नवी दिल्ली - हिमाचल प्रदेश, दिल्ली, जम्मू-काश्मीर, पंजाबसह उत्तरेकडील राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळल्याने रविवारी जनजीवन विस्कळित झाले. पावसामुळे विविध ठिकाणी झालेल्या भूस्खलनामुळे, दरडी कोसळल्यामुळे आणि पुरामुळे किमान १५ जण मृत्यूमुखी पडले असून अनेक जणांना पुराचा फटका बसला आहे.
हिमाचल प्रदेशात आज मुसळधार पावसामुळे नद्यांनी रौद्ररूप धारण केले होते. राज्यातील सात शहरांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता यापैकी, तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या भूस्खलनाच्या घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. यामध्ये सिमला येथे भूस्खलनामध्ये एक घर कोसळून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला.
हिमाचलमध्ये मागील ३६ तासांत भूस्खलनाच्या १४ घटना घडल्या असून १३ ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाल्यामुळे सुमारे ७०० रस्ते बंद करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली. त्याचप्रमाणे मनाली येथे पूरसदृश स्थितीमुळे काही दुकाने वाहून गेली आहेत, तर कुलूसह काही शहरांत आलेल्या पुरामुळे वाहने वाहून गेल्याचे स्थानिक प्रशासनाने सांगितले.
दरम्यान, उत्तराखंड मधील ऋषीकेश-बद्रिनाथ राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भूस्खलनामुले भाविकांची मोटार दरीत कोसळल्याने तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या मोटारीमध्ये एकूण ११ जण होते त्यापैकी पाच जणांना वाचविण्यात यश आले असल्याची माहिती राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या वतीने देण्यात आली.
राजधानी दिल्ली आणि गुरुग्रामसह उत्तरेकडील राज्यांतील अनेक शहरांत रविवारी रस्त्यांवर पाणी आल्यामुळे वाहतूक विस्कळित झाली असून, अनेक वाहने अडकून पडली आहेत. रेल्वेच्या वाहतुकीवर देखील मुसळधार पावसाचा परिणाम झाला आहे. उत्तर रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, रविवारी १७ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या, तर १२ रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले.
मुसळधार पावसामुळे जम्मू-काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेशमधील अनेक शहरांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. राजधानी दिल्लीमध्ये रविवारी सकाळी साडे आठ वाजता पूर्वीच्या २४ तासांत १५३ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, १९८२ नंतर पहिल्यांदाच दिल्लीत इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे.
पंजाब हरियानातही झोडपले
पंजाब आणि हरियानामधील अनेक शहरांमध्ये रविवारी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले. हरियानामध्ये मार्कंडा, घग्गर आणि टांगरी या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने सरकारच्या वतीने पूरनियंत्रण कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. गुरुग्राम येथे मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचल्याने येथील वाहतुकीवर परिणाम झाला.
राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील अनेक शहरांतही मुसळधार पाऊस झाला असून काही शहरांना रेड अलर्ट तर काही शहरांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हिमाचलमधील लाहोल-स्पीती येथील चंद्रताल येथे २००जण अडकले
हिमाचलमध्ये शाळांना दोन दिवस सुटी
पुंच येथील डोगरा नाला येथे पुरात बुडाल्याने दोन जवानांचा मृत्यू
लेह येथे काही ठिकाणी हिमवृष्टी तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस, हवामान खात्याकडून रेड अलर्ट
लेह कारगिल-श्रीनगर मार्गावर वाहतूक ठप्प
उत्तर प्रदेशात बलिआ येथे वीज कोसळून दोघांचा मृत्यू
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.