Delhi Coaching Centre sakal
देश

Delhi Coaching Centre : कोचिंग सेंटर दुर्घटनेचा तपास ‘सीबीआय’कडे ; पोलिस, महापालिकेवरही दिल्ली उच्च न्यायालयाचे ताशेरे

येथे राजेंद्रनगर भागात अतिवृष्टीमुळे पुराचे पाणी कोचिंग सेंटर इमारतीच्या बेसमेंटमध्ये शिरून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : येथे राजेंद्रनगर भागात अतिवृष्टीमुळे पुराचे पाणी कोचिंग सेंटर इमारतीच्या बेसमेंटमध्ये शिरून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने आज स्थानिक पोलिस आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पुराचे पाणी आत शिरल्यानंतर या विद्यार्थ्यांना बाहेर कसे पडता आले नाही? हेच आम्हाला समजत नाही अशी टिपणी करत न्यायालयाने या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपविला आहे. या भागातील सांडपाणी व्यवस्था ही पुरेशी सक्षम नसल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आयुक्तांना का कळविले नाही? असा सवाल न्यायालयाने केला.

मुख्य न्यायाधीश मनमोहन आणि न्या. तुषार राव गेदेला यांच्यापीठासमोर आज या प्रकरणी सुनावणी पार पडली. अशा दुर्घटनांचा महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर देखील कसलाही परिणाम होत नाही अन् ही बाब आता नेहमीची झाली आहे अशी खंत न्यायालयाकडून व्यक्त करण्यात आली. तुम्ही निर्दयीपणे त्या ठिकाणी साठलेल्या पाण्याला वाट करून दिली नाही, ज्या पद्धतीने त्या वाहन चालकाला अटक करण्यात आली त्यावरून नेमकी हीच बाब दिसून येते, असे न्यायालयाने म्हटले आहे. केंद्रीय दक्षता आयुक्तांकडे चौकशींवर देखरेख ठेवण्याचे अधिकार असल्याने हे न्यायालय आयुक्तांनाच देखरेखीसाठी या प्रकरणी संबंधित सदस्याची नियुक्ती करण्याचे आदेश देत आहे असे न्यायाधीशांनी या सुनावणीवेळी सांगितले.

नाल्याची सोय नाही

न्यायालयाने दिल्लीतील पायाभूत सेवांवर देखील कठोर शब्दांत ताशेरे ओढले. अनेक भागांमध्ये नाल्याची सोय नाही तसेच त्यांची योग्यपद्धतीने निगा देखील राखली जात नाही. स्थानिक संस्था जे आदेश देतात त्यांची देखील योग्य अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येते. स्थानिक अधिकारी या आदेशांचे पालनच करत नाहीत अशी खंत न्यायालयाने व्यक्त केली. दरम्यान येथील दुर्घटनेनंतर अनेक विद्यार्थी आंदोलन करत आहेत.

अचानक पाणी वाढले : पोलिस

या भागामध्ये पुराचे पाणी शिरले असताना ज्या पद्धतीने पोलिसांनी वाहनचालकावर कारवाई केली ती अयोग्य होती. तुम्ही दोषींना पकडले असते अन् निर्दोष व्यक्तीला सोडले असते तर तुमचा सन्मान झाला असता. पोलिसांचे वर्तन खेदजनक असल्याचे मत न्यायालयाने यावेळी नोंदविले. आजच्या सुनावणीवेळी पोलिस उपायुक्तांनी त्यांची बाजू मांडली. या भागात पुराचे पाणी वाढल्याचे लक्षात येताच आम्ही कॉन्स्टेबलला घटनास्थळी पाठविले होते पण पाणी गळ्यापर्यंत असल्याने आम्ही एनडीआरएफच्या साहाय्याने मदत आणि बचाव कार्य राबविले असे त्यांनी सांगितले.

कोचिंग सेंटरकडून मदतीची तयारी

राजेंद्रनगरमधील कोचिंग क्लास दुर्घटनेतील मृत विद्यार्थी श्रेया यादव, तानया सोनी आणि नवी दालविन यांच्या कुटुंबीयांना आघाडीच्या कोचिंग इन्स्टिट्यूटनी आर्थिक मदत करण्याची तयारी दर्शविली आहे. यामध्ये वाजिराम आणि रवी इन्स्टिट्यूट, दृष्टी आयएएस, नेक्स्ट आयएएस आणि श्रीराम आयएएस या संस्थांचा समावेश आहे. पटेलनगरमध्ये विजेचा धक्का लागून मरण पावलेला विद्यार्थी नीलेश राय याच्या कुटुंबीयांनाही दृष्टी आयएएस आणि श्रीराम आयएएस या संस्थांनी प्रत्येकी दहा लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याची तयारी दर्शविली आहे. दरम्यान, राऊज कोचिंग सेंटरने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५० लाख रूपये देण्याची तयारी दर्शवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT