Rajasthan Election: भाजपच्या पहिल्या यादीनंतर पक्षात उसळलेला असंतोष शमविण्याचा प्रयत्न दुसऱ्या यादीत दिसून आला. या यादीत एकाही नव्या खासदाराचा समावेश नाही. माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनाही या ८३ जणांच्या यादीत स्थान मिळाले आहे.
९ ऑक्टोबरला भाजपने पहिली ४१ जणांची यादी जाहीर केली होती. यात सात खासदारांचा समावेश होता, तसेच विद्यमान आमदारांची उमेदवारी कापल्याने राजस्थानमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष उफाळला होता.
खासदार राज्यवर्धन राठोड व देवजी पटेल यांच्या विरोधात भाजपच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखविले होते. हा असंतोष थांबविण्याचा प्रयत्न भाजपने दुसऱ्या यादीत केला आहे. आतापर्यंत भाजपने १२४ उमेदवारांची नावे जाहीर केली असून आता केवळ ७६ जणांची नावे जाहीर होणे बाकी आहे.
आजच्या भाजपच्या यादीत प्रामुख्याने माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना त्यांचा परंपरागत झालारपाटन मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी दिली आहे. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांना अंबेर मतदारसंघातून मैदानात उतरविले आहे. काँग्रेसमधून नुकत्याच भाजपत दाखल झालेल्या ज्योती मिर्धा यांना नागौर मतदारसंघातून संधी मिळाली आहे.
विशेष म्हणजे पृथ्वीराज चौहान यांचे वंशज मानले जाणारे कुंवर विश्वराज सिंह मेवाड यांना नाथद्वारा या मतदारसंघातून भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. या मतदारसंघातून काँग्रेसचे नेते व राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष सी. पी. जोशी यांच्याशी त्यांचा सामना रंगणार आहे.
पहिल्या यादीत वसुंधरा राजे समर्थकांना दूर ठेवले होते. परंतु जे. पी. नड्डा यांनी दोन वेळा राजस्थान दौरा करून पक्षातील मतभेद मिटविण्याचा प्रयत्न केला. माजी मंत्री अनिता भदेल, प्रताप सिंग सिंघवी, श्रीचंद कृपलानी, ओटाराम देवासी या माजी मंत्री आणि वसुंधरा समर्थकांना या यादीत स्थान मिळाले. विशेष म्हणजे वसुंधरा राजे यांचा पर्याय म्हणून समोर आणण्यात येत असलेल्या खासदार दिया कुमारी यांना विद्याधरनगर मतदारसंघातून उमेदवारी दिली होती.
या मतदारसंघातील आमदार नरपत सिंग राजवी यांची उमेदवारी कापण्यात आली होती. परंतु त्यांची बंडखोरी शमविण्यासाठी त्यांना आता चितौडगड मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे या यादीत एकाही खासदारांचा समावेश नाही. पहिल्या ४१ जणांच्या यादीत ७ खासदारांचा समावेश होता. केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल व गजेंद्र शेखावत यांना रणांगणात उतरविले जाईल, असे बोलले जात होते. परंतु या दोन्ही नेत्यांचा दुसऱ्या यादीत समावेश केलेला नाही.
धौलपूर मतदारसंघातून मात्र माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या समर्थक आमदार शोभाराणी मौर्या यांची उमेदवारी कापून त्या जागी डॉ. शिवचरण कुशवाह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ही यादी जाहीर होण्यापूर्वी आमदार शोभाराणी मौर्या यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. या यादीत १० महिलांना उमेदवारी मिळाली आहे. तसेच अनुसूचित जातीचे १५ तर अनुसूचित जमातीच्या १० उमेदवारांचा समावेश केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.