नवी दिल्ली, ता. १४ (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काश्मीरकडे दुर्लक्ष होते आणि येथील सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींकडे दुर्लक्ष केल्यानेच नंतर पूलवामा हल्ला झाला, असा सनसनाटी आरोप जम्मू-काश्मीरचे अखेरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी ‘द वायर’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. मोदींना भ्रष्टाचाराबाबत फारसा तिटकाराही नाही, असेही मलिक यांनी म्हटले आहे.
जम्मू-काश्मीरचे केंद्रशासित प्रदेशात रूपांतर होण्याआधीच्या या राज्याचे सत्यपाल मलिक हे अखेरचे राज्यपाल होते. फेब्रुवारी २०१९ मध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्याच्यावेळीही तेच राज्यपाल होते. केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ताफ्यावर झालेला हा हल्ला म्हणजे ‘सीआरपीएफ’ आणि केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या ‘अकार्यक्षमता’ आणि ‘बेजबाबदारपणा’चा परिणाम होता, असा आरोप मलिक यांनी मुलाखतीमध्ये केला आहे.
जवानांना हवाई मार्गाने नेण्याची ‘सीआरपीएफ’ने केलेली मागणी केंद्रीय गृह मंत्रालयाने फेटाळली होती, जवानांना नेण्याच्या मार्गावरही पुरेशी सुरक्षा तपासणी झाली नव्हती, असा दावा मलिक यांनी केला.
मलिक म्हणाले,‘‘ विशेष म्हणजे, पुलवामा हल्ल्यानंतर मोदी यांनी कॉर्बेट उद्यानाबाहेरून माझ्याशी संपर्क साधला त्यावेळी मी त्यांना त्रुटींची माहिती दिली होती. मात्र, त्यांनी मला याबाबत शांत बसण्यास सांगितले. नंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनीही मला हेच सांगितले. सर्व खापर पाकिस्तानवर फोडण्याचा आणि घटनेचा राजकीय फायदा उठविण्याचा यामागील उद्देश असल्याचे मला समजून चुकले.’’
पुलवामा हल्ल्यासाठी वापरलेली मोटार ३०० किलो स्फोटकांसह पाकिस्तानातून आली होती आणि ती १० ते १५ दिवस जम्मू-काश्मीरमध्ये फिरत होती, तरी गुप्तचर यंत्रणांना समजले नव्हते, असा आरोपही मलिक यांनी केला.
मलिक यांनी जम्मू-काश्मीरमधील विविध राजकीय घटनांवरही भाष्य केले. जम्मू-काश्मीरमधील एक जलविद्युत प्रकल्प आणि रिलायन्स इन्शुरन्स योजनेला मान्यता देण्यासाठी भाजप नेते राम माधव यांनी मला विनंती केली होती, असे मलिक यांनी सांगितले. मात्र, ‘मी चुकीचे काम करणार नाही, असे माधव यांना स्पष्ट सांगितल्यावरही त्यांनी माझे मन वळविण्याचे प्रयत्न केले होते.
मला काही जणांनी सांगितले होते की, हे प्रकल्प मंजूर केल्यास मला तीनशे कोटी रुपये मिळतील. मोदी यांना काश्मीरबाबत चुकीची माहिती होती आणि त्यांचे या राज्याकडे दुर्लक्ष होते. जम्मू-काश्मीरचा राज्याचा दर्जा काढून घेणे ही चूक होती; ती तातडीने सुधारणे आवश्यक आहे, अशी मागणीही मलिक यांनी केली.
परिणामांची चिंता नाही
या मुलाखतीमध्ये पंतप्रधान मोदींबाबत व्यक्त केलेल्या मतांवर आपण ठाम असून परिणामांची चिंता करत नसल्याचे सत्यपाल मलिक यांनी ठामपणे सांगितले. मला कमीत कमी सुरक्षा पुरविली असली तरी त्याची फिकीर नसल्याचेही ते म्हणाले. अदानी प्रकरणामुळे पंतप्रधान आणि भाजपला मोठा फटका बसला असून विरोधक एकत्र आल्यास भाजपला धोका आहे, असे भाकीतही त्यांनी केले.
मलिक यांचे आरोप
बीबीसी प्रकरण मोदींनी चुकीच्या पद्धतीने हाताळले
मोदी आणि अनेक मंत्र्यांकडून मुस्लिमांना चुकीची वागणूक
राहुल गांधी यांना संसदेत बोलू न देणे ही मोठी चूक
राज्यपाल म्हणून अनेक ‘दुय्यम’ व्यक्तींची नेमणूक
मोदींना भ्रष्टाचाराबाबत चिंता नाही
पंतप्रधान मोदींना भ्रष्टाचाराबाबत फारशी चिंता वाटत नसल्याचा दावाही सत्यपाल मलिक यांनी ‘द वायर’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये केला आहे. ‘गोवा सरकारने दुर्लक्ष केलेल्या भ्रष्टाचाराच्या काही घटना मी मोदींच्या निदर्शनास आणून दिल्यामुळेच ऑगस्ट २०२० मध्ये त्या राज्याच्या राज्यपालपदावरून मला हटवून मेघालयला पाठविण्यात आले.
पंतप्रधानांच्या भोवतीचे अनेक लोक भ्रष्टाचारात अडकले असून ते पंतप्रधान कार्यालयाच्या नावाखाली सर्व गैरप्रकार करतात. मी हे पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून दिले, मात्र त्यांना त्याची फिकीर आहे, असे वाटले नाही. त्यामुळे मोदींना भ्रष्टाचाराबाबत फारशी चिंता नाही, एवढेच मी म्हणू शकतो,’ असे मलिक यांनी मुलाखतीत म्हटले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कोणी भेटायचे, हे पंतप्रधान कार्यालयातर्फे ठरविले जाते, असा आरोप मलिक यांनी केला आहे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.