नवी दिल्ली : दिल्लीतील रामलीला मैदानावर ३१ मार्चला झालेल्या ‘इंडिया’ आघाडीच्या संयुक्त सभेमुळे विरोधी पक्षांचा आत्मविश्वास वाढला आहे. १९ एप्रिलला होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या आधी पुन्हा एकदा अशाच प्रकारचे ऐक्यदर्शन घडविण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचे समजते. अर्थात, यासाठी संयुक्त पत्रकार परिषद किंवा मेळावा यासारख्या पर्यायावर चाचपणी सुरू असल्याचेही कळते.
‘इंडिया’ आघाडीच्या सूत्रांनी सांगितले, रामलिला मैदानावरील संयुक्त सभेमुळे विरोधी पक्षांच्या नेत्यांमधील जागा वाटपावरून असलेले मतभेद संपुष्टात आले असून ऐक्याची प्रक्रिया अधिक मजबूत झाली आहे.
संयुक्त जनता दलाचे नेते नितीशकुमार यांचे भाजपसोबत जाणे, पाठोपाठ लोकदलाचे नेते जयंत चौधरी यांची भाजपसोबतची हातमिळवणी, त्यात पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस व काँग्रेस यांच्यात जागा वाटपावरून सुरू असलेली कुरघोडी तर केरळमध्ये डावी आघाडी आणि काँग्रेसचा संघर्ष यामुळे ‘इंडिया’ आघाडी विखुरणार, असे चित्र तयार झाले होते. असे असताना केजरीवाल यांच्या समर्थनार्थ रामलिला मैदानावर सर्व विरोधी पक्षांचे एकत्र आल्याने एकजुटीचा संदेश मतदारांपर्यंत गेल्याकडे या सूत्रांनी लक्ष वेधले. केरळमध्ये आघाडीतील पक्ष परस्परांविरुद्ध तर पश्चिम बंगालमध्ये मैत्रीपूर्ण लढत हे अपवाद वगळता महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, तमिळनाडू या राज्यांमध्ये आघाडी झाली आहे. त्यामुळे मतदानाच्या आधी एक संयुक्त शक्तीप्रदर्शन करावे, असा विचार सुरू असल्याचाही पुनरुच्चार सूत्रांनी केला.
भाकपची नाराजी दूर करणार
केरळच्या वायनाडमध्येडी राजा यांच्या पत्नी अॅनी राजा भाकपच्या उमेदवार आहेत. त्यांची लढत राहुल गांधींशी आहे. वायनाड उमेदवारीबाबत भाकपने विचारणा करूनही राहुल गांधींनी आधी स्पष्टता दर्शविली नसल्याने डी. राजा हे नाराज होते. राहुल गांधींनी भाजपविरुद्ध लढायला हवे होते. त्यांचा संघर्ष भाजपशी आहे की भाकपशी आहे, अशी विचारणा डी. राजा यांनी केली होती. त्यापार्श्वभूमीवर राहुल गांधींनी सभेच्या व्यासपीठावर राजा यांना अजूनही नाराज आहात काय?, असे विचारून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.
आप-काँग्रेसचा समन्वय वाढला
आम आदमी पक्षाचे पहिल्या आणि दुसऱ्या फळीचे नेते तुरुंगात असल्याने रामलिला मैदानावरील सभेसाठीच्या तयारीसाठी विरोधी पक्षाच्या नेत्यांशी संपर्काची जबाबदारी आपचे तिसऱ्या फळीचे नेते आतिशी, सौरभ भारद्वाज हे सांभाळत होते. या नेत्यांचा काँग्रेसअध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधींशी त्यांचा थेट संपर्क झाल्याने आप आणि काँग्रेसमध्ये समन्वय वाढण्यास यामुळे मदत झाली.
सहमतीनेच पाच मागण्या
रामलिला मैदानावरील सभेत प्रियांका गांधींनी या सभेत ‘इंडिया’ आघाडीतर्फे पाच मागण्या मांडल्या. या मागण्याही सर्व पक्षांच्या सहमतीने तयार करण्यात आल्या होत्या. त्यात जाणीवपूर्वक अरविंद केजरीवाल केजरीवाल आणि हेमंत सोरेन यांच्या सुटकेच्या मागणीचा क्रम नंतरचा ठेवला होता. सोबतच, भूतकाळातील केजरीवाल यांनी केलेल्या गंभीर आरोपांची पार्श्वभूमी असूनही सोनिया गांधींनी सभेमध्ये पूर्णवेळ हजेरी लावून सुनीता केजरीवाल आणि कल्पना सोरेन यांच्याशी संवाद साधल्याचे सूत्रांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.