नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरचे ३७० कलम रद्द झाल्यानंतरच्या पहिल्यावहिल्या लोकसभा निवडणुकीत जम्मू भागातील प्रमुख केंद्र असलेल्या उधमपूर लोकसभा मतदारसंघात १६.२३ लाख मतदार १२ उमेदवारांचे भवितव्य ठरवतील. जम्मू काश्मीरमधील दुसऱ्या क्रमांकाचा मतदारसंघ असलेल्या उधमपूरमध्ये मुख्य लढत आहे ती डॉ. जितेंद्र सिंह आणि चौधरी लालसिंह या दोन डोग्रा राजपुतांमध्ये.
भारतीय जनता पक्षाने, पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री असलेले डॉ. जितेंद्रसिंह यांना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. तर दशकभराच्या सोडचिठ्ठीनंतर काँग्रेसमध्ये घरवापसी केलेले चौधरी लालसिंह यांना काँग्रेसने मैदानात उतरविले आहे.
उधमपूर लोकसभा मतदारसंघ किश्तवाड, डोडा, रामबन, उधमपूर आणि कठुआ या पाच जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे. डोडा, किश्तवाड आणि रामबन हे मुस्लिम बहुल जिल्हे आहेत, तर उधमपूर आणि कठुआमध्ये हिंदूंची संख्या अधिक आहे. गेल्या काही वर्षांत, काश्मीरच्या राजघराण्यातील करण सिंहसारख्या प्रमुख व्यक्तींनी या मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि प्रतिनिधित्व केले आहे.
काँग्रेसने उधमपूर मतदारसंघात १९६७ पासून सलग सहा वेळा विजय मिळवला. तर, १९९६, १९९८ आणि १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे चमनलाल गुप्ता यांनी सलग तीनदा विजय मिळवून उधमपूरमध्ये कमळ फुलवले. २००४ आणि २००९ मध्ये चौधरी लालसिंग काँग्रेसकडून खासदार झाले होते.
मात्र, २०१४ मध्ये मोदी लाटेत आणि त्यानंतर २०१९ मध्येही डॉ. जितेंद्रसिंह यांनी सहज विजय मिळवला. २०१४ मध्ये त्यांनी काँग्रेसचे तत्कालीन दिग्गज नेते गुलाम नबी आजाद यांना पराभूत करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. पेशाने डॉक्टर असलेले जितेंद्रसिंह यांनी २०१२ मध्ये भाजप प्रवेशाआधी जम्मूच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राध्यापक पदावरून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती.
चौधरी लालसिंग यांचा राजकीय प्रवास काँग्रेस- भाजप – काँग्रेस व्हाया स्वतःचा पक्ष असा राहिला आहे. २०१४ मध्ये काँग्रेसने उमेदवारी न दिल्याने लालसिंह यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. या प्रवेशाचे पारितोषिक त्यांना जम्मू -काश्मीरमध्ये भाजप आणि मेहबुबा मुफ्ती यांचा पक्ष पीडीपी यांचे संयुक्त सरकार असताना मंत्रिपदाच्या रूपाने मिळाले होते.
मात्र कठुआमधील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात आरोपींच्या कथित पाठिंब्यासाठी सभा घेतल्याबद्दल लालसिंह यांना मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा लागला होता. या घटनाक्रमानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे लालसिंह यांना त्यांच्या वादग्रस्त छबीमुळे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेपासूनही दूर ठेवले होते.
त्याआधीही लालसिंह यांनी डोग्रा स्वाभिमान संघटन पार्टी'' असा स्वतःचा पक्ष काढून २०१९ मध्ये लोकसभा निवडणूक लढविली होती. परंतु केवळ २० हजार मते मिळवून त्यांची चौथ्या क्रमांकावर घसरण झाली होती. मागील महिन्यात २० तारखेला लालसिंग यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.