Kargil Vijay Diwas sakal
देश

Kargil Vijay Diwas : 'कारगिल' मी पाहिले तसे...

मे १९९९ मध्ये पाकिस्तानने कारगिल सेक्टरमध्ये केलेली घुसखोरी हा लष्करासाठी नव्हे, तर संपूर्ण देशासाठी अनपेक्षित धक्का होता.

सकाळ वृत्तसेवा

ब्रिगेडियर उमेशसिंग बावा

(निवृत्त)

मे १९९९ मध्ये पाकिस्तानने कारगिल सेक्टरमध्ये केलेली घुसखोरी हा लष्करासाठी नव्हे, तर संपूर्ण देशासाठी अनपेक्षित धक्का होता. पाकिस्तानने राष्ट्रीय महामार्ग १-डी (एनएच१डी) तसेच कारगिल व द्रास भोवतालच्या परिसरावर सातत्याने तोफगोळ्यांचा मारा सुरू केला होता. यामुळे येथील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते. मात्र, त्यानंतर द्रास, मश्‍कोह, काकसर आणि बटालिक सेक्टरमध्ये गस्त घालणाऱ्या जवानांवर आणि हेलिकॉप्टरवर घुसखोरांकडून गोळीबार सुरू असल्याची माहिती मिळाली. आपल्या जवानांनीदेखील या घुसखोरांना परतवून लावण्यासाठी तीव्र प्रतिकार करण्यास सुरुवात केली होती, मात्र पाकिस्तानी घुसखोरांच्या हालचाली पाहता, ते केवळ सामान्य घुसखोरी करण्यासाठी नव्हे तर देशाचा भूभाग बळकावण्यासाठी संपूर्ण तयारीनिशी आले आहेत, हे एव्हाना स्पष्ट झाले होते. शत्रूने काही महत्त्वाच्या ठिकाणांवर वर्चस्व प्राप्त केल्याचे प्रथमदर्शनी दिसत होते. हे वर्चस्व मोडून काढण्यासाठी रोजच्या रोज चकमकी सुरूच होत्या.

युद्धभूमीत प्रवेश

माझ्या १७ जाट या युनिटचा समावेश ७९ माउंटन ब्रिगेडमध्ये होतो. आम्हाला २६ मे १९९९ रोजी द्रास सेक्टरमधील मश्‍कोह खोऱ्यात तैनात करण्यात आले. द्रास हा भारतातील वस्ती असलेला सर्वांत थंड भूभाग आहे. हिवाळ्यात येथील तापमान उणे ४० अंश सेल्सिअसपर्यंत घसरते. द्रास येथे पोहोचल्यानंतर येथील ब्रिगेड कमांडरने आम्हाला संबंधित परिसरातील तत्कालीन परिस्थितीची प्राथमिक माहिती दिली. मश्‍कोह खोऱ्यातून उंचावर दिसणाऱ्या पॉइंट ४८७५ बद्दल माहिती देत असताना त्यांनी आम्हाला अगदी कोरड्या स्वरात सांगितले, ‘‘तेथे आठ ते दहा घुसखोर आहेत. तेथे जा आणि त्यांच्या मानगुटीला धरून त्यांना खाली घेऊन या.’’ मश्‍कोह खोऱ्यात आणि त्याच्या आसपासच्या पर्वतरांगांवर आमच्या आधी कोणत्याही तुकडीला पाठवण्यात आले नव्हते. पॉइंट ४८७५ या शिखरावरून संपूर्ण मश्‍कोह खोऱ्या‍यावर नियंत्रण ठेवले जाऊ शकत होते. हे शिखर एखाद्या किल्ल्याप्रमाणे असून त्यावर हल्ला चढवणाऱ्या सैन्याची मोठ्या प्रमाणात जीवितहानी करून त्याला माघारी फिरायला भाग पाडणे, हे शिखरावर ताबा असणाऱ्या सैन्याला सोपे आहे. येथील ७० ते ८० अंशाच्या कोनात असलेली खडी चढाई, तब्बल १६ हजार २०० फूट उंची, जिथे क्वचितच मानवी पावले उमटली असावीत असा खडकाळ भाग व फारशी झाडे नसलेले आणि ऑक्सिजनचा अभाव असलेले हे पॉइंट ४८७५ शिखर.

