Padma Awards 2024 : नुकतीच भारत सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. कला, सामाजिक कार्य, विज्ञान, वैद्यक, मनोरंजन इत्यादी क्षेत्रांमधील उल्लेखनीय योगदानासाठी हे पुरस्कार दरवर्षी दिले जातात. यंदा पद्मश्री पुरस्कारासाठी एकूण ११० जणांची निवड करण्यात आली आहे.
यामध्ये सामान्यांतील असामान्य अशा ३४ जणांची निवड करण्यात आली आहे. पद्म पुरस्कार हा भारतातील सर्वात महत्वाचा पुरस्कार आहे. भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न नंतर पद्मपुरस्कार सर्वात महत्वाचे मानले जातात. हे पुरस्कार पद्म, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री अशा श्रेणींमध्ये दिले जातात.
यंदाच्या पद्म पुरस्कारांमध्ये पार्वती बरूआ यांच्या नावाचाही समावेश आहे. पार्वती बरूआ या भारतातील पहिल्या महिला माहुत आहेत. ‘हत्तीची परी’ म्हणून ही त्यांना ओळखले जाते. बरूआ यांना त्यांच्या प्राण्यांप्रती असलेल्या योगदानाबद्दल (प्राणी कल्याण) यंदाचा पद्मश्री पुरस्कार देण्यात येणार आहे. पद्मश्री पुरस्कार हा देशातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. आज आपण भारताच्या पहिल्या माहुत पार्वती बरूआ यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत.
भारत सरकारने जारी केलेल्या माहितीनुसार, ६७ वर्षीय पार्वती बरूआ यांची कौटुंबिक पार्श्वभूमी ही श्रीमंत होती. मात्र, तरीही त्यांनी हत्तींसाठी समर्पित असलेले साधे जीवन स्विकारले. पार्वती यांचे वडिल हे प्रसिद्ध हत्ती तज्ज्ञ होते.
वडिलांप्रमाणेच त्यांना हत्तींची खूप आवड होती. त्यांना लहानपणापासूनच हत्तींचा लळा होता. वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी पार्वती यांनी हत्तींना त्यांच्या तालावर नाचवायला सुरूवात केली होती. चाळीस वर्षांच्या त्यांच्या कार्यकाळात आतापर्यंत त्यांनी अनेक वन्य हत्तींचे आयुष्य वाचवण्यात आणि त्यांना आकार देण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे.
अनेकदा पुरूषांना हत्तींचे माहुत म्हणून पाहिले जाते. मात्र, आसामची राजधानी असलेल्या गुवाहटीच्या पार्वती बरूआ त्याला अपवाद आहेत. या भारतातील पहिल्या महिला माहुत असून त्यांनी या रूढीवादी विचारांना नेहमीच आव्हान दिले आहे.
पार्वती यांनी पुरूषप्रधान क्षेत्रात स्वत:चे एक आगळेवेगळे स्थान निर्माण केले आहे. मानव आणि हत्तींमध्ये होणारा संघर्ष कमी करण्यासाठी त्या उभ्या राहिल्या. पार्वती यांनी जंगली हत्तींना हाताळण्यात आणि त्यांना पकडण्यात आतापर्यंत ३ राज्यांची मदत केली आहे. अनेकांचे प्राण वाचवण्यात आणि हत्तींना संरक्षण मिळवून देण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.
पार्वती या हत्तींशी संबंधित असलेल्या अनेक संस्थांशी देखील संबंधित आहेत. त्या एशियन एलिफंट स्पेशालिस्ट ग्रुप IUCN च्या सदस्य आहेत. पार्वती यांच्या आयुष्यावर अनेक माहितीपटही बनवण्यात आले आहेत.
'बीबीसी' या वृत्तवाहिनीने त्यांच्या जीवनावर आधारित माहितीपट बनवला होता. या माहितीपटाचे नाव हत्तींची राणी (Queen Of the Elephants) असे आहे. पार्वती यांना कोलकाता आंतरराष्ट्रीय वन्यजीव आणि पर्यावरण चित्रपट महोत्सवात जीवनगौरव या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.