१४ फेब्रुवारी २०१९. दुपारचे तीन वाजले होते. जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील जम्मू - श्रीनगर नॅशनल हायवे वरून भारतीय जवानांचा ताफा जात होता. जवळपास ७८ गाड्यांमधून सीआरपीएफचे (केंद्रीय राखीव पोलिस दल) २५०० जवान प्रवास करत होते. जम्मू वरून श्रीनगर असा त्यांचा हा प्रवास होता. सगळं काही सुरळीत सुरु असताना अचानक एक कार आली आणि ताफ्यातील एका गाडीला जोरदार धडकली. त्यानंतर मोठा स्फोट झाला. एकच आवाज झाला अन् पुढच्या काही क्षणांत जवानांनी डोळे उघडताच छिन्न विछिन्न अवस्थेतील आपल्या सहकाऱ्यांचे मृतदेह त्यांना दिसले. या घटनेत बसमधील गाडीतील ४० जवानांना आपला जीव गमवावा लागला. जगभरात प्रेमाचा सण साजरा होत असताना ४० कुटुंबांपैकी कुणी आपला पती, कुणी मुलगा, कुणी बाप तर कुणी आपला प्रियकर गमावला होता. (Pulwama Attack)
देशाच्या इतिहासातील असा काळा दिवस कोणताही भारतीय विसरू शकत नाही. एकीकडे प्रेमाचा सन साजरा केला जात असताना दुसऱ्या बाजूला दहशतवाद्यांच्या हिंसक वृत्तीनं कळस गाठला होता. जैश-ए-मोहम्मदच्या हाफिज सईद याने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. हल्ला पाकिस्तानने केला असावा, अशी शक्यता आपल्या सुरक्षा यंत्रणांकडून वर्तवली जात होती. मात्र आम्ही कोणत्याही दहशतवादी कारवाईमध्ये सामील नसल्याचं पाकिस्तानने सांगितलं होतं. त्यानंतर भारतीय सैन्याने जैश-ए-मोहम्मदशी संबंध असल्याच्या आरोपातून सात जणांना ताब्यात घेतलं होतं. असं असलं तरी पाकिस्तानचा यामध्ये हात असू शकतो असा संशय असल्याने सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येत भारतीय सैन्य दलाला समर्थन असल्याचा प्रस्ताव मंजूर केला. त्यानुसार पाकिस्तानच्या वस्तूंवर सीमा शुल्क वाढवून २०० टक्के करण्यात आलं होतं.
पुढे २६ फेब्रुवारी २०१९ भारतीय सैन्याने एलओसी ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन जैश-ए-मोहम्मदच्या तळावर हल्ला केला. भारताने केलेल्या हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी पाकिस्ताननेही भारतीय सैन्यावर हल्ला केला. त्यांना उत्तर देताना भारतीय विंग कमांडर अभिनंदन यांचं विमान पीओकेमध्ये कोसळलं आणि ते पाकिस्तानी सैन्याच्या हाती लागले. जवळपास साठ तास कमांडर अभिनंदन पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात होते. मात्र आंतरराष्ट्रीय दबाव वाढल्याने पाकिस्तानने १ मार्च रोजी अभिनंदन यांची सुटका केली. (Pulwama Attack Investigation Updates)
पुलवामा हल्ल्यानंतर वर्षभरात म्हणजेच २०१९ या संपूर्ण वर्षात झालेला हा घटनाक्रम. पुढे या हल्ल्याला एक वर्ष पूर्ण होऊनही अनेक प्रश्न अनुत्तरीत होते. नॅशनल इन्व्हेस्टीगेशन एजन्सी त्या प्रश्नांची उत्तरं शोधू शकली नव्हती. या भ्याड हल्ल्यातील आरोपी आदिल अहमद दार याच्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणात स्फोटकं कुठून आली? या मुख्य प्रश्नाचं उत्तर सापडू शकलेलं नव्हतं. कारण अशी स्फोटकं युद्धात वापरण्यात येतात. ती फक्त सैन्य तळावरच सापडतात, असं एका वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्याने स्पष्ट केलं होतं. वर्ष पुर्ण झालं होतं, मात्र तरीही एनआयए आरोपपत्र सादर करू शकलं नव्हतं. सगळ्या संशयित आरोपींचा मृत्यू झाल्याचं कारण एनआयएने दिलं होतं. हल्ल्याच्या ९० दिवसांमध्ये आरोपपत्र सादर करावं लागतं. मात्र संशयितांचा मृत्यू झाला असेल तर त्याची वेळ वाढविण्यात येते.
एक वर्ष पूर्ण होऊनही जेव्हा काहीच पत्ता लागला नाही, तेव्हा एनआयएचं अपयश म्हणून या घटनेकडे बघितल्या जाऊ लागलं. देशभरातून एनआयएवर दबाव वाढला. त्यानुसार तपासाचा वेग वाढवण्यात आला आणि १४ फेब्रुवारी २०२१ उजाडेपर्यंत पुलवामा दहशतवादी हल्ला प्रकरणात एनआयएने १३,५०० पानांचं आरोपपत्र दाखल केलं. सीआरपीएफच्या बसला निशाणा करण्याचा डाव हा पुलवामामधील काकापोरा इथल्या एका दुकानदाराचा असल्याचं तपासात समोर आलं होतं.
शिवाय आरोपपत्रात एकूण १९ आरोपींची नावं होती. त्यापैकी ६ ठार झाले होते. तर १३ जिवंत होते. अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा एफबीआयनेही या हल्ल्याचे पुरावे गोळा करण्यात मदत केली. आरोपींपैकी २२ वर्षांचा शाकीर बशीर हा जम्मू-श्रीनगर महामार्गावर लेथपोरा पुलाजवळ फर्निचरचं दुकान चालवत होता. दहशतवादी हल्ल्याच्या कटामधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्थानिकांचा केलेला वापर. त्यामुळे त्याला लगेच ताब्यात घेण्यात आलं. पुलवामामध्ये बसवर हल्ल्यासाठी वापरलेलं आरडीएक्स पाकिस्तानातून आलं होतं, असंही 'एनआयए'च्या तपासात समोर आलं.
भारतीय सैन्याने आरोपींच्या शोधासाठी मोहीम सुरू केली..
जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी लंबू हा फेब्रुवारी २०१९ च्या पुलवामा हल्ल्याचा मुख्य आरोपी होता, आणि तो ठार झाला असल्याचं, काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितलं. अनेक हल्ल्यांमध्ये तो सामील होता. जानेवारी २०१७ मध्ये त्याने काश्मीर खोऱ्यात घुसखोरी केली होती आणि तो दक्षिण काश्मीरमध्ये सक्रिय होता, असं काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी सांगितले.
ऑगस्ट २०२१ पर्यंत पुलवामा हल्ल्यातील १९ पैकी ८ आरोपींना ठार करण्यात आलं होतं. यामध्ये लंबूचा देखील समावेश होता. तर ६ जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं आणि ५ फरार होते. तेव्हापासून सैन्य त्यांच्या मागावर होत. जम्मू काश्मीरमध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या चकमकींमध्ये सैन्यानं शोधून शोधून त्या दहशतवाद्यांना ठार केलं. अखेर ३० डिसेंबर २०२१ ला शेवटचा आरोपी समीर दार देखील अनंतनागमध्ये मारला गेल्याचं विजय कुमार यांनी जानेवारी २०२२ मध्ये सांगितलं.
आज पुलवामा हल्ल्याला ३ वर्ष पूर्ण झाली आहेत. देशाला हादरवून टाकणाऱ्या या हल्ल्याचा निकाल लागला असल्याचं दिसतंय. महत्वाचं म्हणजे पुलवाला हल्ल्यानंतर असेही आरोप करण्यात आले की, हा हल्ला म्हणजे भाजपचा कट होता. पुलवामा हल्ला हा गुजरातच्या गोध्रा दंगलीप्रमाणेच भाजपचा कट होता. गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी हा आरोप केला होता. निवडणुका जिंकण्यासाठी सरकार दहशतवादाचा वापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. मात्र या आरोपांबद्दलचे कुठलेही पुरावे मिळाले नाहीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.