नवी दिल्ली : राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उद्या (ता. 26) मेजवानीचे निमंत्रण दिले आहे. यामध्ये राष्ट्रपती पदासाठी विरोधकांचा सहमतीचा उमेदवार रिंगणात उतरविण्यावर चर्चा होणार आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या गटांकडून संभाव्य चेहऱ्यांची नावे पुढे करण्यात आली असली तरी उद्याची बैठक म्हणजे विरोधकांचे शक्तीप्रदर्शन आणि नावनिश्चितीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
संसद भवनाच्या परिसरात होणाऱ्या मेजवानी वजा बैठकीला सोनिया गांधींनी सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना निमंत्रण पाठविले असले तरी या निमंत्रण यादीतून मात्र दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना वगळले असल्याचे समजते. यामध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, माकप सरचिटणीस सीताराम येचुरी, राष्ट्रीय जनता दलाचे लालू प्रसाद यादव, संयुक्त जनता दलाचे नेते शरद यादव यांच्यासह द्रमुकचे नेते उपस्थित राहणार आहेत. मात्र बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या हजेरीची शक्यता कमी आहे. विरोधकांचा संयुक्त उमेदवार म्हणून संभाव्य चेहऱ्यांमध्ये शरद यादव, गोपालकृष्ण गांधी, मीराकुमार, शरद पवार आदी नावांची चर्चा झाली आहे. मात्र, शरद पवार यांच्याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसनेच स्पष्ट शब्दात इन्कार केला आहे.
शक्तीप्रदर्शनाचा प्रयत्न
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत आपला उमेदवार विजयी करण्यासाठी सत्ताधारी एनडीएला सुमारे 18000 मतांचा तुटवडा भासत असून इतर लहान पक्षांना चुचकारून ही कसर भरून काढण्याचा प्रयत्न आहे. मात्र, भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी ओडिशा, तेलंगणासारख्या राज्यांमध्ये पक्षविस्तार करण्यासाठी वळविलेला मोर्चा, हा आतापर्यंत काठावर राहून निर्णायक क्षणी भाजपला अनुकूल भूमिका घेणाऱ्या बिजू जनता दल, तेलंगण राष्ट्र समितीसारख्या पक्षांना अस्वस्थ करणारा ठरला आहे. दुसरीकडे लालूप्रसाद यादव, मायावती, ममता बॅनर्जी ही मंडळी सीबीआय, प्राप्तिकर खाते, सक्तवसुली संचलनालय यासारख्या संस्थांचा ससेमिरा मागे लागल्यामुळे हैराण आहेत. या साऱ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने सर्व विरोधकांची मोट बांधून शक्तीप्रदर्शन करण्याचा हा प्रयत्न आहे.
|