लोकसभेच्या निवडणुका भाजपसाठी अत्यंत महत्त्वाच्या असल्याने धजदसोबत युती करून अधिक जागा जिंकण्याचा भाजपचा विचार आहे.
बंगळूर : आगामी लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) भाजप आणि धजद पक्षांची युती होणार असल्याच्या बातम्या पसरत असतानाच, दोन्ही पक्षांत युतीला अंतर्गत विरोध आहे. याचा फायदा घेण्यासाठी काँग्रेस पुढे आला असून, आघाडीला विरोध करणाऱ्या धजदच्या आमदारांना आपल्याकडं खेचण्यासाठी काँग्रेसनेही रणनीती आखली आहे.
त्यामुळे आगामी काळात राज्याच्या राजकारणाची दिशा बदलणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवल्यामुळे काँग्रेस (Congress) पक्षाला लोकसभा निवडणुकीत राज्यात जास्त जागा जिंकता येतील, असे वातावरण आहे.
काँग्रेसला ही संधी न देण्याच्या उद्देशाने भाजप-धजदने युती करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत भाजप नेत्यांनी कुमारस्वामी यांच्याशी चर्चा करण्याचे ठरवले आहे. आज मंगळवारी (ता. १८) नवी दिल्लीत एनडीएच्या मित्रपक्षांची बैठक होणार आहे. भाजप नेते या बैठकीला धजदला निमंत्रित करण्याचा विचार करत आहेत.
निमंत्रण दिल्यास कुमारस्वामी या बैठकीला उपस्थित राहण्यास तयार आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांमध्ये युती होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यात या दोन्ही पक्षांच्या युतीवरून मतभेद असल्याचे चित्र आहे. अनेकांना युती नको आहे.
लोकसभा निवडणुकीत ही युती मदत करू शकते, मात्र राज्याच्या पुढील राजकारणात ती घातक ठरू शकते, असे ते सांगत आहेत. धजद नेते कुमारस्वामी (Kumaraswamy) यांनी आपल्या आमदारांना भविष्यासाठी युती करूया, असे समजावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. दरम्यान, भाजपमध्येही धजदसोबत मैत्री करण्यास राज्यांतर्गत मोठा विरोध असल्याचे दिसून येत आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजप-धजद युती होण्याची शक्यता जास्त असताना काँग्रेस पक्षानेही आपली राजकीय रणनीती आखली असून, भाजपसोबतच्या युतीच्या विरोधात असलेल्या धजद आमदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी धजदमधील प्रभावशाली नेत्यांच्या माध्यमातून धजदच्या आमदारांना काँग्रेसकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.
सुमारे १२ धजद आमदारांना काँग्रेसमध्ये आणून काँग्रेसने या आमदारांना पक्षांतरबंदी कायद्यापासून वाचवण्याची रणनीती आखली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी धजदच्या प्रभावशाली नेत्यांसह ३-४ धजद आमदारांना मंत्रिपदे आणि महत्त्वाच्या महामंडळांवर नियुक्ती देण्याबाबत काँग्रेस नेत्यांशीही चर्चा केली आहे. योग्य वेळ पाहून काँग्रेस धजदच्या आमदारांना पक्षात आकर्षित करेल, अशी चर्चा आहे.
लोकसभेच्या निवडणुका भाजपसाठी अत्यंत महत्त्वाच्या असल्याने धजदसोबत युती करून अधिक जागा जिंकण्याचा भाजपचा विचार आहे, त्याचप्रमाणे धजद भाजपसोबत युती करून लोकसभेच्या किमान ४-५ जागा जिंकण्याचा विचार करत आहे.
या आघाडीला कडाडून विरोध करणारा एकही मजबूत नेता राज्य भाजपमध्ये नाही. ही वस्तुस्थिती युतीच्यादृष्टीने फायद्याची ठरणार आहे. धजदलाही राज्यात स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी युतीची गरज भासत आहे. आता लवकरच यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
कुमारस्वामी यांच्याशी युती झाल्यास जुन्या म्हैसूर भागातील पक्षाचा प्रभाव कमी होईल. तसेच आम्ही वक्कलिगाची व्होट बँक गमावू. विशेषतः वक्कलिगा समाजातील नेत्यांनी युती नको, असे म्हणत युतीला अंतर्गत विरोध व्यक्त केला आहे. मात्र, हायकमांडसमोर बोलण्याची हिंमत त्यांच्यापैकी कोणाचीच नाही. त्यामुळे काहीच करू शकत नाहीत, अशा स्थितीत ते आहेत. त्यामुळेच कुमारस्वामी यांनी राज्यातील नेत्यांना सोडून भाजपच्या केंद्रीय नेत्यांशी युतीची चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे.
माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी लोकसभा निवडणुकीसाठी धजदसोबत युती करणे, हे पक्षाच्या वरिष्ठांवर अवलंबून असल्याचे सांगितले. धजदसोबत युती करण्याबाबत वरिष्ठच निर्णय घेतील, असे एका प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले. हुबळी येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, 'माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी युतीबद्दल काही भावना व्यक्त केल्या आहेत. निवडणुकीतील निकालाच्या आधारे पुढील राजकीय घडामोडी घडतील. '
आज (ता. १८) बंगळूर येथे होणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीबाबत बोलताना ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव झाला पाहिजे, यासाठी सर्व विरोधी पक्षांचे नेते एकवटले आहेत. हे शक्य नाही, विरोधकांकडे स्वतःची ताकद नाही, विशिष्ट कार्यक्रम नाही, पंतप्रधान मोदींना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळत आहे. विरोधी पक्ष म्हणून संबंधित राज्यातील काही प्रादेशिक पक्ष काम करत आहेत. त्यामुळे विरोधी आघाडी स्थापनेचा राजकीय लाभ कोणत्याही पक्षाला मिळणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.