Kargil Vijay Diwas sakal
देश

Kargil Vijay Diwas : कारगिल युद्धात ड्रोन असते तर ?

अत्यंत शौर्याने शत्रूच्या ताब्यातील प्रदेश परत मिळवला. अर्थात यासाठी आपल्याला खूप मोठी किंमत मोजावी लागली. आज आधुनिक युद्धांमध्ये ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. कारगिल घडले तेव्हा युद्धभूमीवर ड्रोन उपलब्ध नव्हते. त्यावेळी ड्रोन असते तर आपल्या सैनिकांचे काम अधिक सोपे झाले असते....

सकाळ वृत्तसेवा

कर्नल अजय सिंग

(निवृत्त)

कारगिल युद्धात भारतीय सैन्याने

अत्यंत शौर्याने शत्रूच्या ताब्यातील प्रदेश परत मिळवला. अर्थात यासाठी आपल्याला खूप मोठी किंमत मोजावी लागली. आज आधुनिक युद्धांमध्ये ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. कारगिल घडले तेव्हा युद्धभूमीवर ड्रोन उपलब्ध नव्हते. त्यावेळी ड्रोन असते तर आपल्या सैनिकांचे काम अधिक सोपे झाले असते....

कारगिल युद्धात ड्रोनचा वापर कशा पद्धतीने झाला असता? या संघर्षाच्या पहिल्या टप्प्यात पाकिस्तानी सैन्याने कारगिल, द्रास आणि बटालिक सेक्टरमध्ये घुसखोरी करून नियंत्रण रेषेजवळ काही ठिकाणांवर ताबा मिळवला. विशेषतः भारतीय सैन्याचे अस्तित्व नसलेला भाग पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतला होता. कठीण परिस्थितीमुळे या एकूणच २४० किलोमीटरच्या परिसरावर सतत देखरेख ठेवणे शक्य नव्हते. (युद्धानंतर ही स्थिती बदलली आहे आणि आता येथे भारतीय सैन्याची उपस्थिती आहे) तथापि, तेव्हा ड्रोन वापरात असते तर शत्रूच्या या हालचालींची माहिती मुख्यालयाला सतत मिळाली असती. पाळत ठेवणाऱ्या ड्रोनच्या माध्यमातून या घुसखोरीवर चांगल्या प्रकारे लक्ष ठेवून त्यावर वेळीच प्रतिबंधही घालता आला असता.

प्रत्यक्ष कारवाईदरम्यान ड्रोनचा वापर करून शत्रूने व्यापलेल्या भागांवरून त्यावेळी उड्डाण करता आले असते आणि त्यांनी नेमकी किती जागा व ठिकाणे व्यापली आहेत याची माहिती सहज मिळाली असती. या भागांवर नंतर तोफखान्याचा वापर करून वा हवाई हल्ला करता आला असता. ड्रोनद्वारे पाठवण्यात आलेल्या छायाचित्रांचा वापर करून शत्रूवर तोफा परिणामकारक पद्धतीने डागता आल्या असता. ड्रोनच्या माध्यमातून शत्रूच्या अगदी एका सैनिकावरही लक्ष केंद्रित करून त्याचा सफाया करता आला असता. कदाचित स्फोटकांनी भरलेल्या ड्रोनचा वापर करून शत्रूचे बंकर आणि त्यांच्या ताब्यातील स्थानांवर प्रतिहल्ला करता आला असता. बंकर ताब्यात घेण्यासाठी आपल्या सैनिकांना प्रयत्नांची शिकस्त करावी लागली. ड्रोन असते तर आपल्या सैनिकांची जीवितहानी टळली असती. अगदी साध्या गोष्टी जसे अन्न, पाणी आणि मनुष्यबळाची उपलब्धता ड्रोनच्या साहाय्याने सोपी होऊ शकली असती. अन्न किंवा दारूगोळा भरलेले ड्रोन मागून पुढच्या भागाकडे उड्डाण करू शकतात आणि यामुळे आपल्या सैनिकांना त्वरित मदत मिळू शकली असती. अगदी वैद्यकीय सामग्रीचा पुरवठा ड्रोनद्वारे झाला असता. यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकले असते. आजच्या युद्धात ड्रोनचा वापर ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. कारगिलमध्ये ते उपलब्ध झाले असते तर अनेकांचा जीव वाचला असता आणि प्रतिहल्ल्याची कारवाई अधिकच सोपी झाली असती. आज ड्रोनचा उपयोग लष्कराकडून दुर्गम भागात प्रभावीपणे केला जातो.

