भारतातील हिंदू मंदिरांचे पुनरुज्जीवन करून केंद्रातील मोदी सरकारने हिंदूंना एकत्र आणण्याचे प्रयत्न केले. नऊ वर्षांत त्यांनी केलेल्या या कामांमुळे आध्यात्मिक अर्थकारणाची उलाढालही वाढली. अध्यात्म पर्यटनापासून विविध गोष्टींचा यात समावेश आहे. नवा भारत घडविण्याच्या केंद्रस्थानी मंदिरांचे पुनरुज्जीवन हे धोरण असेल हे स्पष्ट झाले आहे.
चीन काळापासून भारतात अनेक राजांनी मंदिरांची उभारणी करून त्याद्वारे आपले राज्य चालविण्याचे दाखले इतिहासात आहेत. मंदिरांमध्ये सापडलेल्या शिलालेखांमध्ये याचे दाखले आजही अनेक ठिकाणी उपलब्ध आहेत. केवळ मंदिर उभे करणे नाही, तर त्यासाठी लागणाऱ्या खर्चाची तरतूद करणे, त्यासाठी येणाऱ्या भक्तांची सोय करणे असा आर्थिक उलाढालीचा संदर्भ यात आहे. देवता स्थापन करून त्यातून जनतेला विशिष्ट मार्गावर नेण्याचे काम राजे करीत आले.
सांस्कृतिक खुणा पुसण्यासाठी अनेकदा युद्धानंतर धार्मिक स्थळे अधिक लक्ष्य केली जात होती. हे सगळे सांगण्याचे कारण म्हणजे केंद्रातील मोदी सरकारने हाच प्राचीन काळातील सांस्कृतिक राष्ट्रवाद पुढे नेण्याचे धोरण नऊ वर्षांपासून राबविले आहे. तीर्थक्षेत्र पुनरुज्जीवन व अध्यात्म संवर्धन ड्राईव्ह (प्रसाद) आणि ‘हेरिटेज सिटी डेव्हलपमेंट अँड ऑगसेंटेशन’ योजनेंतर्गत (एचआरआयडीएवाय) मंदिरांचे पुनरुज्जीवन करण्याचे काम देशभर सुरू झाले आहे.
देशाच्या दक्षिण भारतात पूर्वीपासून मंदिरांच्या भोवती अर्थव्यवस्था फिरत राहिली आहे. त्यानुसारच उत्तर भारतातही मंदिरांचे पुनरुज्जीवन करून धार्मिक अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे काम होत आहे. पंतप्रधान मोदी यांनी भारतातील हिंदू परंपरा सांस्कृतिक शक्ती असल्याचे जगभर सांगितले आहे. हिंदू सहिष्णुता आणि ‘वसुधैव कुटुंबकम’सारख्या संकल्पना जगभर ते सांगत असतानाच हिंदू राष्ट्र म्हणून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर ते ठसा उमटवत आहेत. त्यासाठी मंदिरांचे पुनरुज्जीवन हे धोरण असल्याचे दिसते.
भारतातील सांस्कृतिक ज्योतीचा विकास मंदिर विकासातून साधत असल्याचे दिसत आहे. धार्मिकता, सांस्कृतिक अस्मिता आणि हिंदूंना एकत्र जोडण्याचे काम सुरू असून, यातून भारताचा विकास होईल, असा विचार केंद्र सरकार करीत आहे. हिंदूंना जोडण्याची ही नीती विरोधकांनाही माघार घेण्यास भाग पाडत असल्याचे दिसते.
अयोध्या राम मंदिर : १८०० कोटी
राम मंदिराच्या उभारणीची भाजपची मागणी १९८० च्या दशकातील आहे. अनेक काळ देशाचे राजकारणच या भोवती फिरत राहिले. त्या वेळी राम जन्मभूमी मंदिर बांधकामाला पाठिंबा मिळविण्यासाठी लालकृष्ण अडवानी यांनी रथयात्रा काढली होती. स्वतः मोदी देखील त्या यात्रेत सहभागी झाले होते. या यात्रेनंतर झालेला बाबरीचा विध्वंस त्यानंतर देशात आकाराला आलेले हिंदुत्वाचे राजकारण हे सर्वज्ञात आहे. पुढे हेच प्रकरण न्यायालयात गेले.
केंद्रात सरकार बदलल्यावर सुनावणीला वेग आला. सर्वोच्च न्यायालयाने नोव्हेंबर २०१९ मध्ये निकाल दिला. ६ डिसेंबर १९९२ पर्यंत ज्या ठिकाणी बाबरी मशीद उभी होती, तिथे राम मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा झाला. मोदी यांनी ऑगस्ट २०२० मध्ये अयोध्येत राम मंदिराची पायाभरणी केली. भाजपने तीन दशकांहून अधिक काळ दिलेल्या वचनाची पूर्तता म्हणून राम मंदिराकडे पाहिले जाते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधी याचे उद्घाटन करण्याचा विचार सुरू आहे.
काशी विश्वनाथ : ७५० कोटी
वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिर संकुलाच्या नूतनीकरणासाठी पंतप्रधान मोदींनी मार्च २०१९ मध्ये काशी विश्वनाथ कॉरिडॉर प्रकल्प सुरू केला. सरकारने सुमारे ४०० इमारती आणि घरे ताब्यात घेतली. काशी विश्वनाथ मंदिराच्या पुनर्निर्माण प्रकल्पाचा भाग म्हणून येथील काही इमारती पाडण्यात आल्या. या प्रक्रियेत जुनी वास्तू असलेली ४० मंदिरेही हलविण्यात आली.
काशी विश्वनाथ कॉरिडॉर आता महादेवाशी संबंधित असून तो थेट गंगा नदीशी जोडण्यात आला आहे. काशी विश्वनाथ मंदिरावर अनेक हल्ले झाले. नंतर राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी मंदिराची पुनर्बांधणी केली. त्यानंतर मोदी सरकारने आता हा कॉरिडॉर उभा केला आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या दोन महिन्यांपूर्वी पंतप्रधान मोदींनी काशी विश्वनाथ कॉरिडॉर प्रकल्पाचे उद्घाटन केले.
गुजरातमधील सोमनाथ मंदिर
गुजरातमधील सोमनाथ मंदिरही महादेवाच्या बारा जोर्तिंलिंगांपैकी एक आहे. या मंदिरावरही अनेकदा परकीयांनी हल्ले करून ते नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पुढे
अहिल्याबाई होळकर यांनी मंदिर उभारणीसाठी प्रयत्न केले. पंतप्रधान मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी मंदिर परिसराच्या सुशोभीकरणासाठी पुढाकार घेतला. स्वातंत्र्यानंतर पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुढाकाराने या मंदिराचा जीर्णोद्धार झाला होता. मोदी हे सोमनाथ मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. येथे अतिशय भव्यदिव्य परिसर त्यांनी तयार केला आहे.
केदारनाथ मंदिर : ३४ कोटी
केदारनाथ मंदिर आणि पंतप्रधान मोदी यांचे जिव्हाळ्याचे नाते आहे. राजकारणात येण्यापूर्वी त्यांचे आवडते ठिकाण केदारनाथ होते, असे त्यांनी एकदा मुलाखतीत सांगितले. २०१३ मध्ये उत्तराखंडमध्ये आलेल्या प्रलयामुळे केदारनाथ मंदिर परिसर उद्ध्वस्त झाल्यावर २०१४ मध्ये केंद्रात सत्तेवर आल्यावर लगेच त्यांनी नूतनीकरण सुरू केले.
आता संपूर्ण मंदिर परिसराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. स्वतः लक्ष घालून त्यांनी येथील विकास साधला. उत्तराखंड राज्यात त्यांची सत्ता आल्यावर कामाचा वेग अधिक वाढला. ईशानेश्वर मंदिर, आस्था चौकातील ओंकार मूर्ती, आदिगुरू शंकराचार्यांच्या समाधीची दुरुस्ती, मुख्य मंदिराजवळील शिव उद्यान आणि वासुकी तलाव विकसित करण्यात आला.
