लता मंगेशकरांच्या निधनानंतर पहिलाच पुरस्कार पंतप्रधान मोदींना जाहीर झाला आहे.
मुंबई : मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा (Lata Dinanath Mangeshkar Award) पहिला लता मंगेशकर (Lata Mangeshkar) पुरस्कार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. तसंच प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे Rahul Deshpande (भारतीय संगीत) यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा २४ एप्रिल रोजी माटुंगा येथील श्री षण्मुखानंद हॉल इथं पार पडणार आहे. दीनानाथ मंगेशकर यांचा २४ एप्रिल हा स्मृतीदिन असून त्यानिमित्तानं या पुरस्कारांचं आयोजन करण्यात आलं आहे.
या वर्षी ६ फेब्रुवारी रोजी भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानं आमच्या कुटुंबावर सर्वात मोठा दुःखद प्रसंग कोसळला. कुटुंब आणि ट्रस्ट (कुटुंबातील सर्व सदस्य प्रतिष्ठानचे विश्वस्त आहेत). प्रतिष्ठानने भारतरत्न लतादीदींच्या स्मरणार्थ आणि स्मृतीप्रित्यर्थ यावर्षीपासून पुरस्कार देण्याचे ठरवले आहे. हा पुरस्कार "लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार" म्हणून ओळखला जाईल आणि तो दरवर्षी दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मृतिदिनी म्हणजे २४ एप्रिल रोजी प्रदान केला जाणार आहे.
यंदा मास्टर दीनानाथजींचा ८० वा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त आम्ही "लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार"ची घोषणा करीत आहोत. हा पुरस्कार दरवर्षी देशासाठी, लोकांसाठी आणि समाजासाठी अतुलनीय, नेत्रदीपक आणि अनुकरणीय योगदान देणाऱ्या फक्त एकाच व्यक्तीला दिला जाईल. हा पहिला पुरस्कार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. ते आमचे सर्वात आदरणीय नेते आहेत. भारताला जागतिक नेतृत्वाच्या वाटेवर नेणारे ते एक आंतरराष्ट्रीय राजकारणी आहेत. त्यांच्या नेतृत्वात देशाने प्रत्येक बाबतीत नेत्रदीपक प्रगती केली आहे, हजारो वर्षांच्या गौरवशाली इतिहासात आपल्या महान राष्ट्राने पाहिलेल्या महान नेत्यांपैकी ते खरोखरच एक आहेत आणि हा पुरस्कार स्वीकारल्याबद्दल आमचे कुटुंब आणि ट्रस्ट त्यांचे आभार मानते, असं पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी यावेळी सांगितलं.
पुरस्कार प्राप्त नामवंतांची यादी खालीलप्रमाणे
१. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार- माननीय नरेंद्र मोदी (विशेष वैयक्तिक पुरस्कार)
२. मास्टर दीनानाथ पुरस्कार- राहुल देशपांडे (भारतीय संगीत)
३. मास्टर दीनानाथ पुरस्कार- (विशेष पुरस्कार) आशा पारेख (चित्रपट क्षेत्रात समर्पित सेवा)
४. मास्टर दीनानाथ पुरस्कार- (विषेश पुरस्कार) जॅकी श्रॉफ (चित्रपट क्षेत्रात समर्पित सेवा)
५. मास्टर दीनानाथ पुरस्कार- (आनंदमयी पुरस्कार) मुंबईचे डबेवाले (नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्ट) समाजसेवेच्या क्षेत्रात समर्पित सेवा.
६. सर्वोत्कृष्ट नाटक पुरस्कार- संज्या छाया
या वेळी "स्वरलतांजली" या संगीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. सुप्रसिद्ध गायक रूपकुमार राठोड यांच्याद्वारे हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमात आपल्या लाडक्या माननीय लता दीदींच्या अमर सुरांना आणि आठवणींना श्रद्धांजली अर्पण करण्यात येईल. रूप कुमार राठोड, हरिहरन, आर्या आंबेकर, रीवा राठोड, प्रियांका बर्वे, मधुरा दातार आणि विभावरी आपटे या आपल्या मधुर संगीतांनी लतादीदींची गाणी सादर करणार आहेत.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक कालिना येथील मुंबई विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये होणार आहे. राज्य सरकारने याबाबतचा निर्णय जाहीर केलेला आहे. त्या जागेवर लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालय असे नामफलक उभारणीचा कार्यक्रम 24 एप्रिल रोजी होणार आहे. हृदयनाथ मंगेशकर म्हणाले, की आम्ही 24 एप्रिल रोजी लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालय असा नामफलक कालिना येथील मुंबई विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये लावणार आहोत.
पं. हृदयनाथ मंगेशकर (Hridaynath Mangeshkar) म्हणाले, की लतादीदींना नरेंद्र मोदी बहीण मानायचे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या उद्घाटन सोहळ्याला नरेंद्र मोदी आलेले होते. तेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. दीदींनी त्यावेळी नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली होती. लतादीदी ही सरस्वती होती. तिच्या मुखातून उमटलेले हे शब्द खरे ठरले. त्यामुळे नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार द्यावा हे आम्ही आमचे कर्तव्यच समजतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.