श्रद्धांजलीनंतर लोकसभेचे कामकाज तहकूब
नवी दिल्ली: स्वातंत्र्य दिन, क्रांती दिनाचा हीरक महोत्सव, राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीमुळे पावसाळी अधिवेशन महत्त्वाचे राहील. "जीएसटी स्पिरिट'सोबत हे अधिवेशन पुढे जाईल, या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाने संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ झाला. मात्र दिवंगत संसद सदस्य आणि दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या अमरनाथ यात्रेकरूंना श्रद्धांजली वाहून लोकसभेच्या पहिल्या दिवसाचे कामकाज तहकूब करण्यात आले.
अधिवेशनाच्या प्रारंभाआधी प्रथेप्रमाणे मोदींनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सर्व राजकीय पक्षांना सहकार्यातून "जीएसटी'चा निर्णय साध्य झाल्याचे प्रतिपादन केले. सर्व राजकीय पक्ष आणि सरकार राष्ट्रहितासाठी काम करतात तेव्हा किती महत्त्वाचे कार्य मार्गी लागते, हे "जीएसटी'च्या निर्णयातून सिद्ध झाले आहे. ऐक्यातून बलशाली होणे (Growing Stronger Together) हे "जीएसटी'मागील भावनेचे दुसरे नाव आहे असे सांगत या अधिवेशनातही त्याच भावनेतून काम होईल, अशी अपेक्षा मोदींनी व्यक्त केली.
येत्या 15 ऑगस्टला स्वातंत्र्याची सात दशके पूर्ण होत असून नऊ ऑगस्टला क्रांती दिनाचा आणि "भारत छोडो' आंदोलनाचा हिरक महोत्सव आहे. याच कालावधीत देश नवे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणार आहे. या महत्त्वाच्या घडामोडींमुळे संपूर्ण देशाचे लक्ष या पावसाळी अधिवेशनाकडे राहील. अधिवेशनात सर्व पक्ष देशहिताचे महत्त्वाचे निर्णय करतील, असा विश्वासही मोदींनी बोलून दाखवला.
विद्यमान लोकसभेचे खासदार विनोद खन्ना, केंद्रीय मंत्री अनिल माधव दवे यांच्या निधनामुळे लोकसभेचे कामकाज श्रद्धांजली अर्पण करून लगेच तहकूब करण्यात आले. तत्पूर्वी, अलीकडेच झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर मतदारसंघातून निवडून आलेले डॉ. फारुक अब्दुल्ला आणि केरळच्या मल्लापुरम मतदारसंघातून निवडून आलेले पी. के. कुन्हालीकुट्टी यांना खासदारकीची शपथ देण्यात आली.
मोदींचे अभिवादन
लोकसभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी प्रथेप्रमाणे सत्ताधारी नेत्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांकडे जाऊन सहकार्याचे आहन केले. कामकाज प्रारंभ होण्याच्या पाच मिनिटे आधी सभागृहात दाखल झालेल्या पंतप्रधान मोदी यांनी कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधींसह माजी पंतप्रधान एच. डी. देवगौडा तसेच मुलायमसिंह यादव, मल्लिकार्जुन खर्गे, उपाध्यक्ष एम. तंबीदुराई यांच्या आसनाजवळ जाऊन अभिवादन केले. अन्य नेत्यांशी मोदींनी हस्तांदोलन केले आणि खर्गेंशी संवादही साधला, तर सोनिया गांधींना हात जोडून नमस्कार केला. या तुलनेत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचा सोनिया गांधींशी दीर्घकाळ संवाद चालल्याचे दिसून आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.