चारधाम प्रकल्प
गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ या चार तीर्थक्षेत्रांना जोडण्यासाठी मोदी यांनी चारधाम प्रकल्प सुरू केला. हिंदू धर्मात चारधाम यात्रा एक आध्यात्मिक आत्मीयतेचा भाग आहे. चारधाम स्थळांना जोडण्यासाठी रस्त्यांचे जाळे निर्माण केले. रेल्वेमार्गही बांधले. उत्तराखंडमधील ऋषीकेश आणि कर्णप्रयाग यांना जोडण्यात येत आहे. २०२५ पर्यंत रेल्वे लिंक कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.
उज्जैन : ८५० कोटी
उज्जैन येथे महाकाल मंदिराचे पुनरुज्जीवन करण्याची योजना आखली. उज्जैन कॉरिडॉरचे नुकतेच मोदी यांनी उद्घाटन केले.
काली मंदिर : १२५ कोटी
गुजरातमधील पवागठ येथे काली मंदिराचा जीर्णोद्धार केला. १८ जून २०२२ ला मोदी यांनी नूतनीकरण केलेल्या कालिका माता मंदिरावर ध्वज फडकविण्यात आला.
मोढेरा सूर्य मंदिर : ३९०० कोटी
जगातील पहिले हेरिटेजमधील मंदिर, जे संपूर्णपणे सौरऊर्जेवर चालते. गुजरातमधील मोढेरा येथे हे सूर्य मंदिर आहे. थ्रीडी योजना या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे. साउंड व लाइट्सच्या माध्यमातून मंदिराची उभारणी दाखविण्यात येते. त्यामुळे देशभरातील पर्यटक आवर्जून या मंदिराला भेट देतात.
कर्तारपूर कॉरिडॉर
गुरू नानक यांच्या ५५० व्या जयंतीनिमित्त कर्तारपूर कॉरिडॉरची सुरुवात करण्यात आली. यासाठी १२० कोटी रुपयांचा निधी खर्च केला.
परदेशातील मंदिरे
मोदी यांनी २०१८ मध्ये अबुधाबी येथे पहिल्या हिंदू मंदिराची पायाभरणी केली. तेथील सरकारने २०१५ मध्ये मंदिरासाठी जमीन दिली होती. बहारीनमधील २०० वर्षे जुन्या मंदिराच्या कोट्यवधी डॉलरच्या नूतनीकरण प्रकल्पाचा प्रारंभ २०१९ मध्ये करण्यात आला. नुकतेच त्यांनी ऑस्ट्रेलियात भेट दिली, त्या वेळीही त्यांनी हिंदू मंदिरांवर होणारे हल्ले खपवून घेणार नाही, असे सांगितले. बांगलादेशातही प्राचीन मंदिरांना त्यांनी भेट दिली होती. एकूणच, परदेशातही मंदिरांचे पुनरुज्जीवन आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचे काम सुरूच आहे.
काश्मीरमध्ये मंदिरांचे पुनरुज्जीवन
जम्मू आणि काश्मीरमधील ३७० वे कलम रद्द केल्यावर तेथील मंदिरांचे पुनरुज्जीवन हा मोठा प्रकल्प आहे. त्याशिवाय, त्या ठिकाणी जगभरात प्रसिद्ध असलेले तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्ट अंतर्गत व्यंकटरमणाचे मंदिरही ८ जूनला सुरू करण्यात येईल. जम्मू आणि काश्मीरमध्ये बंद करण्यात आलेली मंदिरे केंद्र सरकार पुन्हा सुरू करीत आहे. मंदिरांच्या संख्यांबाबत वेगवेगळी आकडेवारी पुढे येत असली, तरी विस्थापित काश्मिरी हिंदूंमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी अशा मंदिरांच्या जीर्णोद्धाराचे काम वेगाने सुरू आहे. श्रीनगरमधील झेलम नदीच्या काठावरील रघुनाथ मंदिर आणि शीतलनाथ मंदिराचे काम सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.