युक्रेन आणि गाझात ड्रोनचा वापर

सध्या युद्धभूमीवर वर्चस्व गाजविण्यासाठी सर्वव्यापी ड्रोन प्रणालीचा वापर केला जात आहे. कोणत्याही मोठ्या कारवाईत अंदाजे ५० ते १०० ड्रोन डोक्यावरून सतत उडत असतात. युक्रेनमधील युद्धात दोन्ही बाजूंनी ड्रोनचा वापर करण्यात येत आहे. परंतु, युक्रेनच्या नागरिकांनी ड्रोनचा ‘शोधून मारणारा मारेकरी’ म्हणून अधिक प्रभावीपणे वापर केला. निरीक्षक ड्रोनने पाठवलेल्या छायाचित्रांच्या मदतीने त्यांना अगदी अचूक हल्ले करता आले. तोफा, रणगाडे, क्षेपणास्त्रे आणि नेम साधणाऱ्या ड्रोनशी समन्वय साधून अधिक प्रभावी मारा साधता आला. यात ज्या कारवाईसाठी आठ ते दहा मिनिटांचा वेळ जात होता तो अवघा दोन-तीन मिनिटांवर आला. शिवाय ड्रोनकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तोफखान्याकडून ८६ टक्के लक्ष्यांवर हल्ला साधता आला.

युक्रेनच्या नागरिकांनी काही कल्पक माध्यमांचा या युद्धात अवलंब केला. युद्धाच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी व्यावसायिक ड्रोनची मागणी करून ड्रोनची कमतरता भरून काढली. पिझ्झा वा माल वितरित करणाऱ्या स्टोअर व्यवस्थापकांना ड्रोन हल्ल्यांसाठी प्रशिक्षित करण्यात आले. या साध्या ड्रोनवर व्हिडिओ कॅमेरे बसवले गेले आणि त्यांच्या माध्यमातून युद्ध क्षेत्रातील माहिती एकत्रित करण्यात आली. या ड्रोनचे आयुर्मान फारसे नव्हते. तीन ते सहा उड्डाणांपुरते त्यांचे आयुष्य मर्यादित होते. बहुतांश घटनांमध्ये ड्रोन पाडण्यासाठी उच्च शक्तीचे जॅमर वापरण्यात आले. परंतु, स्वस्त आणि भरपूर उपलब्धता यामुळे त्यांच्याकडून बहुमूल्य अशी माहिती सतत मिळत गेली.

ड्रोनच्या मार्गातील सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे त्यांना व्हिडिओ आणि उच्च दर्जाची छायाचित्रे पाठविण्यासाठी प्रचंड बँडविड्थ आणि बॅटरी पॉवरची आवश्यकता असते. मात्र, लहान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेने सक्षम अशा चिप्समुळे कॅमेऱ्यांमधून दिसणारे लक्ष्य रणगाडा आहे, तोफखाना आहे की सैनिक एकत्रित असलेली जागा याची निश्चित माहिती मिळाली. या माहितीसाठी फक्त काही किलोबाइट डाटा वापरला गेला आणि यात अनावश्यक माहितीच्या जंजाळातून मुक्ती मिळाली.