मी पाकिस्तानच्या सीमेपासून दक्षिणेवर सुमारे दहा किलोमीटर अंतरावर नुकताच बसलो होतो आणि माझे मन भूतकाळात गेले. जुलै ७८... मी सेकंड लेफ्टनंट म्हणून माझ्या बटालियनमध्ये रुजू झालो... त्यावेळी मनात विचार येई की, मी युद्धभूमीवर माझ्या बटालियनचे नेतृत्व करण्याची शक्यता फार कमी... जवळपास नाहीच. पण त्यादिवशी प्रत्यक्ष युद्धभूमीवर आल्यावर माझ्या लक्षात आले, की माझा तो अंदाज चुकला होता. माझ्या नशिबाने युद्धभूमीवर नेतृत्व करण्याची संधी मला दिली होती. एका योद्ध्यासाठी यापेक्षा अधिक मोठी संधी काय असू शकते! माझा माझ्याच नशिबावर विश्वास बसत नव्हता. दूरध्वनीवरून माझी पत्नी इंदूला मी युद्धभूमीवर असल्याचे सांगत असताना मोठ्या मुश्किलीने माझा उत्साह तिच्यापासून लपवण्याचा प्रयत्न करत होतो. मी युद्धभूमीवर असल्याचे तिला सांगितल्यावर तिच्या आवाजातील अस्वस्थता मला जाणवली. दूरचित्रवाणीवरून पाकिस्तानने कारगिलमध्ये केलेल्या घुसखोरीच्या आणि पाकिस्तानी सैन्याबरोबर सुरू असलेल्या चकमकींच्या बातम्या घरच्यांनी ऐकल्या होत्या. एकीकडे युद्धभूमीवर बटालियनचे नेतृत्व करत देशासाठी कर्तव्य बजावत असल्याचा उत्साह मनात निर्माण होत असतानाच दुसरीकडे एका सैनिकाचे कर्तव्य पार पाडत असतानाच मी अप्रत्यक्षपणे एक पती आणि पिता म्हणून माझ्या कर्तव्यात कुसूर करत आहे का, असे द्वंद्वही मनात सुरू होते. यात काहीच शंका नाही, की मला युद्धभूमीवर देशासाठी माझे कर्तव्य बजावायचे होते पण आपण आपल्या मुलांजवळ राहून पालकांची जी कर्तव्ये असतात ती बजावत नसल्याचा अपराधबोध मनात होत होता. मात्र जसजसा मी युद्धाची रणनीती आखण्यात व्यग्र होत गेलो, तसतसे माझ्या मनातील हे द्वंद्व नाहीसे होत गेले आणि मी नेतृत्व करत असलेल्या ८०० सैनिकांना युद्धभूमीवर विजय प्राप्त करून सुखरूप परत मिळण्याची माझ्यावर असणारी जबाबदारी पूर्वीपेक्षाही अधिक स्पष्ट जाणवू लागली.

‘बी कंपनी’कडून हल्ला

सुभेदार हरफुल यांनी २९ मे रोजी संध्याकाळी आठच्या दरम्यान पॉइंट ४८७५ शिखरावर पूर्वेकडून चढाई केली. त्यांची पलटण शिखरापासून केवळ १०० मीटर दूर असताना शत्रूच्या आठ मशिनगनमधून त्यांच्यावर जोरदार गोळीबार झाला. जणू शत्रूने गोळीबाराच्या स्वरूपात एक अभेद्य कुंपणच तयार केले होते. हरफुल यांच्या पलटणीवर अचानक झालेल्या हल्ल्यानंतर आपल्या जवानांनी त्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले आणि दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू झाला. पलटणीचे कमांडर पहिल्यांदाच प्रत्यक्ष युद्धभूमीवर युद्ध लढत असल्याने काहीसे भांबावले होते. सुभेदार हरफुल यांच्या पलटणीपेक्षा शत्रूसैन्याच्या सैनिकांची संख्या जास्त होती आणि त्यांच्या गोळीबाराने आपल्या पलटणीला अक्षरशः घेरले होते. सुभेदार हरफुल यांच्या हाताला गोळी लागली. गोळी लागूनसुद्धा हरफुल शत्रू सैन्यावर जोरदार गोळीबार करतच होते. त्यानंतर त्यांच्या डोक्याला आणि छातीला गोळी लागली आणि ते युद्धात धारातीर्थी पडले. हरफुल यांच्यासह पाच जवानांना या चकमकीत हौतात्म्य प्राप्त झाले, तर सुमारे दहा जण जखमी झाले होते. जीवितहानी आणि जवान जखमी झाल्याने पलटणीला माघारी यावे लागले. माझ्या पलटणीतील जवान इतके रक्तबंबाळ आणि जखमी झाले होते की मला, आपण नक्की कोणाशी लढत आहोत हे विचार करायला भाग पडले. घुसखोरांनी अत्यंत मोक्याच्या जागेवरील ठाणी ताब्यात घेतली होती, याउलट आपल्या जवानांना मात्र कोणत्याही ‘कव्हर’शिवाय शिखरावर खडी चढाई करावी लागणार होती. मी अशा प्रकारच्या परिस्थितीचा पूर्वी कधीच सामना केला नव्हता. शत्रू हा शिखरावर अत्यंत मोक्याच्या ठिकाणी जम बसून आमच्यावर बंदुका रोखून होता आणि आम्ही मात्र डोंगराच्या पायथ्याशी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत होतो. आम्ही कधी हातात सापडतोय याचीच ते घुसखोर वाट पाहत होते.

सैन्यतळाची निर्मिती

आम्ही एक ज्युनियर कमांडिंग ऑफिसर आणि अन्य पाच जणांना गमावले होते. ही एक अत्यंत दुर्दैवी घटना होती, पण निश्चितच यातून आम्ही काही बोधही घेतला होता. जवानांच्या जीविताचा धोका कमी करण्याच्या दृष्टीने आम्ही आमची रणनीती पूर्णपणे बदलली. सर्वांत प्रथम पुढील कारवाई करण्याआधी, पॉइंट४८७५ वर पूर्वेच्या बाजूला मोठ्या प्रमाणात शत्रू सैन्य असल्याचे लक्षात आल्यामुळे शिखराच्या आग्नेय आणि नैऋत्य दिशेने तुकड्या पाठवून शत्रूची विस्तृत माहिती घेण्याचा निर्णय मी घेतला. त्यानुसार माझ्या टेहळणी पथकांनी माहिती काढली की पॉइंट ४८७५ वर आम्हाला सांगितल्याप्रमाणे आठ ते दहा नव्हे, तर ७० ते ८० घुसखोर होते. त्यामुळे पॉइंट ४८७५ ताब्यात घेण्यासाठी तीन बटालियनची आवश्यकता होती. त्यानुसार पाच जूनपर्यंत आम्ही शत्रूला तिन्ही बाजूंनी घेरले होते आणि त्यानुसार आमचे तळ उभारले होते.

‘ए कंपनी’चा शत्रूवर हल्ला

‘ए कंपनी’ असे नाव देण्यात आलेल्या जवानांच्या तुकडीला पिंपल-१ ताब्यात घेण्याचे काम देण्यात आले. मेजर आर. के. सिंह हे या कंपनीचे प्रमुख होते. चार जुलै रोजी रात्री नऊच्या दरम्यान ही कंपनी पिंपल-१वर हल्ला करण्यासाठी निघाली. थोड्याच कालावधीत शत्रूसैन्य आणि आपल्या जवानांमध्ये चकमक सुरू झाली. बॉम्ब आणि मशिनगनमधून होणारा मारा यांनी आकाश एखाद्या ‘लेसर शो’प्रमाणे उजळून निघाले. आम्ही मशिनगनच्या फैरींचा आणि तोफ गोळ्यांचा तो आवाज स्पष्टपणे ऐकू शकत होतो. आपल्या जवानांनी केलेल्या जोरदार हल्ल्यामुळे शत्रूच्या सैन्याला ‘पिंपल-२’कडे मागे सरकावे लागले आणि पाच जुलै रोजी पहाटे पाच वाचता आपल्या सैन्याने पिंपल-१ ताब्यात घेतले. तेथे शत्रू सैन्यातील दोघा घुसखोरांचे मृतदेह आणि एक मशिनगन ताब्यात घेण्यात आली. त्याचप्रमाणे आपल्या सैन्याची देखील मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती. एका जवानाच्या डोळ्यात गोळी लागली होती. त्याच्या चेहऱ्यावरही प्रचंड जखमा झाल्या होत्या. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही दिवसानंतर आमच्या कानावर वृत्त आले, की त्याने त्याची दृष्टी गमावली होती. हे ऐकून आम्हाला अत्यंत दुःख झाले.

‘डी कंपनी’चा हल्ला

‘डी कंपनी’ असे नाव देण्यात आलेल्या जवानांच्या तुकडीला ‘व्हेलबॅक’ ताब्यात घेण्याचे कार्य सोपविण्यात आले होते. मेजर दीपक रामपाल हे या तुकडीचे नेतृत्व करत होते. या तुकडीने देखील चार जुलैच्या रात्री शत्रूवर हल्ला केला. अंदाजे साडेनऊच्या दरम्यान या तुकडीजवळ शत्रूकडून डागण्यात आलेला एक तोफ गोळा फुटला यात एक अधिकारी आणि सहा जवान जखमी झाले. मोहिमेच्या सुरुवातीलाच ही घटना घडल्याने तुकडीचे मनोधैर्य खचणे स्वाभाविक होते. परंतु मी त्यांना आदेश दिले होते ती कोणत्याही परिस्थितीत आपल्याला माघारी फिरायचे नाही. त्यामुळे सर्व प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत या तुकडीने हल्ला केला. पुरेसा प्रतिकार केल्यानंतर शत्रूला याची जाणीव झाली की आता त्यांचा निभाव लागत नाही. त्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागली. पाच जुलैच्या पहाटे ‘व्हेलबॅक’ आपल्या ताब्यात आले होते. शत्रूची तीन ठाणी नष्ट करण्यात आली होती. त्याचप्रमाणे या ठिकाणाहून काही शस्त्रास्त्रे देखील ताब्यात घेण्यात आली होती. शत्रू सैन्यातील काही सैनिकांचे मृतदेहही ताब्यात घेतले होते.

सकाळ झाल्यावर मात्र पॉइंट ४८७५ येथे असणाऱ्या शत्रू सैन्याने व्हेलबॅक ठाण्यावरील आपल्या जवानांवर जोरदार गोळीबार केला. यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. शत्रू सैन्याकडून होणारा गोळीबार, रॉकेट हल्ले आणि तेथील खडकाळ भूभागावर होणारे स्फोट यामुळे आपले जवान अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत होते. तरीदेखील या तुकडीने तिची जागा सोडली नाही. सकाळी सुमारे आठच्या दरम्यान व्हेलबॅक ठाण्यावर सर्वांत आघाडीवर असणाऱ्या लेफ्टनंट समशेर सिंह यांनी पाहिले की डोंगर माथ्यावर शत्रूच्या सैन्यातील सुमारे २० सैनिक आपल्या तुकडीवर प्रतिहल्ला करण्याची तयारी करत आहेत. त्यांच्यातील आणि आपल्या जवानांच्या तुकडीतील अंतर हे अवघे ३०० मीटर एवढे होते. त्यामुळे फॉरवर्ड ऑब्झर्वेशन ऑफिसर कॅप्टन गिल्डियाल यांनी हल्ल्याची तयारी करत असणाऱ्या शत्रूवर जोरदार तोफांचा मारा करावा, असे सुचवले. त्यानुसार शत्रूवर अक्षरशः तोफगोळ्यांचा वर्षाव करण्यात आला. व्हेलबॅक या ठाण्यापासून अवघ्या शंभर मीटर अंतरावर हे तोफगोळे पडत होते आणि शिखरावर असलेले शत्रूसैन्यातील सैनिक पत्त्याचा बंगला कोसळावा तसे उतारावरून खाली कोसळत होते. अशाप्रकारे शत्रूचा प्रतिहल्ला करण्याचा मनसुबा पार उधळून लावण्यात आला.

‘सी कंपनी’चा हल्ला

मेजर रितेश शर्मा यांच्या नेतृत्वाखाली ‘सी कंपनी’ नावाची जवानांची तुकडी सहा जुलै रोजी रात्री पिंपल-२ ताब्यात घेण्यासाठी रवाना झाली. दुर्दैवाने या मोहिमेच्या सुरुवातीलाच शत्रूसैन्याकडून होत असणाऱ्या तोफगोळ्यांच्या माऱ्यामध्ये मेजर रितेश आणि त्यांचे पाच जवान अत्यंत गंभीर जखमी झाले. मी माझ्या मनात अस्वस्थतेला थारा न देता शांतपणे विचार केला आणि कॅप्टन अनुज नय्यर यांच्याकडे नेतृत्व सोपवण्याचा निर्णय घेतला. पिंपल-१ आणि व्हेलबॅक येथून मागे हटलेले शत्रू सैन्य पिंपल-२ येथे मात्र कमालीच्या ताकदीने प्रतिकार करत होते. गोळीबार आणि तोफ गोळ्यांचा मारा होत असतानादेखील कॅप्टन अनुज आणि त्यांची पलटण आगेकूच करत होती. आणखी थोडे अंतर कापल्यानंतर शत्रूच्या चार मशिनगन त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव करून त्यांचा मार्ग अडवू लागल्या. हे सारे अडथळे पार करत शत्रूच्या ठाण्यावर पोहोचवणे अत्यंत आव्हानात्मक होते. सात जुलै रोजी मध्यरात्री एकच्या सुमारास ‘सी कंपनी’ ही पिंपल-२ वर हल्ला करू शकेल एवढ्या अंतरावर पोहोचली. त्यानंतर कॅप्टन अनुज आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शत्रूची तीन ठाणी काबीज केली. मात्र चौथ्या ठाण्यातून शत्रूसैन्याकडून होणाऱ्या गोळीबारामुळे अनुज यांची पलटण तिथेच अडकून पडली. एव्हाना पहाट झाली होती. सात जुलैची पहाटे सुमारे पाचच्या दरम्यान अनुज यांच्या पलटणीशी माझा रेडिओ संपर्क तुटला. माझे अंतर्मन मला सांगत होते की त्यांना काहीतरी अडचण नक्की आली आहे. त्यामुळेच मी ‘बी कंपनी’चे कमांडर मनोज पुनिया यांना त्यांची पलटण घेऊन अनुज यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क प्रस्थापित करण्यास सांगितले. सकाळी सातच्या दरम्यान मनोज त्यांची पलटण घेऊन निघाले. अखेर सकाळी नऊच्या सुमारास मनोज यांच्या पलटणीचा अनुज यांच्याशी संपर्क झाला. अनुज यांनी कोणत्याही परिस्थितीत चौथे ठाणे देखील ताब्यात घ्यायचे या निश्चयाने हल्ला चढवला आणि त्यांच्या गळ्यावर शत्रूच्या गोळ्या लागल्या. ‘‘परत येशील तर विजयी होऊनच ये, शत्रूला कधीही पाठ दाखवू नकोस किंवा शत्रूच्या ताब्यात जाऊन युद्धकैदी होऊ नकोस, किंवा तू परागंदा झाल्याची बातमीही येता कामा नये,’’ हा संदेश होता कॅप्टन अनुज नय्यर यांच्या वडिलांचा. कॅप्टन अनुज नय्यर आदल्याच दिवशी त्यांच्या वडिलांशी बोलले होते तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना हा संदेश दिला होता. अनुज यांचे लग्न ठरले होते. युद्ध संपल्या संपल्या ते लग्न करणार होते. त्यांना नुकतीच बढतीदेखील मिळाली होती. माझ्या हस्तेच युद्धभूमी त्यांना कॅप्टन हे पद देण्यात आले होते. आता हे मी अगदी खात्रीने सांगू शकतो, की अनुज अत्यंत प्रतिष्ठित जीवन जगले आणि माझ्या कल्पनेपेक्षाही जास्त ते त्यांच्या कर्तव्याप्रती एकनिष्ठ राहिले. १५ ऑगस्ट१९९९ रोजी अनुज यांना युद्धकाळात देण्यात येणारा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च सन्मान ‘महावीर चक्र’ प्रदान करण्यात आले. शिखर ताब्यात आल्यानंतर हुतात्मा झालेल्या जवानांच्या पर्थिवांना सैन्य तळावर आणले. स्लिपिंग बॅगमधून गुंडाळून आणलेल्या पर्थिवांना पाहून मन अक्षरशः सुन्न झाले होते. स्ट्रेचरवरून येणाऱ्या जखमी जवानांचे मोडलेले हात - पाय, त्यांच्या शरीरावर झालेल्या खोल जखमा आणि त्या जखमांमुळे होणाऱ्या वेदनेने विव्हळणारे जवान पाहून मी माझ्या भावना रोखू शकत नव्हतो, मात्र तरीही माझा आक्रोश आणि अश्रू मी बाहेर येऊ दिले नाहीत. आपल्या जवानांना अशा अवस्थेत पाहणे असह्य असते. मी स्तब्ध उभा राहून विचार करत होतो की, हे शिखर ताब्यात घेण्यासाठी आपल्याला केवढी मोठी किंमत चुकवावी लागली. मग हळूहळू विजयाचा आनंद मावळला आणि आपल्या जवानांना गमावण्याच्या दुःखात परिवर्तित झाला. एक कनिष्ठ आणि एक वरिष्ठ अधिकारी आणि ३४ जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले होते. १०० हून अधिक जण जखमी झाले होते. विजयासाठी फार मोठी किंमत चुकवावी लागली होती. युद्धानंतर माझ्या सर्व जवानांना सहीसलामत युद्धभूमीवरून परत घेऊन जाण्याचा माझा संकल्प मी पूर्ण करू शकलो नाही याची खंत माझ्या मनात होती.

