sant shiromani aacharya shri 108 vidyasagarji maharaj sakal
देश

उत्तुंग आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व

संत शिरोमणी आचार्य श्री १०८ विद्यासागरजी महाराज यांनी समाधी घेतली आणि आम्ही सर्व जण दुःखात बुडून गेलो.

नरेंद्र मोदी

संत शिरोमणी आचार्य श्री १०८ विद्यासागरजी महाराज यांनी समाधी घेतली. भावी पिढ्यांनी आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांच्या राष्ट्रउभारणीविषयीच्या बांधिलकीचा सखोल अभ्यास करावा. त्यांनी सांगितलेली मूल्ये, केलेले संस्कार यांच्या प्रकाशात वाटचाल केली पाहिजे. ती त्यांना योग्य आदरांजली ठरेल.

संत शिरोमणी आचार्य श्री  १०८ विद्यासागरजी महाराज यांनी समाधी घेतली आणि आम्ही सर्व जण दुःखात बुडून गेलो. त्यांचे आयुष्य म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध असे युग आहे, ज्यामध्ये प्रगाढ ज्ञान, अमर्याद करुणा आणि मानवतेच्या उद्धारासाठीची अतूट वचनबद्धता यांचा अंतर्भाव आहे. अनेक प्रसंगी त्यांचे आशीर्वाद घेण्याचे भाग्य मला लाभले होते. त्यांच्या जाण्याने मला अतीव दुःख होत आहे.

माझ्यासह असंख्य लोकांना एक दीपस्तंभ गमावल्याची आणि व्यक्तिगत नुकसान झाल्याची वेदना जाणवेत आहे. त्यांचे वात्सल्य, दयाभाव आणि आशीर्वाद हे केवळ चांगुलपणाचे द्योतक नव्हते, तर त्यांच्या आध्यात्मिक ऊर्जेचा प्रवाह हा त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व भाग्यवंतांच्या जीवनाला एका नवीन प्रेरणा देणारा होता.

पूज्य आचार्यजी हे नेहमीच ज्ञान, करुणा आणि सेवा यांचा त्रिवेणी संगम म्हणून ओळखले जातील. ते एक खरे तपस्वी होते, ज्यांचे आयुष्य भगवान महावीरांच्या आदर्शांनी प्रेरित होते. त्यांचे जीवन जैन धर्माच्या मूलभूत तत्त्वांचे मूर्तिमंत उदाहरण होते आणि त्यांनी आपल्या कृती आणि शिकवणींद्वारे त्यांचे आदर्श आचरणात आणले.

सर्व सजीवांबद्दल त्यांना वाटणारी काळजी म्हणजे, जैन धर्मातील आयुष्याबद्दलच्या नितांत आदराचे प्रतिबिंब आहे. ते सत्यनिष्ठ जीवन जगले, ज्यातून विचार, उच्चार आणि कृतीबाबतचा जैन धर्मातील प्रामाणिकपणा ठळकपणे दिसून येतो. त्यांचे राहणीमान साधे होते. त्यांच्यासारख्या महात्म्यांमुळेच या जगाला जैन धर्माचे आचरण आणि भगवान महावीर यांच्या आयुष्याचे अनुसरण करण्याची प्रेरणा मिळत आहे.

ते जैन समुदायासाठी एक प्रेरणास्रोत होतेच मात्र त्यांची शिकवण केवळ एका समुदायापुरती मर्यादित नव्हती. सर्व धर्म, पंथ आणि संस्कृतीचे लोक त्यांच्याकडे येत व आध्यात्मिक जागृतीसाठी; विशेषतः युवावर्गामध्ये प्रबोधनाचे कार्य ते करत.

शिक्षणक्षेत्र त्यांच्या हृदयाच्या अगदी जवळ होते. बालपणातील विद्याधर नावाच्या एक सामान्य मुलापासून ते आचार्य विद्यासागर होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास, त्यांची ज्ञान संपादन करण्याची आणि संपूर्ण समाजाला त्या ज्ञानाने प्रबोधन करण्याची सखोल बांधिलकी दर्शवतो. शिक्षण हा न्यायी आणि प्रबुद्ध समाजाचा पाया आहे, यावर त्यांचा ठाम विश्वास होता.

लोकांना सक्षम करण्यासाठी आणि जीवनातील ध्येय साध्य करण्यासाठी ज्ञान हे सर्वोपरी असल्याचे त्यांनी सांगितले. खऱ्या ज्ञानाचा मार्ग म्हणून स्वअध्ययन आणि आत्म-जागरूकतेचे महत्त्व यावर त्यांचा विशेष भर होता. त्यांनी अनुयायांना आध्यात्मिक विकासासाठी अथक प्रयत्नांचे आवाहन केले.

आचार्य विद्यासागरजी महाराज यांना असे वाटायचे की आपल्या युवा वर्गाला असे शिक्षण मिळाले पाहिजे ज्यामध्ये आपल्या सांस्कृतिक मूल्यांची पाळेमुळे रुजलेली असतील. ते नेहमी म्हणायचे की आपण आपल्या भूतकाळातील ज्ञानापासून दूर गेलो असल्याने आपल्याला वर्तमानातील पाणीटंचाईसारख्या समस्यांवर उपाय शोधणे शक्य होत नाही.

कौशल्यावर आणि नवोन्मेषावर भर देणारे शिक्षण हेच समग्र शिक्षण अशी त्यांची धारणा होती. भारताच्या भाषिक विविधतेचा त्यांना अभिमान होता आणि त्यांनी युवा वर्गाला भारतीय भाषा शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले.

पूज्य आचार्यजींनी स्वतः संस्कृत, प्राकृत आणि हिंदीमधून मोठ्या प्रमाणावर लिखाण केले. एक संत म्हणून त्यांनी गाठलेली उंची आणि तरीही जमिनीवर असलेले त्यांचे पाय यांची प्रचिती त्यांच्या ‘मूकमाटी’ या महान रचनेमधून येते. त्यांच्या कामांमधून ते वंचितांचा आवाज बनले. आरोग्याच्या क्षेत्रात देखील पूज्य आचार्यजींचे योगदान परिवर्तनकारी होते.

अपुऱ्या सोयीसुविधा असलेल्या भागांमध्ये त्यांच्याकडून विविध प्रकारचे कार्य केले जात होते. आरोग्याविषयीचा त्यांचा दृष्टिकोन व्यापक होता, शारीरिक आरोग्याला त्यांनी आध्यात्मिक निरामयतेची जोड दिली आणि एक व्यक्ती म्हणून आवश्यक असलेल्या गरजांची पूर्तता केली.

राष्ट्रउभारणीची बांधिलकी

मी विशेषत्वाने भावी पिढ्यांना हा आग्रह करेन की, त्यांनी संत शिरोमणी आचार्य श्री विद्यासागरजी महाराजांच्या राष्ट्रउभारणीविषयीच्या बांधिलकीचा सखोल अभ्यास करावा. कोणत्याही भेदभावयुक्त विचारसरणीच्या पलीकडे जाऊन देशहितावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन ते नेहमीच लोकांना करत असत.

ते मतदान प्रक्रियेचे खंदे समर्थक होते, कारण लोकशाही प्रक्रियेमधील लोकसहभागाची मतदान ही एक अभिव्यक्ती आहे असे त्यांना वाटत होते. त्यांनी निकोप व स्वच्छ राजकारणाचा पुरस्कार केला. धोरणे तयार करताना लोकांच्या कल्याणाचा विचार असला पाहिजे, स्वार्थाचा नव्हे. (लोकनीती ही लोभसंग्रह नव्हे, तर लोकसंग्रह आहे) असे ते सांगायचे.

