नवी दिल्ली - महाराष्ट्रातील खासदारांनी आज ‘जय संविधान,’ जय भीम आणि ‘जय शिवराय’ अशा घोषणा देत लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. शपथ घेताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि वडिलांना स्मरून शपथ घेत असल्याबद्दल हिंगोलीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार नागेश आष्टीकर यांना हंगामी अध्यक्ष भर्तृहरी महताब यांनी समज दिली आणि पुन्हा शपथ घेण्यास सांगितले.
लोकसभा सभागृहाचे आज कामकाज सुरू झाल्याबरोबर महाराष्ट्रातील खासदारांचा शपथविधी सुरू झाला. नंदुरबारचे खासदार गोवाल पाडवी यांनी हातात राज्यघटनेची प्रत घेत हिंदीतून शपथ घेतली. यानंतर येणाऱ्या प्रत्येक सदस्याने जय संविधान, जय भीम, शिवराय, जय हिंद अशा घोषणा देत शपथ घेतली. महाराष्ट्रातील बहुतेक सदस्यांनी मराठीतून शपथ घेतली, तर अनुप धोत्रे (अकोला), श्यामकुमार बर्वे (रामटेक), प्रणिती शिंदे (सोलापूर), विशाल पाटील (सांगली) व नारायण राणे (रत्नागिरी-सिंधुदुर्ग) यांनी हिंदीतून शपथ घेतली.
नीलेश लंकेंची इंग्रजीतून शपथ
इंग्रजीतून शपथ घेणाऱ्यांमध्ये नामदेव किरसान (गडचिरोली), हेमंत सावरा (पालघर), नीलेश लंके (अहमदनगर) यांचा समावेश होता. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काळात भाजपचे नेते सुजय विखे पाटील यांनी ‘‘लोकसभेत इंग्रजीत बोलावे लागते,’’ असा टोमणा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार नीलेश लंके यांना लगावला होता.
यावरून राजकीय कलगीतुरा रंगला होता. सुजय विखे पाटलांच्या या वक्तव्याची परतफेड करताना नीलेश लंके यांनी आज इंग्रजीतून शपथ घेऊन प्रत्त्युत्तर दिले. गडचिरोलीचे काँग्रेसचे खासदार नामदेव किरसान यांनी इंग्रजीतून शपथ घेतली. परंतु इंग्रजीतील प्रारुपानुसार ही शपथ नसल्याने हंगामी अध्यक्ष भर्तृहरी महताब यांनी त्यांना रोखले व इंग्रजीच्या प्रारूपात असल्यानुसार शपथ घ्या, अशी समज दिली.
महाराष्ट्रातील बहुतेक खासदारांनी जय संविधान, जय भीम, जय शिवराय, जय रामकृष्ण हरी, जय हिंद अशा घोषणा देत होते. हंगामी अध्यक्ष भर्तृहरी महताब यांनी या घोषणा शपथेचा भाग नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतरही महाराष्ट्रातील खासदार या घोषणांचा पुनरुच्चार करीत होते.
राज्यघटना समजून घ्या
काँग्रेसचे नंदुरबारचे खासदार गोवाल पाडवी यांनी हिंदीतून शपथ घेतली. त्यानंतर ते अध्यक्षांना अभिवादन न करताच निघून जात होते. परंतु ही चूक विरोधी पक्षाच्या खासदारांच्या लक्षात आल्यानंतर लगेच त्यांना हंगामी अध्यक्षांना अभिवादन करण्यास सांगितले. गोवल पाडवी यांनी मागे फिरून हंगामी अध्यक्षांना हात जोडून नमस्कार केला.
परंतु अनवधानाने झालेल्या चुकीवरून सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी विरोधकांना टोमणा मारला. आधी राज्यघटना समजून घ्या, असे म्हणत सत्ताधारी सदस्यांनी विरोधकांना डिवचले. यावेळी राहुल गांधी व टीएमसीच्या महुआ मोईत्रा पहिल्या रांगेत बसल्या होत्या. त्यांनीही त्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला.
असदुद्दीन ओवेसींच्या ‘जय पॅलेस्टाईन’ने नवा वाद
खासदारांच्या शपथविधीवेळी तेलंगणमधील हैदराबादचे एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी शपथ घेतल्यानंतर जय पॅलेस्टाईन अशी घोषणा दिल्याने वादाला तोड फुटले. ओवेसी यांनी उर्दूमधून शपथ घेतल्यानंतर जय भीम, जय मीम, जय तेलंगण अशा घोषणांनंतर पॅलेस्टाईनचाही जयघोष केल्याने संसदेतील भाजप खासदारांनी आक्षेप नोंदविला.
भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी म्हणाले की, संसदेच्या सदस्यत्वाच्या शपथविधी दरम्यान अशा पद्धतीने अन्य देशांचा जयघोष करणे हे चुकीचे असून सभागृहाच्या नियमांना डावलून करण्यात आलेले कृत्य आहे. दरम्यान, ओवेसी यांनी मात्र त्यांनी दिलेल्या घोषणेचे समर्थन केले असून यात काहीही गैर आणि घटनाबाह्य नाही असा दावा केला आहे. त्याचप्रमाणे महात्मा गांधी यांनी पॅलेस्टाईन बद्दल काय लिहिले आहे हे आक्षेप घेणाऱ्यांनी आधी वाचावे असे सुचवले आहे.
आईच्या नावासह शपथ
काही सदस्यांनी स्वतःचे नाव घेताना आईचे नाव सुद्धा घेतले. यात बळवंत वानखेडे (अमरावती), संजय देशमुख (यवतमाळ-वाशीम), सुरेश म्हात्रे (भिवंडी), सुनील तटकरे (रायगड) यांचा समावेश आहे.
सुशीलकुमार शिंदे प्रेक्षकदीर्घेत
सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी शपथ घेतली तेव्हा प्रेक्षकदीर्घेत माजी केंद्रीय मंत्री व त्यांचे वडील सुशीलकुमार शिंदे कुटुंबीयांसह प्रेक्षक दीर्घेत बसलेले होते. त्याचप्रमाणे अनेक खासदारांचे कुटुंबीयही यावेळी उपस्थित होते.
मानेंचा फेटा
गेल्यावेळी भाजप व शिवसेनेच्या खासदारांनी कोल्हापुरी फेटा बांधून शपथ घेतली होती. यावेळी मात्र केवळ धैर्यशील माने (हातकणंगले) यांनीच फेटा बांधून शपथ घेतली. इतर कोणत्याही सदस्याने फेटा बांधला नव्हता.
मणिपूरवर सर्वाधिक टाळ्या
महाराष्ट्रातील खासदारांच्या शपथविधी पार पडल्यानंतर लगेच मणिपूरच्या दोन खासदारांनी शपथ घेतली. मणिपूरचे खासदार शपथ घ्यायला आल्याबरोबर काँग्रेसह सर्व विरोधकांनी बाके वाजवून त्यांचे स्वागत केले. यावेळी राहुल गांधी यांनी मणिपूरच्या खासदाराला राज्यघटनेची प्रत दिली व ती हातात घेऊन शपथ घेण्याचे सुचविले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.