Manipur Violence eSakal
देश

Manipur Violence : महिलांवरील बलात्काराच्या घटनांसाठी कारणीभूत ठरला एक 'फेक मेसेज'...

बुधवारी व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे मणिपूरमधील हिंचाराची भीषण बाजू समोर आली.

Sudesh

मणिपूर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून धिंदवडे उडाले आहेत. जातीय दंगलींमध्ये आतापर्यंत तिथे १५० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. मात्र, बुधवारी समोर आलेल्या एका व्हायरल व्हिडिओमुळे मणिपूर दंगलींची भीषण बाजूही समोर आली.

मणिपूरमध्ये काही महिलांची विवस्त्र धिंड काढल्याचा व्हिडिओ बुधवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. माध्यमांमधील माहितीनुसार, हा व्हिडिओ ४ मे रोजीचा होता. या व्हिडिओमुळे मणिपूरमधील महिलांची परिस्थिती सध्या काय आहे हे सगळ्यांसमोर स्पष्ट झालं. मणिपूरमधील दंगे, हिंसाचार यामध्ये किती बळी अन् किती जखमी याबाबत सगळीकडे चर्चा होत असताना, महिलांवरील अत्याचारांकडे मात्र सपशेल दुर्लक्ष करण्यात येतंय.

गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून मणिपूरमधील चुराचंद्रपूर, कांगपोकपी या जिल्ह्यांमध्ये कित्येक महिलांवर बलात्कार झाले आहेत. यामध्ये अल्पवयीन मुली ते ४० वर्षांपर्यंतच्या महिलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे हे सगळं केवळ एका फेक मेसेजमुळं होत आहे.

काय होता मेसेज?

मे महिन्याच्या सुरुवातीला चुराचंद्रपूर जिल्ह्यात एका महिलेच्या मृतदेहाचा फोटो व्हायरल झाला होता. प्लास्टिक बॅगमध्ये गुंडाळलेला हा मृतदेह एका मैतेयी जातीतील महिलेचा असून, कुकी जातीतील काही लोकांनी तिच्यावर बलात्कार करून तिला मारल्याचं या मेसेजमध्ये म्हटलं होतं.

मणिपूरमध्ये ३ मे रोजी दंगलींना सुरूवात झाली होती, त्यानंतर काही दिवसांमध्येच हा मेसेज सगळीकडे व्हायरल झाला. यामुळे दंगलीच्या आगीत आणखी तेल ओतण्याचं काम झालं. तपासामध्ये हे स्पष्ट झालं, कि या फोटोमधील तरुणी ही खरंतर दिल्लीची रहिवासी होती. तिच्या आई-वडिलांनीच २०२२ मध्ये तिची हत्या केली होती. मणिपूरशी तिचा काहीही संबंध नव्हता. मात्र, हे स्पष्ट होईपर्यंत व्हायचं तेवढं नुकसान झालं होतं.

फेक मेसेज पसरल्यानंतर कुकी समाजातील महिलांवर बलात्कार होण्याचं प्रमाण वाढलं. मैतेयी जातीतील लोक, मेसेजमधील तरुणीचा 'बदला' घेण्यासाठी हे अत्याचार करत आहेत असा आरोप करण्यात येतोय. ४ मे रोजी कुकी समाजातील दोन महिलांवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता, यावेळी आरोपी 'तुमच्या पुरूषांनी आमच्या महिलांसोबत जे केलं तेच आम्ही तुमच्यासोबत करणार' असं म्हणत होते. या दोन पीडितांनी 'दि प्रिंट'शी बोलताना याबाबत माहिती दिली.

सध्या मणिपूरमध्ये सुरू असलेल्या जातीय दंगलींमध्ये दोन्ही बाजूच्या महिलांना अत्याचार सहन करावा लागत आहे. आपल्या आपल्या जातीचा 'अभिमान' राखण्यासाठी, आणि दुसऱ्या जातीच्या लोकांनी केलेल्या 'अत्याचाराचा बदला' घेण्यासाठी दोन्ही बाजूचे पुरूष विरुद्ध जातीतील महिलांना लक्ष्य करत आहेत.

दुर्दैवी बाब म्हणजे, आतापर्यंत चालत आलेली पुरूषप्रधान संस्कृती आणि सामाजिक दबाव यामुळे बलात्कार पीडित महिलेकडे अजूनही सहानुभूतीने पाहिलं जात नाही. एखाद्या महिलेवर बलात्कार झाला, तर त्या कुटुंबाची इभ्रत गेली असं अजूनही आपल्याकडे मानलं जातं. अशा वातावरणात वाढल्यामुळेच मणिपूरमधील बलात्कार पीडित महिला आपल्यावरील अत्याचाराची तक्रार देखील दाखल करत नाहीयेत.

दोन्ही समाजांकडून (मैतेयी आणि कुकी) दुसऱ्या समाजातील महिलांवर अत्याचार होत आहेत. मात्र, याबाबत कोणीही तक्रार दाखल करण्यासाठी पुढे आलेलं नाही. बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये तक्रारदाराची सहमती गरजेची असते. अशा प्रकरणांमध्ये पोलीस सुओ मोटो दाखल करू शकत नाहीत, असं एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं.

२००२ साली झालेल्या गुजरातमधील दंगली, २०२० मधील दिल्लीतील दंगली, आणि आता मणिपूरमधील दंगली.. प्रत्येक वेळी जातीय अभिमान बाळगणाऱ्या पुरूषांनी समोरच्याचा बदला घेण्यासाठी महिलांवर अत्याचार केले आहेत. काही दिवसांनी दंगली थांबतील, हिंसाचारामध्ये सहभागी असणारे लोक आपल्या दैनंदिन आयुष्याकडे वळतील. मात्र, या महिलांना आपल्यावरील हा आघात आयुष्यभर मनात ठेऊन जगावं लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT