Navratri Utsav 2023 esakal
देश

Navratri Utsav 2023 : नारी, नवरात्री अन् 'मंडला आर्ट', काय आहे कनेक्शन माहितीये?

स्त्री म्हणजे शक्ती आणि शक्ती पूजन म्हणजे नवरात्री म्हणूनच नवरात्रोत्सव म्हणजे आपसूकच नारीशक्ती, महिला, स्त्री, दुर्गा आणि प्रामुख्याने महिषासुरमर्दिनी हे सगळं आलं.

युगंधर ताजणे

मनस्वी पटेल

यत्र नार्यस्तु रमन्ते तत्र देवताः I

यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः II

हा श्लोक आता सगळ्यांनाच परिचयाचा झाला आहे, पण दुर्दैवाने अर्धाच…!! दुसरी ओळ सांगते, ‘जिथे स्त्रीचं पूजन होत नाही, तिथे केलेल्या कुठल्याच कर्माला फळंही मिळत नाही’ हे अजून जास्त ठिकाणी सांगितलं जात नाही. पण, आपल्याला पूजन म्हणजे काय हे कळलंय का हो? पूजन म्हणजे आदर, स्वीकृती, समभाव आणि सन्मान...!! हि व्याख्या कुठेतरी हरवतेय आणि फक्त ढोबळ अर्थ तेवढा घेतला जातोय. असो, यात बदल होईल असे प्रयत्न कारुयातच.

पण, स्त्री म्हणजे शक्ती आणि शक्ती पूजन म्हणजे नवरात्री म्हणूनच नवरात्रोत्सव म्हणजे आपसूकच नारीशक्ती, महिला, स्त्री, दुर्गा आणि प्रामुख्याने महिषासुरमर्दिनी हे सगळं आलं. महिषासुर हे एक प्रतीक आहे, महिष म्हणजेच रेडा यासारखा वर्ग जो स्वार्थासाठीच जगतोय, किंवा आळस हे ज्याचं आद्यकर्तव्य आहे त्याला संबोधित कारतो आणि असुर म्हणजे आपल्याला माहीतच आहे, जो कुकर्म करण्यातच धन्यता मानतो.

Also Read - Navratri 2023 : तलवारीचं 'स्त्री'त्त्व आणि आदिमायेच्या गुणतत्त्वांचा सहसंबंध काय आहे?

या दोहोंना एकत्रितपणे महिषासुर म्हणता येईल. अशा या महिषासुर प्रवृत्तीला नारीशक्तीच दूर करू शकते कारण नारी म्हणजे समर्पण, त्याग, सामंजस्य आणि परोपकार यांचा उगम आणि सुरेख संगम. या सगळ्या शक्तींना सोबत घेऊन ती युद्ध न करता आपल्या कर्माने म्हणजेच कृतीने समाजात बदल घडवून आणते.

अशा बदल घडवून आणणाऱ्या नारीशक्तीला सन्मान करण्याचा उत्सव म्हणजे नवरात्र. हा सन्मान पुरुष आणि स्त्री दोघांनी सोबत करायचा. पुरुषांनी त्यातून हे सगळे गुण घेण्यासाठी तर महिलांनी त्यांच्या ठायी असलेल्या गोष्टी समजून घेऊन त्या आजन्म टिकवण्यासाठी. पण मग सन्मान करण्याची पद्धत कोणती अवलंबायची? तर सन्मान उत्सवातून आणि उत्साहातून करायचा, कारण या दोहोंचा प्रतीक म्हणजे दुर्गा.

आता सगळ्यांनाच ठाऊक आहे कि नवरात्रोत्सव कसा साजरा होतो. मध्यभागी देवी विराजमान असते आणि आपण तिची पूजा केल्यानंतर एक मोठा गोल बनवतो आणि गरबा नृत्य सादर करतो. गरबा म्हणा किंवा दांडिया अथवा टिपऱ्या सगळ्याच पद्धतीत गोलाकार करून नृत्य करणे हे समान आहे. या गोलाकारात नृत्य करतांना दोन गोष्टी प्रकर्षाने घडतात. एक, सतत आपली जागा सोडून पुढे पुढे जाणे. म्हणजे सतत कार्यरत असण्याची आवश्यकता, तुम्ही मधेच थांबून चालत नाही. थांबलात किंवा चुकलात तर त्याचा परिणाम इतरांवरही होतो.

महिला वर्गही असाच अविरत कुटुंब सांभाळण्यासाठी कार्यरत असतो, न चुकता आणि न थांबता. ‘"ती" थांबली तर घर थांबतं’ हे काही उगाच नाही म्हटलं जात. सतत कार्यरत राहण्याची ऊर्जा देवीकडून मिळते. जी या गोलाच्या मध्यात विराजमान आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, दोन वर्तुळ विरुद्ध दिशेने फिरत असतांना सतत येणारे नवे चेहरे आणि त्यांच्याशी केलेले स्मितहास्य.

माझ्यासमोर कोण, कसा येईल माहित नाही पण मी त्याला हास्याभिवादन करूनच पुढे जाणार. स्टेप बाय स्टेप, पहिले अभिवादन, मग तोंडओळख, मग आपला हा साथी अजून गरबा खेळतोय हि आनंदाची भावना आणि शेवटाला येतांना पुन्हा भेटूया असा घेतलेला निरोप, इतक्या गोष्टी होतात. याचसोबत ऊर्जेची देवाण घेवाणही होते. आणि इतक्या समूहाची ऊर्जेची देवाण-घेवाण झाल्याने वातावरणात एक शक्ती निर्माण होते जी वर्षभरासाठी टिकून राहते. एक शिकवण देऊन जाते. हे काम एक स्त्री सहजच करू शकते. हे गुण तिच्यात आहेतच, ते ओळखण्यासाठी आणि जगाला समजावण्यासाठी नवरात्री. म्हणून देवीची पूजा.

तर, हे सगळं साकार करण्यासाठी आपण एक गोल म्हणजेच मंडल बनवतो. कारण गोल, चक्र किंवा मंडल हे सतत फिरत राहण्याचं त्याचबरोबर पूर्णतेचं प्रतीक आहे. जी ऊर्जा आपण त्याच्या फिरण्याच्या क्रियेतून घेतली ती शारीरिक आणि मानसिक पातळीवर काम करते. अशीच प्रक्रिया मंडला आर्ट च्या स्थैर्यातूनही मिळते, जी मानसिक ऊर्जा निर्माण करते. मंडल अथवा मंडळ म्हणजेच सोप्या शब्दांत वर्तुळ. मग, वर्तुळ म्हटलं कि एक केंद्रबिंदू आला, एक बंद आणि परिपूर्ण गोल आला.

मंडलाच्या मध्यभागी केंद्रबिंदू (Focal Point) आहे आणि संपूर्ण मंडल याभोवताली रेखाटला जातो. हा केंद्रबिंदू म्हणजेच ऊर्जा स्थान. मंडल रेखाटत असतांना किंवा बघत असतांना आपण या भागाकडे एकाग्र होत जातो, स्थिर होत जातो. या प्रक्रियेत आतल्या थराला समतोल साधत बाह्य थर रेखाटावा लागतो. आणि या गोष्टींना प्रत्येक थरात सतत जपावं लागतं.सतत कार्यरत राहावं लागतं, तरच मंडल सुबक आणि सुंदर तयार होते. हा समतोल साधण्याचा एक मजेशीर छंदच जणू हळू हळू त्या व्यक्तीत अंकुरित व्हायला लागतो.

मनात आलेले नैराश्य, अस्थिरता यांची जागा आता मंडलातल्या समतोलाने व्यापली जाऊ लागते. मंडलाचं केंद्रस्थान सतत आपल्याकडे मन आकर्षून घेऊ लागतं आणि यातूनच नकळतपणे मन शांत व्हायला सुरवात होते.

शेवटी काय, काही गोष्टी अश्या आहेत ज्या एकमेकांपासून वेगळ्या नाही करता येत. जसं नारी ते नवरात्री आणि नवरात्री ते मंडल. शक्तीस्वरूप देवीला ज्या पद्धतीने केंद्रस्थानात बसवून आपण गरबा खेळतो, त्याच पद्धतीने केंद्रबिंदूत ऊर्जा साठवून त्याभोवती मंडल फिरत जातं. या दोन्हीही गोष्टी मनोबल वाढवण्याकरिता आपल्या परंपरेत सांगितल्या गेल्या आहेत. एका गोलाच्या केंद्रबिंदूत नारीशक्ती आहे तर दुसऱ्या गोलाच्या म्हणजेच मंडलाच्या केंद्रबिंदूत ऊर्जा. आणि या दोन्हीही गोष्टींचे स्थान असेच आजन्म अढळ राहील यात शंकाच नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे चंद्रकांत पाटील 5,700 मतांनी आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT