भारतीय वंशाची महिला मनदीप कौर हिनं अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये आत्महत्या केलीय.
भारतीय वंशाची महिला मनदीप कौर (Mandeep Kaur) हिनं अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये आत्महत्या केलीय. अमेरिकेत आत्महत्या केलेल्या मनदीप कौरच्या प्रकरणात एक धक्कादायक खुलासा समोर आलाय. मनदीपच्या कुटुंबीयांनी तिचा पती आणि सासरच्या मंडळींवर छळ केल्याचा आरोप केलाय.
मनदीप कौरची बहीण कुलदीप कौरनं आरोप केलाय की, 'पती आणि कुटुंबीयांना तिच्यापासून मुलगा हवा होता. सासरचे लोक हुंड्यासाठी 50 लाख रुपयांची मागणी करत होते आणि यासाठी मनदीप कौरला मारहाण केली जात होती. मात्र, त्यांची मागणी मान्य न झाल्यामुळं माझ्या बहिणीला आत्महत्या करण्यास भाग पाडलं.'
कुलदीप कौर पुढं सांगते, 'लग्नानंतर लगेचच मनदीपचा छळ होत होता. मनदीपचं फेब्रुवारी 2015 मध्ये लग्न झालं होतं. लग्नानंतर सासरचे लोक आणि मनदीप न्यूयॉर्क, अमेरिकेत (New York, USA) गेले आणि त्यांनी तिथं माझ्या बहिणीचा छळ सुरू केला.' दरम्यान, मनदीप कौरला दोन मुली असल्याचं सांगण्यात येतंय. सासरच्यांना मुलगा हवा होता, पण दोन मुलीच होत्या. हुंड्यात 50 लाख रुपये न मिळाल्यानं आणि दोन मुली झाल्यामुळं मनदीपचा पती आणि पतीच्या कुटुंबीयांकडून आणखी छळ होत होता, अशी माहिती समोर आलीय.
मनदीप कौरनं गळफास घेऊन आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ जारी करून तिची वेदना व्यक्त केलीय. व्हिडिओमध्ये मनदीप सांगते, 'त्या लोकांनी मला मरायला भाग पाडलं. आत्महत्येपूर्वी रेकॉर्ड करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये मनदीपनं माझ्या मृत्यूला माझा पती आणि माझे सासरे जबाबदार असल्याचं म्हटलंय. त्यांनी मला जगू दिलं नाही. गेल्या 8 वर्षांपासून त्यांनी माझा छळ सुरु केलाय, असंही तिनं स्पष्ट केलं.
मनदीप कौर व्हिडिओमध्ये पुढं सांगते, मी गेल्या 8 वर्षांपासून माझ्या पतीचा छळ सहन करत आहे. तो एक दिवस सुधारेल, पण तसं झालं नाही. गेल्या 8 वर्षांपासून त्यानं माझ्यावर अत्याचार केलेत. माझ्यावर रोज अत्याचार होत आहेत. मी आता यातना सहन करू शकत नाहीय. मी याकडं दुर्लक्ष करुन इथं (न्यूयॉर्क) आले. पण, इथंही त्यानं मला मारहाण करण्यास सुरुवात केली. दारूच्या नशेत तो मला सतत मारहाण करायचा, असंही मनदीपनं सांगितलंय.
मनदीप कौरचे वडील जसपाल सिंह यांनी एफआयआर दाखल करून मनदीप कौरचा पती रणज्योतवीर सिंह संधू, रणज्योतवीरचे वडील मुख्तार सिंह, आई कुलदीप राज कौर आणि भाऊ जसवीर सिंह यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केलाय. रणज्योतवीरवर दुसऱ्या महिलेसोबत अफेअर असल्याचाही आरोप आहे. उत्तर प्रदेशमधील बिजनौर जिल्ह्यातील नजीबाबाद पोलीस ठाण्याच्या (Najeebabad Police Station) पोलिसांनी कलम 306 (आत्महत्येला प्रवृत्त करणं), 498-ए (घरगुती हिंसा), 323, 342 (शिक्षा) अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. दरम्यान, न्यूयॉर्क पोलीस (New York Police) मनदीप कौरच्या आत्महत्येचा तपास करत आहेत. न्यूयॉर्कमधील भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांनी मनदीप कौर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.