Karnataka Election Result sakal
देश

Karnataka Election Result : राज्यात सलग दुसऱ्यांदा सत्तेवर येण्याचे भाजपचे स्वप्न धुळीला

काँग्रेसला ‘संजीवनी’; कर्नाटकात सत्तांतर; भाजपचा दणदणीत पराभव

सकाळ वृत्तसेवा

बंगळूर : देशभरात अपवाद वगळता सत्तेला पारखे झालेल्या काँग्रेस पक्षाला कर्नाटकात मिळालेल्या विजयाने आज नवसंजीवनी मिळाली. येथील विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला चारीमुंड्या चित करत काँग्रेसने १३६ जागांवर विजय मिळवित बहुमतासाठी आवश्‍यक असलेला ११३ जागांचा आकडाही सहज पार केला.

या पराभवाने दक्षिणेत हाती असलेले एकमेव राज्य भाजपने गमावले. राज्यात सलग दुसऱ्यांदा सत्तेवर येण्याचे भाजपचे स्वप्न येथील जनतेने धुळीला मिळवित दर पाच वर्षांनी सत्ताबदल करण्याची प्रथा कायम ठेवली. दुसरीकडे किंगमेकर होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या धर्मनिरपेक्ष जनता दलालाही मतदारांनी सपशेल नाकारल्यामुळे त्यांचा अपेक्षाभंग झाला. सीमा भागामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीने दिलेली एकाकी झुंज अपयशी ठरली.

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणारी कर्नाटकमधील विधानसभा निवडणूक भाजप आणि काँग्रेसने प्रतिष्ठेची केली होती. राज्यातील विधानसभेच्या २२४ जागांसाठी १० मे रोजी मतदान झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह भाजपच्या सर्व दिग्गजांनी कर्नाटकात झंझावाती प्रचार केला होता.

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि प्रमुख नेते बी. एस. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ही निवडणूक लढविली असली तरी पंतप्रधान मोदी हेच भाजपचा चेहरा होते. मात्र काँग्रेसने राहुल गांधी, प्रियंका गांधी,

माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि डी. शिवकुमार यांच्या माध्यमातून नियोजनबद्ध प्रचार करत विजयश्री खेचून आणली. भाजपच्या भ्रष्ट कारभाराच्या मुद्द्यांवर बोट ठेवत काँग्रेसने केलेल्या आवाहनास कर्नाटकातील जनतेने जोरदार प्रतिसाद देताना धार्मिक प्रचाराला सपशेल नाकारले. सत्ताधारी भाजपच्या १३ मंत्र्यांना पराभवाची चव चाखावी लागली.

कर्नाटकात १० मे रोजी मतदान झाल्यानंतर आज सकाळी मतमोजणीला प्रारंभ झाला. पहिल्या तासातच काँग्रेसने राज्यभरात जोरदार मुसंडी मारली आणि भारतीय जनता पक्षाला जोरदार धक्का देत राज्यात सत्ता काबीज करण्याच्या दिशेने दमदार पाऊल टाकले.

निकालाचे कल स्पष्ट होत गेले आणि पाहता पाहता काँग्रेसची बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. ही विजयी आघाडी काँग्रेसने अखेरपर्यंत टिकविली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेले जगदीश शेट्टर यांना पराभव स्वीकारावा लागला, तर लक्ष्मण सवदी यांना आपला गड राखण्यात यश मिळाले.

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, डी. के. शिवकुमार यांना आपापल्या मतदारसंघात विजय मिळाला. धारवाड ग्रामीणचे काँग्रेसचे उमेदवार विनय कुलकर्णी यांनी मतदारसंघात एकदाही न जाता विजय मिळविण्याची किमया साधली. नागरिकांनी तदानोत्तर चाचण्यांमध्ये अपवाद वगळता त्रिशंकू विधानसभेचा अंदाज वर्तविण्यात आला होता, प्रत्यक्षात मात्र काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवित सर्वांनाच मोठा धक्का दिला.

निवडणुकीच्या प्रचारात बजरंग दल, चार टक्के कमिशन, ओबीसी मुस्लिमांना आरक्षण, हिजाबचा मुद्दा, भ्रष्टाचार हे मुद्दे गाजले. या मुद्द्यांवरच लक्ष केंद्रीत करत काँग्रेसने भाजपविरोधात रान उठविले होते. तसेच, काँग्रेसने महिला, बेरोजगार युवक, गरीब यांच्यासाठी विविध योजना आणण्याचे आश्‍वासन दिले होते. त्याचाही परिणाम निकालावर झाल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

देशभर आनंद साजरा

काँग्रेसच्या कर्नाटकमधील विजयाचा आनंद देशभरातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी साजरा केला. निकालाचे चित्र स्पष्ट होऊ लागताच पक्षाच्या कार्यालयांमध्ये काँग्रेस कार्यकर्ते जमू लागले. त्यांनी फटाके फोडून, एकमेकांना मिठाई भरवून आणि ढोल-ताशे वाजवत जल्लोष केला. देशभरातील कार्यकर्त्यांनी या विजयाचे श्रेय राहुल गांधी यांनाच दिले.

विविध ठिकाणी त्यांची छायाचित्रे घेऊन कार्यकर्ते नाचताना दिसत होते. काही कार्यकर्त्यांनी राहुल यांच्या छायाचित्राला मिठाई भरविली, तर काही ठिकाणी रंग लावण्यात आला. नवी दिल्लीतील काँग्रेसच्या मुख्यालयात प्रचंड उत्साहाचे वातावरण होते.

जनता जनार्दनाचा विजय : खर्गे

कर्नाटकमधील हा विजय जनता जनार्दनाचा विजय असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिली. ‘आमच्या कार्यकर्त्यांनी एकजुट होऊन काम केले आणि लोकांनी आम्ही दिलेल्या आश्‍वासनांवर विश्‍वास ठेवून मतदान केले, असे खर्गे म्हणाले.

विजयाबद्दल काँग्रेसचे अभिनंदन. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांना शुभेच्छा. निवडणुकीत आम्हाला समर्थन देणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो. भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कष्टाचेही मला कौतुक आहे. येणाऱ्या काळात आपण कर्नाटकची अधिक जीव ओतून सेवा करू.

- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

काँग्रेसला भाजपपेक्षा दुप्पट जागांवर यश आले आहे. भाजपचा सपशेल पराभव करण्याची भूमिका कर्नाटकच्या जनतेने घेतली. सत्तेचा, साधनांचा गैरवापर आणि फोडाफोडी करुन आपण राज्य करु शकतो, याबाबत सत्ताधाऱ्यांना असलेला विश्वास, याविरोधात जनतेमधून तीव्र प्रतिक्रिया उमटली.

- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: हा ऐतिहासिक विजय, जनतेचे आभार- शिंदे

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT