PM narendra modi government ruled 8 years PM modi amit shah again target South India sakal
देश

मोदी-शहा यांचे पुढील लक्ष्य- `लुक साऊथ' !

सरकारचा अष्टवर्षपूर्ती सोहळा सुरू; संघ मुखपत्राचे ट्विट- ७० वर्षांपुढील सारे बाद !

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून २०१४ मध्ये आजच्याच दिवशी प्रथम सूत्रे हाती घेतली. तेव्हापासूनच्या ८ वर्षांतील मोदी सरकारच्या योजनांचा गौरव करण्यासाठीचा सोहळा भारतीय जनता पक्षाने आजपासून सुरू केला. स्वतः मोदींनी मात्र आजच्या दिवशी तेलंगणाला भेट देण्याची योजना आखली. अनेक केंद्रीय मंत्री दाक्षिणात्य राज्यांत गेले आहेत. २०२४ चा रोडमॅप आखताना ‘टीम मोदी‘ चे लक्ष्य ‘पुन्हा एकदा दक्षिण भारत' हे असणार हेही अधोरेखित झाले. याच दरम्यान संघाच्या मुखपत्रातून २०२४ साठी तिकीट देताना भाजप ७० ची वयोमर्यादा पाळणार, असे सूचक ट्विट करण्यात आल्याने तो विलक्षण चर्चेचा विषय ठरला. कारण तसे सूत्र खरेच ठरले तर ? अहो तर, स्वतः मोदीच निवडणूक राजकारणातून बाद होतात, मग भाजपचे २०२४ मध्ये काय आणी कसे होणार, हा भाजप जनांना व्याकूळ करणारा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने दुसऱयांदा सत्ता मिळविली व २०२४ मध्येही वातावरण मोदी-शहा यांच्या नेतृत्वाखालील भाजपला अनुकूल आहे असे भाजप नेते छातीठोकपणे सांगतात. २०१९ मध्ये मोदी यांचा दुसऱयांदा शपथविधी झाला त्या ३० मे पर्यंत (सोमवार) भाजपचा हा अष्टवर्ष पूर्ती सोहळा सुरू राहील. मात्र या ८ वर्षांत त्याच भाजपला कर्नाटक वगळता दक्षिण भारताने (विंध्याचलाच्या खालचा पट्टा) साफ व वारंवार नाकारले आहे हे वास्तव. राजकीय तज्ज्ञांच्या मते तमिळनाडू,आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ या राज्यांत भाजपची पाटी कोरीच रहाते. त्यामागे भाजप नेतृत्वाची ‘अंग्रेजी में हाथ तंग' ही सकृतदर्शनी वस्तुस्थिती असली तरी दाक्षिणात्य राज्ये व पश्चिम बंगालसारखी राज्ये मुळात पुरोगामी विचारसरणीची आहेत व भाजपच्या ‘मूळ' विचारसरणीला येथील जनता मुळापासून स्वीकारत नाही याची जाणीवही भाजप व त्यांच्या मातृसंस्थेला आहे.

त्यामुळेच संघाने केरळमध्ये व भाजपने बंगालमध्ये विस्तार करण्याचे प्रयत्न चिकाटीने सुरू ठेवले आहेत. बंगालमध्ये त्याला काही प्रमाणात यश आले असले तरी केरळसह अन्य दाक्षिणात्य राज्ये भाजपला थारा देत नाहीत. त्यामुळे मोदींनी २६ जानेवारीच्या मुहूर्तावर तेलंगणा गाठून भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केले. तमिळनाडूसह अन्य राज्यांतही केंद्राच्या अनेक विकासयोजनांच्या उद्घाटनाचा मुहूर्त आजपासून ठेवण्यात आला आहे. रेल्वे व अन्य योजनांच्या उद्घाटनांसाठी केंद्रीय मंत्र्यांना दक्षिणेत पाठविण्यात आले आहे. भाजप मंत्री व खासदारांच्या ‘मतदारसंघ प्रवास' योजनेतही दाक्षिणात्य राज्यांवर जोर देण्यात आला आहे. २०२४ पर्यंत दाक्षिणात्य राज्यांतील जनाधार विस्तारण्याची महत्वाकांक्षी योजना भाजपने आखली आहे.

