व पक्षांच्या नेत्यांनी सहमती दर्शविली.
संयोजकपदाचा निर्णय होणार
‘इंडिया’ आघाडीच्या प्रमुखपदी खर्गे यांची नियुक्ती झाल्यानंतर संयोजकपदी मुख्यमंत्री नितीशकुमार यांची निवड होण्याची शक्यता मावळल्याचे समजते. यामागे बिहारमधील संयुक्त जनता आणि राष्ट्रीय जनता दलामधील सुप्त संघर्ष कारणीभूत आहे. काँग्रेसतर्फे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नावाला विरोध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
म्हणून अखिलेश नाराज
उत्तरप्रदेशमध्ये अखिलेश यादवही नाराज आहेत. काँग्रेसने २० जागांची मागणी करतानाच ‘बसप’ला आघाडीत घेण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यावरून अखिलेश नाराज झाल्याचे समजते. अखिलेश यादव यांनी काँग्रेसला कोणते मतदारसंघ पाहिजे व तेथे आपले उमेदवार कोण राहणार आहे? याची यादीच मागितली आहे.
उत्तरप्रदेशात काँग्रेसची स्थिती चांगली नसताना एवढ्या जागांची मागणी केल्याने याचा फायदा शेवटी भाजपला होईल, असेही यादव यांनी सुनावल्याचे समजते. यामुळे अखिलेश यादव यांनीही या बैठकीला हजर राहण्याचे टाळले. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे उद्धव ठाकरे देखील आज या बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत.
जागांवरून मतभेद
या बैठकीत जागावाटपावरही चर्चा झाली पण त्यावर अंतिम शिक्कामोर्तब होऊ शकले नाही. या मतभेदामुळेच तृणमूलच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी बैठकीला हजेरी लावली नाही. बंगालमध्ये तृणमूलने काँग्रेसला २ जागांचा प्रस्ताव ठेवला आहे. काँग्रेसला हा प्रस्ताव मान्य नाही. काँग्रेसचे नेते अधीररंजन चौधरी यांनी प. बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी केल्याने ममता नाराज आहेत.
‘इंडिया’ आघाडीत समन्वयकपदावरून कोणतेही मतभेद नाहीत. तसेच लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी कोणत्याही एका विशिष्ट नेत्याचा चेहरा पुढे करण्याची गरज नाही. निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर नेताही जाहीर करता येईल.
- शरद पवार, ज्येष्ठ नेते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.