नवी दिल्ली : काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि त्याची डोकलामबरोबर तुलना होऊ शकत नाही, असे भारतातर्फे आज स्पष्ट करण्यात आले. काश्मीरप्रश्नी भारत-पाकिस्तानमध्ये मध्यस्थीची तयारी दाखवणाऱ्या चीनला दिलेला हा इशारा मानला जातो.
डोकलाम सीमा पेचप्रसंग व त्यातून निर्माण तणावाची स्थिती महिन्यानंतरही जवळपास "जैसे थे' असल्याचे स्पष्ट झाले. या संदर्भात भारत आणि चीन यांच्या दरम्यान राजनैतिक पातळीवरील संपर्क दुवे (चॅनेल्स) उपलब्ध आहेत, असे मोघम उत्तर परराष्ट्र मंत्रालयातर्फे देण्यात आले. भारतातर्फे कोणत्या पातळीवर चीनशी संपर्क साधला जात आहे, हेही स्पष्ट करण्यात आले नाही. काश्मीरमधील स्थिती आणि डोकलाम पेचप्रसंगाबाबत विरोधी पक्षांना माहिती देण्याची जबाबदारी सरकारतर्फे गृहमंत्री राजनाथसिंह आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यावर सोपवण्यात आली असून, ते उद्या (ता. 14) या संदर्भात माहिती देतील.
भारत व चीनदरम्यान डोकलाम येथे निर्माण झालेला तणाव निवळण्याबाबतचे कोणतेही संकेत आज परराष्ट्र मंत्रालयातर्फे मिळू शकले नाहीत. मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाल बागले यांनी केवळ तांत्रिक उत्तरे देऊन वेळ मारून नेली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची हॅम्बर्ग येथे भेट झाली व त्या वेळच्या संभाषणात दोन्ही नेत्यांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली होती, याचा पुनरुच्चार बागले यांनी केल्यावर पत्रकारांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली आणि ही भेट किती वेळ झाली होती व या त्यात कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली होती याबाबत माहिती मिळू शकेल काय, असे विचारले असता, बागले यांनी "दोन नेत्यांमध्ये झालेल्या संभाषणात कोणते मुद्दे चर्चिले गेले याची माहिती मला मिळणे अशक्य आहे,' असे उत्तर दिले. दोन्ही नेत्यांमध्ये पाच मिनिटे भेट झाली काय, असे विचारल्यावरही त्यांनी "भेट किती वेळ झाली यावर गोष्टी अवलंबून असतात का,' असा प्रतिप्रश्न करून स्पष्ट उत्तर टाळले.
चीनने अशी भेट झाल्याचा इन्कार केला असल्याकडे बागले यांचे लक्ष वेधले असता, त्यांनी या भेटीचे छायाचित्र आणि माहिती मंत्रालयाने प्रसारित केली होती. चीननेही त्या वेळी कोणती टिप्पणी केलेली नव्हती, असे त्यांनी सांगितले. डोकलामबाबत परराष्ट्र मंत्रालयातर्फे 30 जून रोजी जारी करण्यात आलेल्या निवेदनानंतर या संदर्भात झालेल्या प्रगतीबाबत विचारणा केली असता बागले यांनी, राजनैतिक पातळीवरील संपर्काची उपलब्धता दोन्ही देशांकडे असल्याचे ठराविक छापाचे उत्तर दिले. 30 जून रोजीच्या निवेदनात भारताने घेतलेली भूमिका कायम आहे आणि त्यात बदल झालेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
भारत-चीन-भूतान या देशांच्या सीमा या परिसरात परस्परांशी मिळत असल्याने तिन्ही देशांनी याबाबत बोलणी केली पाहिजेत, अशी भूमिका भारताने घेतली असून याबाबत 2012 मध्ये झालेल्या कराराचा आधार भारताने घेतलेला आहे. चीनने ही भूमिका अमान्य केली आहे. भारत-चीनदरम्यान आतापर्यंत वेळोवेळी निर्माण झालेल्या सीमेवरील पेचप्रसंगांपेक्षा डोकलामचा मुद्दा वेगळा असल्याचे चीनने म्हटले आहे. त्याकडे लक्ष वेधले असता बागले म्हणाले, की भारत-चीन सीमेवर गेली अनेक वर्षे शांतता आहे आणि सीमेबाबत निर्माण झालेले विवाद सोडविण्याचा अनुभव दोन्ही देशांना आहे व तो या वेळीही उपयोगी पडेल, अशी आशा आहे.
|