एक बलशाली राष्ट्र नागरिकांच्या आपल्या कर्तव्यांप्रतीच्या, आपले कुटुंब, समाज आणि राष्ट्र यांच्या प्रति असलेल्या कर्तव्यांच्या  बांधिलकीच्या  पायावर उभारलेले असते. आचार्यजी यांनी लोकांना कायम इमानदारी, सत्यनिष्ठा आणि आत्मनिर्भरता यासारखे गुण जोपासण्यासाठी प्रोत्साहन दिले. न्यायी, दयाळू आणि समृद्ध समाजासाठी हे गुण आवश्यक आहेत.

आज आपण विकसित भारताच्या निर्माणाच्या दिशेने सातत्याने काम करत असताना कर्तव्यभावना अधिकच मोलाची ठरते. जगभरात पर्यावरणावर अनेक संकटे घोंघावत असतानाच्या काळात संत शिरोमणी आचार्यजी  यांनी केलेले  मार्गदर्शन उपयुक्त ठरेल. निसर्गाचा ऱ्हास कमीत कमी होईल, अशा प्रकारची जीवनशैली अवलंबण्याचे आवाहन त्यांनी केले.

त्यांनी शेतीला सर्वाधिक महत्त्व दिले. शेती आधुनिक त्याचसोबत शाश्वतरीत्या करण्यावर त्यांनी भर दिला. तुरुंगातील कैद्यांच्या सुधारणेसाठी त्यांनी केलेले कार्यही उल्लेखनीय होते. आपल्या भूमीचे सौंदर्य म्हणजे आपल्या भूमीने संत महात्म्यांना जन्म दिला, ज्यांनी इतरांना प्रकाशाच्या वाटेवर नेऊन  एक चांगला समाज घडवला.

या संत आणि समाजसुधारकांच्या विलक्षण वारशात पूज्य आचार्यजी उत्तुंग व्यक्तिमत्त्व ठरतात. त्यांनी जे कार्य केले ते केवळ वर्तमानकाळ डोळ्यासमोर न ठेवता भविष्यकाळाचा विचार करूनही केले. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात  मला छत्तीसगडमधील डोंगरगड येथील चंद्रगिरी जैन मंदिराला भेट देण्याची संधी मिळाली. ही भेट पूज्य आचार्यजींसोबतची माझी शेवटची भेट ठरेल, असे वाटले नव्हते.

ते क्षण खूप खास होते. त्यांनी माझ्याशी बराच वेळ संवाद साधला, देशसेवेच्या माझ्या प्रयत्नांसाठी  आशीर्वाद दिला.  आपला देश घेत असलेले नवे वळण आणि जागतिक स्तरावर भारताला मिळत असलेला आदर, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. ते करत असलेल्या कामाबद्दल त्यांनी मोठ्या उत्साहाने सांगितले.

तेव्हा आणि नेहमीच त्यांची प्रेमळ दृष्टी आणि प्रसन्न हास्य शांत व समाधानाचा भाव निर्माण करण्यास पुरेसे ठरत असे. त्यांचा आशीर्वाद आत्म्यासाठी चंदनासारखा भासतो, आपल्यात आणि आपल्याभोवती असलेल्या दैवी अस्तित्वाचे स्मरण करून देतो. 

मूल्ये आचरणात आणू

संत शिरोमणी आचार्य श्री १०८ विद्यासागरजी महाराज यांची उणीव  त्यांना ओळखणाऱ्या आणि त्यांच्या शिकवणीने आणि त्यांच्या जीवनाने प्रभावित झालेल्या सर्वांनाच जाणवत राहील. मात्र त्यांच्यापासून प्रेरणा घेतलेल्या सर्वांच्या हृदयात आणि मनात त्यांची स्मृती सतत राहील. त्यांच्या स्मृतीच्या सन्मानार्थ त्यांची मूल्ये प्रत्यक्ष आचरणात आणण्यासाठी आम्ही वचनबद्धता व्यक्त करतो. ही त्यांना विनम्र श्रद्धांजली ठरेल, त्यांनी सांगितलेल्या मार्गावरून वाटचाल केल्यास राष्ट्रकल्याण साधता येईल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT