अर्थसंकल्पी अधिवेशन
नवी दिल्ली : विनेश फोगाट अपात्रताप्रकरणाचे संसदेमध्येही तीव्र पडसाद उमटले. क्रीडामंत्री मनसुख मंडाविया यांनी दुपारी याप्रकरणी लोकसभेत निवेदन केले. त्यांच्या निवेदनादरम्यान विरोधी पक्षांच्या खासदारांनी जोरदार गोंधळ घालत पॅरिस ऑलिंपिक समितीच्या निर्णयावर रोष व्यक्त केला.
ऑलिंपिक कुस्ती स्पर्धेत खेळाडू वजन करण्यासाठी सहभागी होत नसेल किंवा वजन जास्त भरून अयशस्वी ठरत असेल तर त्याला स्पर्धेतून बाहेर करून कोणत्याही मानांकनाशिवाय शेवटच्या स्थानावर ठेवले जाते. पॅरिसच्या स्थानिक प्रमाणवेळेनुसार ७ ऑगस्ट रोजी सकाळी ७.१५ ते ७.३० वाजता अंतिम फेरीत दाखल झालेल्या स्पर्धकांचे वजन मोजण्यात आले. विनेशचे वजन ५० किलो १०० ग्रॅम भरल्याने तिला स्पर्धेसाठी अपात्र घोषित करण्यात आले. त्यामुळे तिला अपात्र ठरविण्यात आले. या निर्णयाचा भारतीय ऑलिंपिक संघटनेने आंतरराष्ट्रीय कुस्ती संघाकडे तीव्र विरोध नोंदविला आहे. भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्ष पी.टी.उषा पॅरिसमध्ये असून पंतप्रधानांनी त्यांच्याशी बोलून योग्य कार्यवाही आणि कृती करण्यास सांगितले आहे, अशी माहिती मंडाविया यांनी दिली. विनेश फोगाटवर केंद्र सरकारने पॅरिस ऑलिंपिकच्या तयारीसाठी एकूण ७०.४५ लाख रुपये खर्च केले. त्यापूर्वी टोकियो ऑलिंपिक स्पर्धेसाठी १ कोटी ६६ लाख रुपये खर्च केले होते, अशी माहिती मंडाविया यांनी दिली.
सगळ्या देशालाच धक्का
‘‘विनेशच्या सुवर्णपदकाची अंतिम लढत बघण्यासाठी अवघ्या देशाचे डोळे दूरचित्रवाणीवाहिनीकडे लागले असताना त्यांना अपात्र घोषित करण्यात आल्याने संपूर्ण देशालाच धक्का बसला आहे. आज संपूर्ण देश दुःखी आहे. सर्वांच्या ह्रदयात सल आहे पण विनेश देशाच्या नजरेत विजेती आहे आणि विजेती राहील. जेव्हा जगातील सारे कुस्तीपटू सराव करीत होते, तेव्हा विनेश भारतीय कुस्तीपटूंना न्याय मिळवून देण्यासाठी सतरंजीवर बसली होती. विनेशने ३ लढती योग्य वजनात खेळल्या आणि अंतिम फेरी गाठली त्यामुळे तिला किमान रौप्य पदकासाठी तरी पात्र मानले जावे आणि त्यासाठी भारतीय ऑलिंपिक समितीने अपील करावे,’’ असे आवाहन काँग्रेसचे लोकसभेतील खासदार दीपिंदरसिंह हुड्डा यांनी केले आहे.
विनेश फोगाट यांच्या वाट्याला आलेल्या निराशेत देशवासीय सहभागी आहेत. १४० कोटी देशवासीयांच्या ह्रदयातील विजेती विनेश भारतीय महिलांच्या अथक भावनांची प्रतीक आहे. भविष्यात त्यांना भरभरून यश मिळेल.
- द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपती
विनेशला अपात्र ठरविणे अतिशय दुर्दैवी आहे. या निर्णयाला भारतीय ऑलिंपिक संघटना ठामपणे आव्हान देऊन देशाच्या मुलीला न्याय मिळवून देईल. विनेश जोरदार पुनरागमन करेल. तिने देशाचा गौरव वाढविला असून संपूर्ण देश तिच्यासोबत उभा आहे.
- राहुल गांधी, विरोधी पक्ष नेते
विनेशलाअंतिम फेरी अपात्र ठरविण्यामागच्या तांत्रिक कारणांची सखोल चौकशी करण्यात यावी. त्यामागचे खरे कारण काय आहे? हे सुनिश्चित करण्यात यावे.
- अखिलेश यादव,
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष
हा विनेशचा नव्हे तर देशाचा अपमान आहे. हा घोर अन्याय असून भारत सरकारने तत्काळ हस्तक्षेप करावा. भारताचे म्हणणे मानले नाही तर ऑलिंपिक स्पर्धेचा बहिष्कार करण्यात यावा.
- संजयसिंह, आम आदमी पक्षाचे नेते
एकशेचाळीस कोटी देशवासीय स्तब्ध असून हा क्रीडा इतिहासातील काळा दिवस आहे. हे एक मोठे द्वेषाचे कारस्थान आहे. आधी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष व पंतप्रधान मोदी यांचे आवडते तत्कालीन खासदार बृजभूषण शरणसिंह यांनी विश्वविजेत्या मुलींचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. विनेश फोगाटचा विजय पचनी न पडलेले कोण आहेत?
- रणदीप सुरजेवाला, काँग्रेसचे खासदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.