नेहमीप्रमाणे शाळेतील विद्यार्थ्यांना सकाळी ११ वाजता क्षीरभाग्य योजनेतील दूध देण्यात आले. विद्यार्थ्यांचे दूध पिऊन झाल्यानंतर या दुधाच्या पात्रात मृत पाल आढळली.
संकेश्वर : उळागड्डी खानापूर (ता. हुक्केरी) येथील कर्नाटक पब्लिक स्कूलच्या (Karnataka Public School) कन्नड प्राथमिक व उर्दू प्राथमिक शाळेतील ४२ विद्यार्थ्यांना गुरुवारी (ता. ११) सरकारच्या क्षीरभाग्य योजनेंतर्गत (Ksheera Bhagya Yojana) दिलेले दूध प्यायल्याने विषबाधा झाली. तातडीने या विद्यार्थ्यांना रुग्णवाहिका व खाजगी वाहनांतून शासकीय रुग्णालयात दाखल केले असून, सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
गुरुवारी (ता. ११) नेहमीप्रमाणे शाळेतील विद्यार्थ्यांना सकाळी ११ वाजता क्षीरभाग्य योजनेतील दूध देण्यात आले. विद्यार्थ्यांचे दूध पिऊन झाल्यानंतर या दुधाच्या पात्रात मृत पाल आढळली. त्यामुळे शाळेतील सर्वच विद्यार्थांत खळबळ उडाली. काहींना उलटी, जुलाबाचा त्रास सुरू झाला. तातडीने त्रास सुरू झालेल्या ४२ विद्यार्थ्यांना दोन रुग्णवाहिका व खासगी वाहनांतून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
डॉ. दत्तात्रय दोडमनी, डॉ. पोर्णिमा तल्लूर, डॉ. के. आय. हट्टी यांनी उपचार सुरू केले. उपचार सुरू असलेल्या ४२ पैकी चार विद्यार्थ्यांची परिस्थिती गंभीर वाटल्याने त्यांना हुक्केरी येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. लक्ष्मी कुरबर, संध्या देसाई, अक्सा हाजी, झोहरा हाजी अशी त्यांची नावे आहेत. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. खबरदारी म्हणून विद्यार्थ्यांना सायंकाळपर्यंत रुग्णालयात ठेवून त्यानंतर उपचारांबाबतचा पुढील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती डॉ. तल्लूर यांनी दिली.
दरम्यान, मुलांना विषबाधा होऊन उपचारासाठी येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केल्याची बातमी वाऱ्यासारखी तालुक्यात पसरली. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना पाहण्यासाठी येथे गर्दी केली होती. यामुळे डॉक्टरनाही उपचार करणे अडचणीचे ठरत होते. त्यामुळे पोलिसांना पाचारण करावे लागले. यावेळी यमकनमर्डीचे पोलिस निरीक्षक रमेश छायागोळ, मुख्याध्यापक एस. एम. कमते, बी. एस. पाटील, व्ही. एल. काकडे उपस्थित होते.
तालुक्यात सर्वच शाळांमध्ये क्षीरभाग्य, अन्नभाग्य योजना व्यवस्थित सुरू आहे. स्वयंसेवी संस्थांमार्फत या योजना राबविल्या जात आहेत. तालुक्यातील या शाळेत घडलेली ही घटना दुर्दैवी आहे. याला कारणीभूत असलेल्यांवर कडक कारवाई केली जाईल.
-प्रभावती पाटील, गटशिक्षणाधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.