टोकियो - ‘मुलाचे पाय पाळण्यात दिसतात’’ या उक्तीप्रमाणे जागतिक ज्युनिअर स्पर्धेत विश्वविक्रम करून स्वतः मधील अफाट गुणवत्तेची चुणूक अठराव्या वर्षीच दाखवून देणाऱ्या नीरज चोप्राने आज सुवर्ण कामगिरी केली. टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत भालाफेकीत त्याने ‘सुवर्ण पदकाचा’वेध घेतला. ऑलिंपिकच्या इतिहासातील भारताचे हे दुसरे वैयक्तिक सुवर्णपदक ठरले. कुस्तीतही बजरंग पुनियाने कमाल करत ब्राँझ पदक पटकावले. त्यामुळे या ऑलिंपिक स्पर्धेत भारताने सर्वाधिक सात पदकांची कमाई केली आहे.
नीरजच्या यशानंतर देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणेच देशभरातील विविध पक्षांच्या बड्या नेत्यांनी त्याच्या कामगिरीवर स्तुतिसुमने उधळली आहेत. नीरजने त्याचे हे सुवर्णपदक ‘फ्लाइंग सीख’ मिल्खासिंग यांना समर्पित केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक आव्हानांचा सामना करत पार पडलेल्या टोकियो ऑलिंपिकचा उद्या (ता.८) रोजी समारोप होत आहे. त्यामुळे आजच्या दिवशी भारतीय खेळाडू काय कमाल करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. नीरजच्या या कामगिरीमुळे भारताचे अनेक वर्षांपासूनचे सुवर्ण पदकाचे स्वप्न आज अखेर पूर्ण झाले. भालाफेकीच्या स्पर्धेमध्ये जगभरातील दिग्गज देश मैदानात उतरले असताना नीरजने अन्य देशांच्या खेळाडूंच्या तोडीस तोड कामगिरी केली. अनेक दिग्गज खेळाडूंची त्याने घेतलेल्या विक्रमी वेधाशी स्पर्धा करताना पुरती दमछाक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
ही ऑलिंपिक स्पर्धा सुरू झाल्यापासूनच सगळ्या देशाच्या नजरा नीरजच्या कामगिरीकडे लागल्या होत्या. आजच्या भालाफेकीत नीरजने ८७.५८ मीटर लांब भाला फेकून इतर स्पर्धकांना जवळही फिरकू दिले नाही. एवढा लांब भाला फेकल्यावर भारताचे सुवर्णपदक तेथेच निश्चित झाले होते. नीरजची ही स्पर्धा सुरू होण्याअगोदर बजरंग पुनियाने कुस्तीतील आपली ब्राँझपदकाची लढाई सहज जिंकली होती. टोकियो ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदकापासून वंचित राहिल्यानंतर भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाने आज फ्रीस्टाईल कुस्तीच्या ६५ किलो गटात ब्राँझपदक पटकाविले आहे. त्याने कझाकिस्तानचा पैलवान दाऊलेत नियाजबेकोवचा एकतर्फी ८-० असा पराभव करत ऑलिंपिक पदकावर नाव कोरले. बजरंग उपांत्य फेरीत अझरबैजानच्या हाजी अलीयेवकडून ५-१२ने पराभूत झाला. हाजी अलीयेव अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी झाला, त्यामुळे बजरंगला रेपेचेजद्वारे ब्राँझपदकासाठी लढण्याची संधी मिळाली.
आदिती गोल्फमध्ये चौथी
प्राथमिक फेऱ्यांमध्ये संयुक्त दुसरे स्थान मिळवून महिलांच्या गोल्फमध्ये लक्षवेधी प्रगती करणारी आदिती अशोकला थोडक्यात अंतिम फेरीला मुकावे लागले, त्यामुळे तिला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
असाही सन्मान
ॲथलेटिक्समध्ये पहिलेच सुवर्णपदक
वैयक्तिक दुसऱ्या सुवर्ण पदकाची कमाई
तेरा वर्षांनंतर भारताला सुवर्ण पदक
हरियाना सरकारकडून सहा कोटींचे बक्षीस
झारखंडकडून भूखंडासाठी ५० टक्के सवलत
‘बीसीसीआय’कडून रोख बक्षीस जाहीर
‘४७’ चा असाही योगायोग
ऑलिंपिकमध्ये आज भारताला दोन पदके मिळाली. त्यामुळे पदकांच्या क्रमवारीतील भारताचे स्थान ६६ वरून थेट ४७ वर आले आहे. याचे काही क्षणांत समाज माध्यमांत पडसाद उमटले.‘१९४७ स्वातंत्र्य वर्ष’ असा ट्रेंड नेटीझन्सच्या चर्चेचा विषय बनला.ऑलिंपिकच्या इतिहासात भारताला प्रथमच सर्वाधिक सात पदके मिळाली. या अगोदर २०१२ च्या लंडन ऑलिंपिकमध्ये भारताने सहा पदके मिळवली होती. या वेळी एक सुवर्ण, दोन रौप्य आणि चार ब्राँझ अशी सात पदके मिळाली आहेत.
आनंदाश्रू अन् मोदींचा फोन
नीरजच्या यशामुळे आज टोकियो ऑलिंपिकमध्ये भारताच्या राष्ट्रगीताची धून वाजल्यानंतर देशवासियांचा ऊर अभिमानाने भरून आला होता. यावेळी नीरज देखील भावुक झाल्याचे दिसून आले. त्याचे डोळे पाणावले होते. या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत अभिनंदन केले. खुद्द मोदींनीच नंतर ट्विट करत याची माहिती दिली.
नीरजची कामगिरी (प्रमाण मीटरमध्ये)
८७.०३ पहिला प्रयत्न
८७.५८ दुसरा प्रयत्न
७६.७९ तिसरा प्रयत्न
फाउल चौथा प्रयत्न
फाउल पाचवा प्रयत्न
८४.२४ सहावा प्रयत्न
टोकियो ऑलिंपिकमध्ये आज इतिहास घडला. नीरजचे यश कायमस्वरूपी लक्षात राहील, त्याने अद्वितीय कामगिरी केली. उत्साह आणि धैर्याचा अनोखा मिलाफ त्याच्यात पाहायला मिळाला.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
नीरजच्या कामगिरीला सलाम.. या तरुण रक्तानं आज देशाचे स्वप्न पूर्ण केले. तुझे आभार. सुवर्ण पदक विजेत्यांच्या क्लबमध्ये तुझे स्वागत आहे. तुझ्या कामगिरीचा आम्हाला अभिमान असून याचा आनंदही होतो आहे.
- अभिनव बिंद्रा, सुवर्णपदक विजेता नेमबाज (२००८)
देशासाठी आणि माझ्यासाठी हा गौरवाचा क्षण आहे. या क्षणावर माझा अजूनही विश्वास बसत नाही. अनेक दिवसांनंतर भारताला सुवर्णपदक मिळाले आहे. अंतिम फेरीमध्ये आपली चांगली कामगिरी होईल याची मला पूर्ण खात्री होती पण सुवर्ण पदक मिळेल असे वाटत नव्हते. मला याचा आनंद होतो आहे.
- नीरज चोप्रा, भालाफेकपटू
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.