भोपाळ- मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री आणि भाजपच्या उमेदवार इमरती देवी यांचा त्यांच्या नातेवाईकानेच पराभव केला आहे. इमरती देवी या डबरा विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीसाठी उभ्या होत्या. या मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. इमरती देवींना त्यांचे नातेवाईक काँग्रेसचे सुरेश राजे यांनी पराभूत केले. ज्योतिरादित्य शिंदेंबरोबर काँग्रेसचा त्याग करुन इमरती देवी भाजपत सामील झाल्या होत्या. त्यांना शिवराजसिंह चौहान यांनी मंत्रिमंडळात स्थान दिले होते. काँग्रेस नेते कमलनाथ यांच्या 'आयटम' वक्तव्यामुळे प्रचार वादात अडकला होता. प्रचाराचा वाद निवडणूक आयोग आणि कोर्टातही गेला होता.
मध्य प्रदेशमध्ये 28 जागांवर पोटनिवडणूक झाली. यात बहुतांश भाजपचेच उमेदवार निवडून आले. परंतु, भाजप नेते तथा राज्यसभा सदस्य ज्योतिरादित्य शिंदे यांना मोठा झटका बसला. त्यांच्या कट्टर समर्थक तथा राज्य मंत्रिमंडळातील सदस्या इमरती देवींचा डबरा मतदारसंघातून पराभव झाला.
प्रचारसभेत कमलनाथ यांनी इमरती देवींची उल्लेख 'आयटम' असा केल्यामुळे हा मतदारसंघ देशात चर्चेत आला होता. कमलनाथ यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. कमलनाथ यांना टीकेचे धनी व्हावे लागले होते.
काँग्रेसचे उमेदवार सुरेश राजे यांनी इमरती देवींचा 7,633 मतांनी पराभव केला. इमरती देवींना 68,056 मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी सुरेश राजे यांना 75,689 मते मिळाली. बसपाचे उमेदवार संतोष गौड यांना 4,883 मते तर 'नोटा'च्या खात्यात 1,690 मते पडली.
दरम्यान, इमरती देवीसह काँग्रेसचे 22 आमदार मार्चमध्ये काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देत भाजपत सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे राज्यातील कमलनाथ यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार अल्पमतात आले होते. त्यानंतर शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपचे सरकार अस्तित्वात आले. शिंदे यांच्या समर्थकांना आमदार होण्याआधीच सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी देण्यात आली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.