लोकसभा निवडणुकीतील सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील जागांवर 1 जून रोजी मतदान होणार आहे. तर निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी लागणार आहे. या दरम्यान देशभरात सर्वत्र निकालाची उत्सुकता निर्माण झाली आहे.
अशात 1 जून रोजी शेवटच्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर सायंकाळी सर्वच राज्यातील लोकसभा जागांचे एक्झिट पोल जाहीर होणार आहेत.
यामध्ये महाराष्ट्रातील 48 जागांवरही काय सांभाव्य निकाल लागू शकतो याचा अंदाज येणार आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये ही निवडणूक पार पडली आहे. तसेच गेल्या काही काळात दोन पक्ष फुटल्यामुळे इथे काय निकाल लागणार याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.
दरम्यान आता आपण 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये कोणत्या एक्झिट पोलचे अंदाज बरोबर आणि कोणाचे अंदाज फोल ठरले होते, ते जाणून घेऊ.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजप सत्तेत येणार असल्याचे सांगितले होते. सर्वच एक्झिट पोल्सनी एनडीएला प्रचंड बहुमत मिळेल याचा अंदाज वर्तवला होता.
एक्झिट पोलचे निकाल विशेषत: काँग्रेससाठी अत्यंत निराशाजनक होते. त्यावेळी काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील युपीए आघाडीची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती. आणि एक्झिट पोलमध्ये हे वर्तवण्यातही आले होते.
2019 च्या सर्व एक्झिट पोलमध्ये दोन एक्झिट पोल वगळता, साधारणपणे प्रत्येक एक्झिट पोलने भाजप आणि त्याचे मित्र पक्ष 300 पेक्षा अधिक जागा जिंकत असल्याचे दाखविले होते. तर काँग्रेस तीन आकडी जागाही जिंकणार नसल्याचे तर यूपीएला 100 ते 120 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. भाजपनंतर सर्वाधिक जागा मिळवणारा काँग्रेस हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरेल असेही सांगितले होते.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत शेवटच्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर देशातील सर्व जागांवरचे एक्झिट पोल दाखवण्यात आले होते.
यामध्ये न्यूज 18-इप्सॉसच्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला 336 जागा, यूपीएला 82 तर इतर 124 जागा जिंकतील असा अंदाज वर्तवला होता.
टाइम्स नाऊ-व्हीएमआरने आपल्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला 306, यूपीएला 132 आणि इतरांना 104 जागा दिल्या होत्या.
न्यूज नेशनने आपल्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला 282 ते 290 जागा दिल्या होत्या. यूपीएकडे 118 ते 126 जागा जातील असे म्हटले जात होते. त्यांनी इतरांना 130 ते 138 जागा मिळतील असे सांगितले होते.
न्यूज 24-चाणक्य पोलमध्ये एनडीएला 350 जागा देण्यात आल्या होत्या. तर यूपीएला ९५ तर इतरांना ९७ जागा दाखविण्यात आल्या होत्या.
न्यूजएक्सने एनडीएला सर्वात कमी 242 जागा दिल्या होत्या. यूपीएला 162 तर इतरांना 136 जागा दाखवल्या होत्या.
इंडिया टीव्ही-सीएनएक्सच्या एक्झिट पोलमध्येही एनडीएला ३०० जागा मिळतील असा अंदाज वर्तावला होता. तर यूपीएला १२० तर इतरांना १२२ जागा दाखवण्यात आल्या होत्या.
2019 मध्ये देशभरात सात टप्प्यांत निवडणुका झाल्या होत्या. तर 23 मे 2019 रोजी 542 जागांवर झालेल्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले होते.
एक्झिट पोलचे अंदाज जवळपास खरे ठरले आणि भारतीय जनता पक्ष सलग दुसऱ्यांदा स्वबळावर सत्तेवर आला. भाजपने सर्वाधिक 303 जागा जिंकल्या.
विरोधी पक्षांमध्ये काँग्रेसला केवळ 52 जागा मिळाल्या. याशिवाय तृणमूल काँग्रेसचे 22, बसपचे 10, सीपीआयचे 2, सीपीआय(एम)चे 3 आणि राष्ट्रवादीचे 5 खासदार विजयी झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.