नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आमदार अपात्रता तसेच पक्ष आणि चिन्ह प्रकरणांची सुनावणी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात अंतिम टप्प्यात पोहोचण्याची शक्यता आहे.
आज सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्या. जे.बी.पारदीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या पीठापुढे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणांचा उल्लेख करण्यात आला. या प्रकरणांवर पुढील सुनावणी ऑगस्टअखेर किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाचे प्रकरण १४ ऑगस्टला, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हाचे प्रकरण २७ ऑगस्ट रोजी सुनावणीला येईल. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबर रोजी संपणार असून सरन्यायाधीश चंद्रचूड १० नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत.
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात सुनील प्रभू यांच्या याचिकेवर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी उत्तर दिले आहे. या प्रकरणी युक्तिवाद व निवेदने पूर्ण झाली असून दोन ते तीन आठवड्यानंतरची तारीख निश्चित करुन या प्रकरणाची सुनावणी करण्यात येईल, असे न्या. चंद्रचूड यांनी स्पष्ट केले. त्यांनी शिंदे गटाला दस्तावेज सज्ज करण्यासाठी न्यायालयाने पुढच्या गुरुवारपर्यंतची मुदत दिली असताना हा दस्तावेज तीन दिवसांत सादर करता येतो, असे शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वकील म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी जयंत पाटील यांच्या याचिकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या ४० आमदारांना उत्तर दाखल करण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत उरली आहे. गेल्या आठवड्यात न्यायालयाने त्यांना उत्तर दाखल करण्यासाठी चार आठवड्यांचा अवधी दिला होता.
‘एक दिवस आमच्या कामाचा ताण बघा’
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जवळ आली असून शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी खूप विलंब होत आहे. त्यामुळे तारीख लवकर निश्चित करण्यात यावी, अशी विनंती शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या पक्षाच्या वकिलांनी वारंवार केली. त्यामुळे सरन्यायाधीशांनी ‘माझ्या खुर्चीत तुम्ही दिवसभर बसा आणि आमच्यावर कामाचा किती ताण असतो ते बघा,’ अशा शब्दांत आपला संताप व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.