मानसातील कोटली गावातील अग्निवीर अमृतपाल सिंग यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी भारतीय सेनेकडून गार्ड ऑफ ऑनर न दिल्याने राजकारण तापलं आहे. या प्रकरणी राजकीय पक्षांकडून टीका केली जात आहे. यादरम्यान भारतीय लष्कराने रविवारी, 15 ऑक्टोबर रोजी उशिरा एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये अग्निवीर अमृतपाल यांनी आत्महत्या केली असल्याने त्यांना नियमानुसार गार्ड ऑफ ऑनर देण्यात आलेला नाही असा खुलासा करण्यात आला आहे.
लष्कराच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट करण्यात आली होती ज्यामध्ये अग्निवीर अमृतपाल सिंग यांनी सेन्ट्री ड्युटीवर (sentry duty) असताना स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे लिहिले आहे. लष्कराने सांगितलं की, अमृतपालच्या अंत्यसंस्कारात गार्ड ऑफ ऑनर नव्हता कारण स्वत:ला केलेल्या दुखापतीमुळे मृत्यू झाल्यास हा सन्मान दिला जात नाही.
भारतीय सैन्याच्या निवेदनातील महत्वाचे मुद्दे
लष्कराने म्हटले आहे की, अमृतपाल सिंगच्या मृत्यूशी संबंधित बाबींमध्ये काही गैरसमज आणि चुकीची माहिती देण्यात आली आहे.
जवान अग्निपथ योजनेपूर्वी किंवा नंतर सैन्यात सामील झाले या आधारावर लष्कर सैनिकांमध्ये भेदभाव करत नाही.
एका अग्निवीरने कर्तव्यावर असताना स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली ही कुटुंबाची आणि भारतीय लष्कराची मोठी हानी आहे.
निवेदनात असेही म्हटले आहे की, आत्महत्येमुळे किंवा स्वत: मुळे दुखापत झाल्याने सैनिकाचा मृत्यू झाल्यास, सैन्यात प्रवेश करण्याच्या पद्धतीकडे दुर्लक्ष करून सैनिकाला योग्य सन्मान दिला जातो. मात्र, आर्मी ऑर्डर 1967 नुसार अशा प्रकरणांना लष्करी अंत्यसंस्काराचा अधिकार नाही. कोणताही भेदभाव न करता या धोरणाचे सातत्याने पालन केले जात आहे.
लष्कराने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार. 2001 पासून दरवर्षी 100-140 सैनिकांचा मृत्यू झाला आहे. हे मृत्यू आत्महत्या/स्वतःमुळे झालेल्या जखमांमुळे झाले आहेत. तत्सम प्रकरणांमध्ये, लष्करी अंत्यसंस्कारांना परवानगी नव्हती. अंत्यसंस्कारासाठी आर्थिक मदतीशिवाय मृत व्यक्तीच्या दर्जानुसार मदत दिली जाते.
अमृतपाल सिंग हा पूंछ जिल्ह्यातील मेंढर उपविभागातील मनकोट भागात एलओसीवर ड्युटीवर होता. ड्युटीवर असताना त्यांच्या डोक्यात गोळी लागली. अमृतपाल यांना गोळी लागण्याच्या दोन दिवस आधी लष्कराने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. सुरूवातीला अमृतपाल यांचा मृ्त्यू दहशतवाद्यांच्या हल्ल्यात गोळी लागल्याचे बोलले जात होते. .
मृत्यूनंतर त्यांचे पार्थिव लष्कराच्या वाहनाऐवजी खाजगी रुग्णवाहिकेत आणण्यात आले. तसेच मृतदेह सोडण्यासाठी लष्कराचे दोन जवान येथे आले होते. अमृतपालचा मृतदेह सोपवून ते तेथून निघून गेले. कुटुंबीयांनी त्यांना अमृतपाल यांना लष्करी सन्मान मिळणार नाही? असा सवाल केला असता अग्निवीर योजनेंतर्गत भरती झालेल्या सैनिकाला हुतात्मा दर्जा नाही, त्यामुळे लष्करी सन्मान मिळणार नाही. असे सांगण्यात आले.
मानसातील कोटली गावातील अग्निवीर अमृतपाल सिंग यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी भारतीय लष्कराने गार्ड ऑफ ऑनर न दिल्याने विविध पक्षांचे नेते सरकारवर निशाणा साधत आहेत. काँग्रेससह विरोधी पक्षांकडून या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यादरम्यान अग्निवीर अमृतपाल सिंग यांच्या वडिलांनीही याबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणाले की, मी माझा मुलगा अमृतपाल सिंग याला भारतीय सैन्यदलात दिले होते, अग्निवीर म्हणजे काय हे आम्हाला माहीत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.