गांधीनगर - ‘भारताने अलीकडेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. आता आपण पुढील २५ वर्ष विकसित देशाचे ध्येय प्राप्त करण्यासाठी काम करत आहोत. स्वातंत्र्याच्या शतकमहोत्सवापर्यंत विकसित देश करण्याचे ध्येय निश्चित केलेले आहे,’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. भारत जगातील पहिल्या तीन आघाडीच्या अर्थव्यवस्थेत येईल आणि ही आमची गॅरंटी आहे, असेही ते म्हणाले.
आगामी २५ वर्षांचा काळ हा अमृतकाळ असल्याचेही त्यांनी नमूद केले. दहाव्या ‘व्हायब्रंट गुजरात-२०२४’ चे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. यावेळी ‘यूएई’चे अध्यक्ष महंमद बीन झायेद यांच्यासह विविध देशांचे प्रमुख, जगातील आणि देशातील नामवंत उद्योजक, गुंतवणूकदार यांची उपस्थिती होती.
पंतप्रधान मोदी म्हणाले, भारत लॉजिस्टिकवर वेगाने काम करत आहे. दहा वर्षापूर्वी भारतात ७४ विमानतळं होती, आज १४९ विमानतळं आहेत. राष्ट्रीय महामार्गाचे जाळे दुपटीने तर मेट्रो रेल्वेचे जाळे तीन पटीने वाढले आहे. गुजरात असो किंवा महाराष्ट्र असो किंवा पूर्व किनारपट्टी असो आज सर्वांना डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरने जोडले जात आहे.
तत्पूर्वी बोलताना जिरोधाचे सह संस्थापक आणि सीएफओ निखिल कामत म्हणाले की, गेल्या दहा वर्षात भारतात व्यापक बदल झाले आहेत. उद्येागशिलता वेगाने वाढली आहे आणि हे सर्वांनीच अनुभवले आहे. आतापर्यंत आपण जोपासलेली आशा, स्वप्न केवळ चित्रपटात पाहिले किंवा विचार केला. परंतु आजघडीला उद्योगाचे स्वरूप बदलले आहे आणि त्यादृष्टीने सर्वच सक्रियतेने प्रयत्न करत आहेत.
पोलाद उद्योगाची भूमिका महत्त्वाची
प्रसिद्ध उद्योगपती लक्ष्मी मित्तल म्हणाले की, देशाच्या आत्मनिर्भरतेत पोलाद उद्योगाची भूमिका महत्त्वाची आहे. गुजरातमध्ये चार वर्षापूर्वी पंतप्रधानांनी आमच्या प्रकल्पाचे उद्घाटन केले होते. पुढील वीस वर्षे महत्त्वाची आहेत, असे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, ‘गुजरातने स्वत:ला भविष्याचे प्रवेशद्वार म्हणून सिद्ध केले आहे. टाटा समूहासाठी गुजरातला विशेष स्थान आहे. टाटा समूहाकडून लवकरच गुजरातच्या धोलेरा येथे सेमिकंडक्टर प्रकल्प कार्यान्वित होईल,’ असे प्रतिपादन टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांनी केले.
व्हायब्रंट गुजरात परिषदेत ३४ देशांनी सहभाग घेतला असून १३० पेक्षा अधिक देशांतील प्रतिनिधींनी उपस्थिती नोंदविली आहे.
- भूपेंद्र पटेल, मुख्यमंत्री गुजरात
दूरदर्शीपणाचे द्योतक - मुकेश अंबानी
रिलायन्स उद्योग समूहाचे मुकेश अंबानी म्हणाले की, मला परदेशातील मित्र विचारतात की, मोदी है तो मुमकिन है याचा अर्थ काय? तेव्हा मी म्हणतो, भारताचे पंतप्रधान एक दृष्टिकोन ठेवतात आणि ते अमलात आणतात. अशक्य गोष्ट शक्य करून दाखवितात.
व्हायब्रंट गुजरात संमेलन आज जगातील नामवंत गुंतवणूक शिखर संमेलन म्हणून ओळखले जात आहे. सलग आयोजित करण्यात येणारे संमेलन अन्य कोठेही पाहावयास मिळत नाही. २०४७ पर्यंत ३५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्यापासून कोणीही भारताला रोखू शकत नाही.
भव्य महत्त्वाकांक्षेचे साकार रूप - अदानी
अदानी समूहाचे गौतम अदानी म्हणाले, ‘व्हायब्रंट गुजरात हे पंतप्रधानांच्या असामान्य दृष्टिकोनाची आश्चर्यकारक अभिव्यक्ती आहे. यात त्यांनी केलेले वैशिष्ट्यपूर्ण करार, भव्य महत्त्वाकांक्षा, प्रशासकीय पकड आणि निर्दोष अंमलबजावणीचा समावेश आहे. देशातील सर्व राज्यांनी विकास केला आहे. राज्याराज्यांतील स्पर्धेच्या माध्यमातून भारताच्या औद्योगिक स्वरूपात नाविण्यता आणण्यासाठी एकप्रकारे औद्योगिक चळवळ सुरू झाली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.