या युद्धात ड्रोनचा वापर काही कल्पक मार्गांनीही करण्यात आला. रशियाने लियर-३ आरबी-३४१ व्ही ड्रोन प्रणाली विकसित केली. ही प्रणाली शत्रूच्या द्रोणकडून संदेशांचे वहन होऊ देत नाही. शिवाय शत्रूचे ड्रोन जवळ आल्यावर ही प्रणाली त्यांच्या मोबाईल नेटवर्कमध्ये घुसखोरी करून शत्रूला खोटे संदेश पाठवू शकते. या भागातील कुटुंबांना त्यांच्या फोनवर खोटी माहिती पसरविण्यासाठी वा कुटुंबातील सदस्य कारवाईत मारला गेला आहे, अशी खोटी माहिती देणारे दूरध्वनी यातून केले गेले. घाबरलेल्या कुटुंबीयांनी आपल्या घरातील व्यक्तीशी दूरध्वनीवरून संपर्क साधल्यानंतर त्यांच्या नेमक्या ठिकाणांची माहिती सैनिकांना मिळाली. या माहितीचा वापर त्यांच्या कुटुंबीयांना लक्ष्य करण्यासाठी केला गेला. ड्रोन लक्ष्यांवर अगदी दूरवर जाऊन हल्ला करू शकतात. मॉस्कोवर हल्ला होईपर्यंत क्रेमलिनला या कारवाईचा थांगपत्ता लागला नाही. तसेच किव्ह आणि इतर शहरांवर स्फोटकांनी भरलेल्या कामिकाझे ड्रोनचा वापर हवाई आणि रडारची सुरक्षा भेदून करण्यात आला. यात लक्षावधीची हानी झाली. त्यामुळे द्रोण हा युद्ध छेडण्याचा एक गैरखर्चिक मार्ग बनला.

या युद्धात लढलेल्या बहुतेक सैनिकांच्या मते ड्रोनने त्यांना बघू नये हाच त्यांचा मुख्य उद्देश होता. ड्रोनने तुम्हाला बघितल्यास मरण निश्चित आहे, हे सैनिकांना ठाऊक होते. त्यामुळे सावध हालचाली आणि क्लृप्त्या यांना अधिक महत्त्व प्राप्त झाले. कारण एकदा का तुम्ही ड्रोनच्या नजरेत आलात तर काही मिनिटांत हल्ला झालाच म्हणून समजा. तुम्हाला लक्ष्य केले जात नाही तोपर्यंत डोक्यावरील ड्रोन तुमची माहिती आणि हालचाली पाठवत राहतो, हेही निश्चित होते. नंतरच्या काळात रशियन सैन्यानेही ड्रोनच्या फायद्यांवर लक्ष केंद्रित केले. त्यांच्याकडील ड्रोनची संख्या युक्रेनकडे असलेल्या ड्रोनच्या संख्येच्या तुलनेत एक तृतीयांश एवढीच होती. मात्र, रशियाने इराण आणि तुर्की यासारख्या मित्र राष्ट्रांकडून ड्रोनची खरेदी केली आणि त्यांची संख्या कंपनी आणि स्क्वाड्रन स्तराएवढी वाढवली. लांब पल्ल्याच्या हल्ल्यांसाठी ड्रोनचा प्रभावी वापर करण्यात आला. यात विशेषतः किव्ह, झापोरिझ्झिया आणि इतर ठिकाणी वारंवार खोलवर मारा करण्यात आला. श्रेणीनुसार आणि बँडविड्थचा जेवढा शक्य तेवढा वापर यासाठी करण्यात आला. म्हणूनच ड्रोन हे या युद्धात सर्वात शक्तिशाली असे अस्त्र सिद्ध झाले.

गाझा युद्धातही दोन्ही बाजूंनी ड्रोनचा प्रभावी वापर केला गेला. हमासने ड्रोनचा वापर करून ७ ऑक्टोबर रोजी इस्राईलवर हल्ला चढवला. हल्ल्यानंतर त्यांच्या हालचालींचे निरीक्षण करण्यासाठीही ड्रोन वापरले गेले. इस्राईलच्या सैन्यानेही गाझामध्ये अनेकदा ड्रोनचा वापर केला. त्यांच्या आधारे ‘रिअल-टाइम’ माहिती मिळवली. त्यांनी स्फोटकांनी भरलेले ड्रोनचा वापर जे शत्रूची ठिकाणे आणि सैनिक मारण्यासाठी केला. यात त्यांची जीवितहानी लक्षणीयरीत्या कमी झाली.

निष्कर्ष

वरील सर्व बाबी लक्षात घेता ड्रोन हे आता युद्धाचे सर्वांत महत्त्वाचे शस्त्र बनले आहे, असा निष्कर्ष काढला जाऊ शकतो. ते कारगिलमध्येही वापरता आले असते तर त्याने जीवितहानी टळली असती. पण, आताही आपण जे ड्रोन वापरतो ते सैन्याला मदत करतात आणि आता त्यांच्यात आणखी एक कारगिल रोखण्याची क्षमता निश्चितच आहे.

(अनुवाद : किशोर जामकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT