गेल्या निवडणुकीचा विचार केल्यास राज्यात मतांची टक्केवारी पाहता दोन टक्के मतांवरच मदार आहे.
Karnataka Assembly Election 2023 : राज्य निवडणुकीत भाजप, काँग्रेस (Congress), धजद, अन्य इतर पक्ष व अपक्ष असे अनेक उमेदवार रिंगणात उतरून विधानसभेत जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. एकीकडे सर्व पक्षांनी आपले उमेदवार विजयी होण्यासाठी जोर लावला असला तरी उमेदवारांनीही आपल्या विजयासाठी मोठी तयारी केली आहे.
इतके करूनही आजही सर्वेक्षणामध्ये साधारण ५० ठिकाणी अटीतटीची लढत होत असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे या मतदारसंघात जो बाजी मारेल, त्यांची सत्ता येईल, असाही एक कयास आहे. २०१८ च्या निवडणुकीत तब्बल ४० उमेदवार ५ हजारांच्या अंतरामध्ये पराभूत झालेले आहेत.
१३ मतदारसंघांत केवळ २५०० पेक्षा कमी मतांनी पराभव स्वीकारावा लागला आहे. तर १,००० पेक्षा कमी मतांनी पराभूत झालेले पाच उमेदवार होते. या गणिताने विचार केल्यास काहीशी मते वाढविली तरी पक्षाला व उमेदवाराला त्याचा फायदा होतो. त्यामुळे दोन्ही पक्ष व उमेदवारांच्या पारंपरिक मतांपेक्षा महत्व असलेल्या त्रयस्थ मतदारांना महत्व नक्कीच आले आहे.
गेल्या निवडणुकीचा विचार केल्यास राज्यात मतांची टक्केवारी पाहता दोन टक्के मतांवरच मदार आहे. गेल्यावेळी निवडणुकीची आकडेवारी पाहिली, तर याची प्रचीती येते. २०१८ च्या निवडणुकीत काँग्रेसने अधिक मते घेतली, तरीही त्यांना शंभरचा आकडा ओलांडता आलेला नाही. दोन दशकांत म्हणजेच वीस वर्षांची सरासरी पाहिल्यास ३० ते ३५ टक्क्यांपर्यंतच सत्तेवर आलेल्या पक्षांना मते मिळाली आहेत. कुठल्याही पक्षाला राज्यात मतांची टक्केवारी ४० पर्यंत घेऊन जाता आलेली नाही.
कुठल्याही पक्ष अथवा उमेदवारांची मते ही ८५ ते ९० टक्के असतात. तर १० ते १५ टक्के हे मतदार तटस्थ असतात. त्या मतांवरच चित्र पालटत असते. नेहमी आपल्या नेत्याला व पक्षाला मतदान करणारा एक गट असतो. तो गट कायम राहतो. उमेदवार कोणी असले तरी ठराविक विरोधक असताताच. अशा स्थितीत महत्व येते, ते १० ते १५ टक्के त्रयस्थ मतदारांवर. त्यामुळे अशा मतदारांवर अनेकदा उमेदवारांचे व सरकारचेही भविष्य बदलते.
निवडणुकीचा कल, वातावरण व विचार करून मतदान करणाऱ्या १० ते १५ टक्के मतांचा कोणत्याही राजकीय पक्षांनी व नेत्यांनी गंभीरपणे विचार केलेला नाही. त्यामुळे या निर्णायक मतांचा खेळ महत्वाचा ठरतो, असे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.