नवी दिल्ली - देशातील १० पैकी ६ किशोरवयीन मुलींमध्ये रक्तक्षयाचा (ॲनेमिया) आजार असून लहान वयातील मातृत्वामुळे त्यांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला असल्याची धक्कादायक माहिती राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणातून (एनएफएचएस) पुढे आली आहे. काही अभ्यासकांनी या सर्वेक्षणातून हाती आलेल्या डेटाचे विश्लेषण केले असता काही नव्या पण धक्कादायक बाबी त्यांच्या हाती लागल्या आहेत.
या रक्तक्षयाच्या आजाराला अन्य घटकही कारणीभूत असल्याचे दिसून आले. त्यामध्ये प्रामुख्याने लहान वयातच मुलींचे होणारे विवाह आणि त्यांच्यावर लादले जाणारे मातृत्व, दैनंदिन आहारामध्ये पौष्टिक घटकांचा अभाव याबरोबरच शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपण यामुळे देखील १५ ते १९ वर्षे या वयोगटातील मुलींना रक्तक्षयाचा त्रास होत असल्याचे दिसून आले.
उत्तरप्रदेशातील बनारस हिंदू विद्यापीठ आणि अन्य शोध संस्थांनी ‘एनएफएचएस’ची आकडेवारी पडताळून पाहिली असता त्यातून ही बाब समोर आली. ज्या राज्यांमध्ये ‘ॲनेमिया’ग्रस्त महिलांची संख्या ६० टक्क्यांपेक्षा अधिक आहे, अशा राज्यांची संख्या ही २०१९-२१ या काळात दुपटीने वाढून ती अकरावर पोचली आहे.
२०१५-१६ मध्ये ती फक्त ५ एवढीच होती, असे ‘पीएलओएस ग्लोबल पब्लिक हेल्थ’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या संशोधनामध्ये नमूद करण्यात आले आहे. भारतामध्ये बहुतांश महिलांना रक्तक्षयाचा आजार होतो, याचा त्यांच्या आरोग्यावर दूरगामी परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. शरीरातील लाल रक्तपेशी कमी झाल्याने त्यांची शारीरिक क्षमताही कमी होते, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
चौथ्या, पाचव्या फेरीतील डेटाचा वापर
राष्ट्रीय सर्वेक्षणातील चौथ्या (२०१५-१६) आणि पाचव्या (२०१९-२१) फेरीतील डेटाचा वापर करून अभ्यासकांनी उपरोक्त निष्कर्ष काढला आहे, यासाठी लाखो किशोरवयीन मुलींच्या आरोग्याची पाहणी करण्यात आली होती. सर्वसाधारणपणे रक्तक्षयाचा प्रभाव आणि जोखमीचे घटक यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले होते.
असेही निष्कर्ष
लहान वयातच विवाह होणाऱ्या मुलींना अधिक त्रास
ग्रामीण भागातील ७० टक्के महिलांना व्याधी
दोन पेक्षा अधिक मुले असणाऱ्या महिला ॲनेमिक
सुशिक्षित महिलांमध्ये ॲनेमियाचा त्रास कमी
एससी, एसटी प्रवर्गातील महिलांना अधिक त्रास
उत्तर भारतीय राज्यांतील महिलांत धोका कमी
देशातील २८ पैकी २१ राज्यांत रक्तक्षय वाढला
उत्तर भारतात प्रमाण कमी का?
उत्तर भारतीय राज्यांतील महिलांच्या आहारामध्ये प्रामुख्याने पोषण मूल्यांचा अधिक समावेश असतो. लोहयुक्त लाल तांदळाचे सेवन उत्तर भारतामध्ये मोठ्याप्रमाणावर केले जाते. स्थानिक तसेच हंगामी खाद्यपदार्थ आणि फळांचे सेवन केले जात असल्याने या महिलांना कमी त्रास होत असल्याचे दिसून आले. लाल मांसाचे सेवन अधिक करणाऱ्या महिलांना रक्तक्षयाचा फारसा त्रास होत नसल्याचे दिसून आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.