Lokshahir Patthe Bapurao esakal
देश

Lokshahir Patthe Bapurao Death Anniversary : जेव्हा शाहुमहाराजांनी सोन्याची सलकढी पठ्ठे बापूरावांच्या हातात घातली!

कोल्हापूरच्या राजदरबारानं सोन्याची सलकडी बहाल करून सन्मान केला होता

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्राच्या लोककलांचे खरे वैभव म्हणजे तमाशा. बहुजनांच्या उद्‍बोधन आणि रंजनाचे काम करणारा तमाशा अठराव्या शतकात रुजला असला, तरी एकोणिसाव्या शतकाच्या मध्यकालापासून विसाव्या शतकाच्या मध्यकालापर्यंत खऱ्या अर्थी तमाशा बहरला. याच काळात एक ब्राह्मण व्यक्ती आवड म्हणून या क्षेत्रात येतो काय आणि एक दोन नव्हे तर दोन लाखांहून अधिक गाणी लिहीतो काय?, हे सारं अचंबित करणारेच आहे. या अवलियाचे नाव आहे पठ्ठे बापूराव अर्थात श्रीधर कृष्ण कुलकर्णी होय. त्यांची आज पुण्यतिथी. त्यानिमित्ताने त्यांचा जीवनपट उलगडूया.

पठ्ठे बापूराव यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाळवा तालूक्यातील रेठरे हरणाक्ष या गावी झाला. त्यांचे मुळचे नांव श्रीधर कृष्ण कुलकर्णी असे होते. त्यांचा जन्म ११ नोव्हेंबर १८६८ रोजी झाला. लहानपणापासूनच श्रीधरला तमाशाचा नाद होता. त्यांची घरची परिस्थिती गरिबीची होती. आई-वडिलांनी श्रीधरला शाळेत घातले. त्याचवेळी त्यांना कविता करण्याचा छंद लागला. व त्यांचा गळाही अतिशय सुंदर होता.

मराठी, इंग्रजी आणि संस्कृत अशा भाषांवर पठ्ठे बापूरावांचे प्रभुत्व होते. औंध आणि बडोद्याच्या संस्थानांमध्ये पठ्ठे बापूरावांनी शिक्षण घेतले. बडोद्याच्या संस्थानात असताना त्यांना तमाशा पाहण्याचा छंद लागला. हरणाक्ष रेठऱ्याला आल्यावर ते महारवाड्यात जाऊन तमाशे पाहू लागले. पुढे तमाशाचा नादच त्यांना लागला. या नादातच त्यांनी गण, गौळणी, लावण्या अशा रचना करण्यास सुरुवात केली. एकदा करवीर संस्थानचे राजर्षी शाहू महाराज यांनीही या कलेच्या भक्ताचा गौरव केला आहे. काय आहे तो किस्सा पाहुयातय

राजर्षी शाहू महाराज यांनी आपल्या अल्पायुष्यात प्रजेच्या कल्याणासाठी अनेक सुधारणा केल्या. सर्वांगीण जडण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. ते जाणते आणि अष्टावधानी व चतुरस्त्र राजे होते. उपेक्षितांच्या जीवनात चैतन्य निर्माण करण्याची धारणा त्यांनी ध्येय म्हणून स्वीकारली होती. सर्व कलांची त्यांना विलक्षण जाग होती. त्यांनी कोल्हापूरला तर खऱ्या अर्थाने कलापूर केले. कलांना आणि कलाकारांना उदार आश्रय दिला. कलावंतांना प्रोत्साहन दिले. संगीत, नाट्य, शिल्पकला, चित्रकला, वादनकला, मल्लविद्या इत्यादी कलांचा तर वैभवाचा काळ निर्माण झाला.

महाराजांनी नाटक मंडळी, सत्यशोधक जलसे, तमाशा, शाहिरी यांना प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. राजर्षी शाहू महाराजांनी भाऊ फक्कड या तमासगिराला अत्यंत आदराने आश्रय दिला. लहरी हैदर या लावणीकार शाहिराला जवळ बाळगले. १९०८-९च्या दरम्यान तमाशा क्षेत्रात चमकणाऱ्या शाहीर पठ्ठे बापूराव यांना खास मुंबईहून बोलावून घेतले त्यांचा तमाशा राजदरबारात भरविला. पठ्ठे बापूराव यांनी 'मीठा राणी' हा आपला वग शानदारपणे सादर केला. त्यावेळी महाराज आणि राणीसाहेब फारच खूष झाल्या. बापूरावांनी त्यावेळी 'कोल्हापूरची लावणी' सादर केली होती.

पठ्ठेबापूरावांची ती कोल्हापूरची लावणी

मैत्रिणी स्वरूप- चित्रिणी । कोमल गात्रिणी । बोल मागे फिरूनी ।आम्ही पठ्ठे बापूराव कवी आहे ग कुलकर्णी ॥१॥

गांव आमचे ग कोलापुर न करवीर शहर की संगमावर पंचगंगेच्या जरीपटका भगवा झेंडा खुणा त्या आमच्या ॥ २ ॥

दिली अटक गंगाथडी । पाजली पाणी घोडी । अबूच्या गं पहाड़ी। छावण्या गिलच्याच्या । दाही दिशेस पळवून लावल्या पलटणी गं त्यांच्या ॥ ३ ॥

मराठ्याचा गं भगवा झेंडा । झळके नऊ खंडा। शत्रुच्या गं तोंडा। पठाण रोहिल्याच्या। दिल्या ढाला मैदानी गं तोफा झुंजी काबुलाच्या ॥४॥

मराठ्याची ग पहिली गादी। दक्षिणेमधी। अनादि ग सिद्धी । कटारी जिवावरच्या । श्री छत्रपति ग राजाच्या शिवाजी दक्षिणच्या ॥५॥

आम्ही मांडचे बसणार । दलांत घुसणार । नाही भिणार संकटी कोणच्या घोरपडी लाविल्या किल्ल्या मावळी कोकणच्या ॥६॥

पंचवीस हजार फौजेचा । जमाव मौजेचा । केला हो साचा । लढाई माझ्या मनच्या । संग्राम करूनी उतरविल्या परी आस्माच्या ॥७॥

पाहुनी पराक्रम माझा | जिंकूनी झुंजा । लाविल्या ध्वजा। रणागणांवरुनी । तुझा सुकुमार चेहरा पाहता नेत्रं गेली दिपूनी ॥८॥

नको धरूस आढी मनामधी। जलदी कर आधी। पोडवाला ग चंदी द्यावी नीट करुनी आम्ही पठ्ठे बापुराव कवी आहे । । कुलकर्णी ॥ ९ ॥

कोल्हापूरची लावणी ऐकून राजर्षी शाहुंनी शाहीरांचे कौतूक करत त्यांना सोन्याची सलकढी पठ्ठे बापूरावांच्या हातात घातली. जरीपटका बांधला आणि गौरव केला. पवळा या स्त्री लावणी कलाकाराला तर सोन्याचे दोन तोडे बहाल केले. लोकराजा शाहूमहाराजांनी दरबारात गौरवाची थाप पाठीवर मारल्यावर पठ्ठे बापूरावांना अधिकच स्फूर्ती मिळाली.

पठ्ठे बापूरावांचे कोल्हापूरवर आधीच प्रेम जडले होते. अनेक लावण्यांत त्यांनी कोल्हापूरबद्दल काळीजमायेने अभिमान आणि आदर व्यक्त केला आहे. राजर्षी शाहू महाराजांचा प्रेमळ वरदहस्त लाभलेले आणि बापूरावांचे जवळचे स्नेही शाहीर लहरी हैदर यांनी त्यावेळची आठवण लिहून ठेवली आहे. त्यात ते म्हणतात,

करवीर नगरीत कविराज पठ्ठे बापूरावांचे प्रथम आगमन माझ्याकडेच झाले व त्यांना कोल्हापूर मुक्कामी शाहू छत्रपती राजेमहाराज यांचे दरबारी दिवाणखान्यात 'मीठाराणी हा वग करण्यास लावला. राणीसाहेब व राजेसाहेब बेहद खूष झाले. तो काळ १९०८ ते ९ असावा. कोल्हापूर मुक्कामी मोठाराणीचे अनेक प्रयोग झाले. लोक बेहद खूप झाले. वो राजे रजवाड़े का जमाना कुछ और था! पठ्ठे बापूराव व पवळा बाईला पहाण्याकरिता गर्दी होत असे. त्यांना शक्य ते सर्व प्रकारचे हार्दिक सहकार्य केले. त्यामुळे त्यांच्या अभिजात रसवंतीने रसरसलेल्या करवीरच्या कलाप्रिय मावळ-मराठी मुलखात चांगलीच कीर्ती पसरली', अशा पठ्ठे बापूरावांच्या कीर्तीचा डंका वाजत असलेल्या तमाशाचे खेळ कोल्हापूर, बेळगाव, कुरुंदवाड, सांगली, जमखिंडी, कन्हाद सातारा या भागात व खेडोपाडी होत राहिले.

ज्या कोल्हापुरात पठ्ठे बापूरावांनी कुस्त्यांचा फड जिंकून मिळालेल्या दोनशे रुपयांवर तमाशाचा फड उभा केला होता, त्याच कोल्हापूरच्या राजदरबारानं सोन्याची सलकडी बहाल करून सन्मान केला होता. अशा या हरहुन्नरी अवलिया शाहिर पठ्ठे बापूरावांनी २२ डिसेंबर १९४५ मध्ये अखेरचा श्वास घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT