नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाला बाजूला सारत विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार करत आहेत. तशा हालचाली देखील दिसून येत आहेत. आज मंगळवारी शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी वेगवेगळ्या राजकीय नेत्यांची तसेच बिगर राजकीय नेत्यांची बैठक पार पडत आहे. या बैठकीमध्ये काँग्रेस पक्षाला वगळण्यात आल्यामुळे तिसऱ्या आघाडीची ही तयारी सुरु आहे का? असा सवाल सध्या चर्चेत आहे. या बैठकीला आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, आरजेडी, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे नेते आणि काही पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि माजी नोकरशहा देखील उपस्थित आहेत. यशवंत सिन्हा यांनी ट्वीट करून आज मंगळवारी शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्र मंचची बैठक होणार असल्याचं म्हटलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीमध्ये भाजप पक्षातून तृणमूल काँग्रेसमध्ये गेलेले यशवंत सिन्हा, काँग्रेसमधून निलंबन झालेले संजय झा, सीपीआयचे खासदार बिनॉय विश्वम, अरुण कुमार, घनश्याम तिवारी, माजिद मेमन, वंदना चव्हाण, राज्यसभेचे माजी खासदार पवन वर्मा, ज्येष्ठ वकील आणि काँग्रेसचे छत्तीसगडमधून राज्यसभेचे खासदार के. टी. एस तुलसी, आपचे खासदार सुशील गुप्ता उपस्थित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे देखील बैठकीमध्ये उपस्थित आहेत. वरील राजकीय नेत्यांव्यतिरिक्त या बैठकीमध्ये लेखक जावेद अख्तर, सुधींद्र कुलकर्णी, इराणमधील भारताचे निवृत्त राजदूत के. सी. सिंह, सर्वोच्च न्यायालयातील वकील आणि मानवी हक्क लॉ नेटवर्क संस्थेचे संस्थाचालक कॉलिन गोन्साल्विस, समाजवादी पक्षाचे प्रवक्ते घनश्याम तिवारी, शिवसेनेकडून राज्यसभेवर गेलेले प्रितिश नंदी, रविंदर मनचंदा, अर्थतज्ज्ञ अरुण कुमार, माजी खासदार निलोलपल बासू, निवृत्त न्यायमूर्ती एपी शहा उपस्थित आहेत.
बिगर भाजप आणि बिगर काँग्रेस पक्ष एकत्र येत 2024 साली देशाला नरेंद्र मोदींना पर्याय देऊ शकतील, असा कयास या साऱ्या प्रयत्नांमागे बांधला जातोय. मात्र, जर असं काही प्रत्यक्षात साकारलं तर काँग्रेसच्या नेतृत्वातील पुरोगामी लोकशाही आघाडी आपोआपच बरखास्त होईल. कारण या बैठकीमध्ये काँग्रेसला बाजूला ठेवण्यात आलं आहे.
2024 च्या येत्या निवडणुकीमध्ये शरद पवार हे नरेंद्र मोदी यांच्यासमोरचे पंतप्रधान पदाचे दावेदार असतील का? 'राष्ट्रमंच' च्या माध्यमातून यासाठीचीच मोट बांधण्यात येतेय का, असे सवाल उपस्थित होत आहेत. काँग्रेस आणि पर्यायाने राहुल गांधी मोदींवर तगडं आव्हान ठरु शकत नाहीत. मात्र, राजकारणातील मात्तबर असलेले शरद पवार अधिक अनुभवी आणि मुरलेले राजकारणी आहेत, तसेच ते अधिक परिपक्वरित्या मोदींना टक्कर देऊ शकतात, अशा चर्चा आहेत.
काल सोमवारी शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची भेट झाली होती. त्यानंतर आज लगेचच राष्ट्र मंचची ही बैठक होत आहे. त्यामुळे या बैठकीचा आणि प्रशांत किशोर यांच्यासोबत शरद पवारांच्या त्या भेटीचा अंतर्गत संबंध असल्याची चर्चा सुरु आहे. या दोन्ही बैठकींचा परस्परांशी संबंध नसल्याची माहितीही मिळत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.