राळेगणसिद्धी : आपण आंदोलनं करून लोकहिताचे अनेक कायदे मंजूर करून घेतले. मात्र आता सरकारला वाटेल ते कायदे बहुमताच्या जोरावर पास करण्यात येत आहे. मागणी नसताना अनेक कायदे करण्यात येत आहे. जनताच कुंभकर्णासारखी झोपली. त्यामुळे हे शक्य आहे. आता जनतेने आवाज उठवून सरकार बदलण्याची ताकद उभी केली पाहिजे, तेव्हाच सरकार झुकेल आणि जाचक कायदे रद्द करेल, असं मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्ती केलं. ते देशबचाव जनआंदोलन समितीशी बोलत होते.
गेल्या आठवड्यात जनआंदोलन समितीने पत्रकार परिषद घेऊन तीन कृषी कायदे, बेरोजगारी, इंधन दरवाढ आणि देशात सुरू असलेलं सरकारी कंपन्या विकण्याचं धोरण यावर केंद्र सरकारविरुद्ध आवाज उठविण्याचं आवाहन अण्णा हजारेंना केलं होतं. अन्यथा केंद्र सरकार आणि अण्णा हजारेंविरुद्ध राळेगणसिद्धीत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आज देश बचाव जन आंदोलन समितीचे पदाधिकारी अण्णांना भेटले. यावेळी ऍड. रवींद्र रणसिंग, रवींद्र देशमुख, मारुती भापकर, सागर आल्हाट, दुर्गा भोर, मुकुंद काकडे, ऍड. देविदास शिंदे उपस्थित होते.
यावेळी अण्णा म्हणाले की, माझ वय ८४ वर्षे आहे. मी कधीपर्यंत लढू, देश बचाव जनआंदोलन समिती युवकांनी स्थापन केली. यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो. तुम्ही लढा उभा करा, मी तुमच्यासोबत आवश्य येईल. मात्र त्याचवेळी देशात सरकारकडून मागणी नसताना लादण्यात येत असलेल्या कायद्यांवर, सरकारी कंपन्या विकण्याच्या धोरणांवर अण्णांनी खंत व्यक्त केली. देशातील जनता कुंभकर्णासारखी झोपली आहे. ही जनता जोपर्यंत जागी होत नाही आणि सरकार बदलण्याची ताकद उभी करत नाही, तोपर्यंत सरकार झुकणार नाही. असेच कायदे आणि निर्णय लादण्यात येतील, असंही अण्णांनी म्हटलं.
यावेळी अण्णांना २०१२ मधील आंदोलनाची आठवण करून देत तुमच्या शब्दाला दिल्लीत वजन आहे. तुम्ही दिल्लीला हलवू शकता, त्यामुळे आम्ही तुमच्याकडे आल्याचं रवींद्र देशमुख यांनी म्हटलं. त्यावर अण्णा म्हणाले की, शेतकरी कायदे, वाढती महागाई, बेरोजगारी याविरुद्ध लढा देण्यासाठी तुम्ही संघटन उभं करा, मला जेव्हा वाटेल तुम्ही योग्य मार्गाने जात आहात, तर मी तुमच्या आंदोलनात आवश्य सहभागी होईल. तसेच मी जागा आहे, मी काही झोपलेलो नाही, असंही अण्णांनी सरकारला ठणकावून सांगितलं.
दिल्लीतील आंदोलकांनी संपर्कच साधला नाही
दिल्लीत ८ महिन्यांपासून कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनांला तुम्ही पाठबळ द्या, अशी विनंती मारोती भापकर यांनी केली. त्यावर अण्णा म्हणाले की, दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांनी आपल्याशी संपर्क केला नाही. तसेच शेतकरी प्रश्नी पाच वर्षांपासून आपण पाठपुरावा करतोय. केंद्रीय कृषीराज्यमंत्र्यांनी देखील आपल्याला कृषी कायद्यांसंदर्भात उच्च स्थरीय समिती नेमण्याचा शब्द दिलाय. कोरोनामुळे समिती स्थापन झाली नाही. मात्र तरी आपण पाठपुरावा करत आहोत, असंही अण्णांनी नमूद केलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.