मात्र, विजय प्राप्त करण्याची अत्यंत धूसर शक्यता असणाऱ्या ज्या परिस्थितीत आणि ज्या शत्रूशी आम्ही लढलो होतो. तेथे प्राणांची आहुती द्यावी लागणार होती, हे वास्तवही नाकारता येणार नाही. परंतु, मी माझ्या जवानांची जीवितहानी रोखू शकलो नाही हे शल्य मला आयुष्यभर राहणार आहे. ‘१७ जाट’मधील जवानांनी केलेले कार्य अतुलनीय असून इतिहासाच्या पानावर ते अजरामर ठरणारे आहे. या कार्याबद्दल आम्हाला तत्काळ ‘सीओएएस युनिट प्रमाणपत्र’, ‘बॅटल ऑनर मश्‍कोह’ आणि ‘थिएटर ऑनर कारगिल’ हे सन्मान मिळाले. त्याचप्रमाणे आमच्या जवानांपैकी एकाला महावीर चक्र, चार जणांना वीरचक्र, सहा सेना मेडल यांसह २० जणांचा विशेष कामगिरीसाठी डिस्पॅचेसमध्ये उल्लेख करण्यात आला. दहा जणांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रमाणपत्रे देण्यात आली.

निष्कर्ष

मानवी समूहाच्या विविध कृतींपैकी सर्वांत विध्वंसक आणि निर्दयी कृती जर कोणती असेल तर ती म्हणजे युद्ध. असे असूनसुद्धा ते लढणाऱ्यांना प्रगल्भतेची आणि एका विचित्र आकर्षणाची अनुभूती देते. युद्ध हे मृत्यू, अपंगत्व आणि भीती यांची अनुभूती देतेच, पण त्याचप्रमाणे बंधुभाव आणि निःस्वार्थ प्रेमाच्या सामर्थ्याची जाणीवही ठळकपणे अधोरेखित करून देते. दुसऱ्यासाठी स्वतःचे प्राण पणाला लावण्याची तयारी हे प्रेमाचेच एक उत्कट स्वरूप आहे

आणि अंतःकरणापासून याचा अनुभव घेणे हे महत्त्वाचे आहे.

(अनुवाद : रोहित वाळिंबे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT