औरंगाबाद : भारत जोडो यात्रेत खासदार राहुल गांधींची एक झलक पहायला अन् ती कॅमेरात कैद करायला हजारो हात आणि डोळे आसुसलेले होते. अशातच मंगळवारी (ता. ८) सायंकाळच्या टप्प्यात सात किलोमीटरचे अंतर पार करुन यात्रा जेव्हा बिजूर (ता. बिलोली, जि. नांदेड) इथं पोहोचली, तेव्हा राहुल यांनी एका शेतकऱ्याच्या घरी जात चक्क कांदे भज्यांवर ताव मारला, तब्बल २५ मिनिटं ते हनुमंत शिनगारेंच्या घरी थांबले. यामुळं या कुटुंबाचा आनंद आता गगनात मावेनासा झाला. (Rahul Gandhi eat Kanda bhaji at farmer house during Bharat Jodo Yatra in Maharashtra)
हनुमंत शिनगारे आणि सखुबाई शिनगारे यांचं १५ जणांचं कुटुंब नांदेड-देगलूर रस्त्यावर बिजूर इथं राहतं. यात्रा जेव्हा खतगावहून निघाली, त्यावेळी काही लोक घरी आले आणि राहुल गांधी घरी येणार आहेत स्वच्छता करुन ठेवा असं सांगितलं. मात्र, असं सांगायला आलेल्या लोकांनीच अंगणातील म्हशी बाहेर बांधायला, स्वच्छता करायला मदत केली. त्यानंतर चहा आणि कांदाभजे करण्यास सांगितलं. यावेळी शिनगारे यांची नात उमा हीनं राहुल गांधींसाठी नाष्टा बनवला.
राहुल गांधींनी घरी दिली भेट
खासदार राहुल गांधी सायंकाळी ५.४५ला शिनगारेंच्या घरी आले. तत्पूर्वी त्यांनी बॅरलमधील पाणी काढून हात धुतला आणि थेट गच्चीवर जाऊन निवडक सहकाऱ्यांसोबत बसले, तिथेच त्यांनी भजे आणि चहाचा पाहुणचार घेतला. १५ मिनिटे तिथं बसल्यानंतर अंगणात येऊन दहा मिनिटं पुन्हा शिनगारे कुटुंबियांशी गप्पा मारल्या. सध्या शेतात काय लावलंय? शेती कोरडवाहू की पाण्याची? असे प्रश्न त्यांनी शिनगारे कुटुंबियांना विचारले. यावर या कुटुंबातील सदस्यांनी यंदा सोयाबीन, तूर घेतल्याचं राहुल गांधींना सांगितलं पण परतीच्या पावसानं सोयाबीन वाया गेल्याचंही त्यांनी सांगितलं. राहुल गांधी घरासमोरुन जाणार आहेत, त्यांना पहावं यासाठी शिनगारे यांची एक नात तमनूर ते कपीलधार ही पदयात्रा पूर्ण करुन लवकर घरी आली होती.
लहानग्यांना दिली चॉकलेट, बिस्किटं
अचानक राहुल गांधी घरी आले. कुटुंबियांशी बोलले, त्यानंतर अंगणातील बाजेवर बसून त्यांनी फोटो काढले. घरातील लहान मुलांना चॉकलेट आणि बिस्कीटं दिली. शेतकरी कुटुंबानेही कुंकू, विभूती लावत शॉल देऊन यावेळी राहुल गांधींचं स्वागत केलं. देशाचे मोठे नेते राहुल गांधी आमच्या घरात येऊन गेले. मलाच काय तर, सगळ्या कुटुंबियांना खूप आनंद झाला, अशी प्रतिक्रिया हनुमंत शिनगारे यांनी यावेळी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.