संघाची ‘गुगली‘ !

संघाच्या पांचजन्य या मुखपत्राने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या तिकीट वाटप निकषांवर आज एक सूचक ट्विट करून नवीच चर्चा सुरू करून दिली. ‘‘२०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपचा नवा फॉर्म्यूला - ७० वर्षांपुढील उमेदवारांना तिकीटे नाहीत' असे ट्विट पांचजन्य ने केले. संघाच्या मुखपत्राच्या अधिकृत हॅंडलवरून केलेले हे ट्विट प्रचंड चर्चेचा विषय ठरले आहे. कारण संघाने यापूर्वी ७५ वर्षांपुढील नेते सक्रिय राजकारणातून बाद, हे सूत्र ठरवल्यावर भाजपने पक्षाचे भीष्माचार्य लालकृष्ण अडवानी, डॉ. मुरली मनोहर जोशी यांच्यापासून माजी लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्यासह अनेक दिग्गजांना २०१९ मध्ये घरी बसविले होते. आता ही वयोमर्यादा ७० पर्यंत घटविण्यात येणार असली तर त्या अटीनुसार राजनाथसिंह यांच्यासह अनेक भाजप नेते बाद होतातच, पण सर्वांत लक्षमीय म्हणजे भाजप ज्यांच्या चेहऱयावर विजयामागून विजय मिळवत चालाल आहे ते स्वतः नरेंद्र मोदी हे आताच सत्तरीपार आहेत. २०२४ मध्ये मोदी ७४ वर्षांचे होतील. साहजिकच संघाच्या दिशेने आलेल्या या ‘गुगली‘ची जोरदार चर्चा आहे. पांचजन्य हे संघाचे मुखपत्रच नाही, असा खुलासा अद्याप आलेला नाही.

‘गमनागमन' नेतृत्व

कॉंग्रेसचे नेतृत्व (राहूल गांधी) हे विदेशवाऱयांत रमलेले ‘गमनागमन नेतृत्व' असल्याचा हल्लाबोल भाजपने आज केला. सर्वांत जुना पक्ष म्हणवणाऱया कॉंग्रेसची स्थिती घरातील जुन्या वस्तू व जुन्या कपड्यांसारखी होत चालल्याचा घणाघात भाजपने केला. गेल्या अडीच वर्षांत कोरोना महामारी, रशिया-युक्रेन युध्द यामुळे अनेक पाश्चात्य, विकसित देशांच्या अर्थव्यवस्थाही डगमगत आहेत. तेथील महागाई दर १० टक्क्यांच्या पुढे गेला आहे. मात्र नरेंद्र मोदी सरकारने महागाई दर ७.५ टक्क्यांवरच रोखण्यात यश मिळविले आहे. जागतिक पातळीवरील भारताचा वाढलेला मानसन्मान, भारताचा साडेआठ टक्क्यांवरील विकास दर दिसत नाही यामागे राहूल गांधी यांची ‘नजर' चुकीची आहे की त्यांच्यासमोरचा ‘नजारा‘ चुकीचा आहे हे माहिती नाही असा टोला भाजपने लगावला आहे.

काशी विश्वनाथ, मथुरा, कुतबमिनार, ताजमहाल येथील मंदिर-मशीद विवाद नेमके आताच उफाळून येणे याचा स्पष्ट अर्थ हा की भाजपचे ‘२०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा पाया‘ तयार करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. धर्मनिरपेक्षतवादी विरोधी पक्ष ही चाल व हा धोका ओळखून जेवढ्या लवकर एकजूट होतील तेवढे लोकशाहीसाठी चांगले होईल.

- सीताराम येच्युरी (माकप सरचिटणीस)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT