मेजर ध्यानचंद  sakal
देश

राजीव गांधी, खेलरत्न आणि मेजर ध्यानचंद

‘राजीव गांधी खेलरत्न पारितोषिका’चे नाव बदलून ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न’ केले गेले.

आ. श्री. केतकर

‘राजीव गांधी खेलरत्न पारितोषिका’चे नाव बदलून ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न’ केले गेले. खरेतर मेजर ध्यानचंद यांच्या कर्तृत्वाची दखल म्हणून त्यांना ‘भारतरत्न’ द्यावे, अशी मागणी आहे. या बदलाने साधले काय, हा प्रश्‍न आहे.

नुकत्याच झालेल्या टोकियो ऑलिंपिकमध्ये भारतीय खेळाडूंनी एकूण सात पदके मिळवली, त्यातील एक हॉकीमधील कांस्यपदक. भारत हॉकीत तिसऱ्या क्रमांकावर होता. गेल्या अनेक ऑलिंपिकमधील पदकांचा दुष्काळ संपल्यामुळे देशवासीयांना समाधान वाटले. अगदी मीराबाई चानूने रौप्यपदक मिळवून भारताच्या ऑलिंपिक मोहिमेची सुरुवात केली आणि नीरज चोप्राच्या सुवर्णपदकाने त्यावर कळस चढवला, ही बाब मोलाची होती. तरीही हॉकीबाबतचे प्रेम अचानक उफाळून आले. भारताने १९२८ ते १९५६ या काळात सलग सहा... नंतर १९६४ आणि १९८० मध्ये याप्रमाणे ऑलिंपिक हॉकीत एकूण आठ सुवर्णपदके मिळवली. १९७५मध्ये भारताने विश्वकरंडक हॉकी स्पर्धा जिंकली. मात्र त्या विश्वविजयानंतर हॉकीला जी घसरण लागली, तिच्यामुळे लोकांचे या खेळाकडे दुर्लक्षच झाले. बलाढ्य संघांच्या अनुपस्थितीने मॉस्कोतील सुवर्णपदक काहीसे दिलासादायक होते. पण पुन्हा चांगले दिवस येण्याच्या दृष्टीने ते मृगजळच ठरले. कारण घसरण चालूच राहिली. बीजिंग ऑलिंपिकसाठी आपला हॉकी संघ पात्रही ठरला नव्हता. यामुळेच यंदाच्या या तिसऱ्या क्रमांकाने खेळात पुन्हा चैतन्य यावे, असे सर्वांनाच वाटते. यासाठी प्रयत्नही व्हायला हवेत.

दाव्यात तथ्य कितपत?

खेलरत्न हे भारतीय क्रीडा जगतातील सर्वोच्च पारितोषिक. त्याला राजीव गांधी यांचे नाव होते. आता हॉकीतील सर्वश्रेष्ठ खेळाडू मेजर ध्यानचंद यांचे नाव त्याला मिळाले आहे. यापुढे ते ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पारितोषिक’ असे ओळखले जाईल. ही बाब वरवर सुखावणारी वाटते. पण खरोखरच तशी आहे का? केवळ नावडत्या पुढाऱ्याचे नाव बदलणे एवढाच हेतू त्यामागे दिसतो. तरीही आपण दीर्घकाळ ध्यानचंद यांच्यावरचा अन्याय दूर केल्याचे सांगितले जातंय, त्यात कितपत तथ्य आहे? चटकन लक्षात येणारी गोष्ट म्हणजे कुणाला हे पारितोषिक जाहीर झाले, तर सर्व माध्यमांतून काय सांगितले वा लिहिले जाईल, तर अमुक खेळाडूला खेलरत्न. शिफारस केली गेली तरी अमुक खेळाडूची खेलरत्नसाठी शिफारस, अशाच बातम्या येत. राजीव गांधी खेलरत्न पारितोषिकासाठी शिफारस असे काही वाचल्याचे मला तरी आठवत नाही. बहुधा कुणालाच आठवणार नाही. मग केवळ ध्यानचंद खेलरत्न पारितोषिक म्हणून नामकरण करून काय होणार? ध्यानचंद यांची स्मृती त्याने कायम कशी राहणार?

आश्चर्यकारक योगायोग!

हॉकीचे जादूगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ध्यानचंद यांचे कर्तृत्व, त्यांनी भारतीय हॉकीला जागतिक कीर्ती मिळवून देण्यासाठी जे काही केले, त्याचे मोल करता येणार नाही, हे कुणीही मान्य करील. ऑलिंपिक हॉकीमध्ये ते खेळत असताना भारतीय संघाने लागोपाठ तीन- १९२८ अॅमस्टरडॅम, १९३२- लॉस एंजेलिस आणि १९३६- बर्लिन, ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदके मिळवली होती. पहिल्या सुवर्ण पदकानंतर त्यांना बढती देण्यात आली होती. पण नंतरच्या ऑलिंपिकसाठी निवड चाचणीत सहभागासाठी त्यांना रजाही दिलेली नव्हती, तरी त्यांचा संघात समावेश करण्यात आला होता. बर्लिन ऑलिंपिकमध्ये ते संघाचे कर्णधार होते. भारताने अंतिम सामन्यात यजमान संघाचा ८-१ असा पराभव केला होता. तो दिवस १५ ऑगस्ट होता. बारा वर्षांनंतर त्याच दिवशी भारत स्वतंत्र झाला, हा आश्चर्यकारक योगायोग!

चेंडूवर त्यांचा असा ताबा असे की, चेंडू त्यांच्या स्टिकला चिकटून बसतो की काय, असे वाटून अनेकदा त्यांची स्टिकही तपासली गेली होती, तर कधी त्यांना स्टिक बदलायला सांगण्यात आले. त्या वेळी त्यांचा एक सहकारी म्हणाला होता : त्याच्या हातात आजोबाची काठी दिली तरीही तो एवढाच चांगला खेळेल! चेंडू एकदा त्यांच्याकडे गेला की त्याचा ताबा प्रतिस्पर्ध्याला मिळणे अवघड नाही, तर अशक्यच असे. याहून त्यांची महती काय सांगणार?

ध्यानचंद १९५६ मध्ये लष्करातून निवृत्त झाले, तेव्हा मेजर होते. त्याचवर्षी भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ हा मानाचा किताब दिला होता. भारत हॉकीत अजिंक्यच होता. पण कालांतराने हॉकीला वाईट दिवस आले आणि ध्यानचंद यांची थोरवी सर्वांना उमगली. २००८ मध्ये बीजिंग ऑलिंपिकला भारताचा संघ पात्रही ठरला नाही, तेव्हा त्यांच्या कर्तृत्वाला साजेसा त्यांचा सन्मान झाला नाही, अशी भावना लोकांच्या मनात निर्माण झाली. त्यामुळे त्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च सन्मान द्यावा, अशी मागणी होऊ लागली. कदाचित त्यामुळे तरी हॉकीला चांगले दिवस येतील, अशी आशा लोकांना वाटत असावी. अनेक स्तरांतल्या या मागणीला वारंवार प्रसिद्धीही मिळत होती. २०१४ मधील सत्तांतरानंतरही मागणीचा जोर कायम होता, नव्हे वाढला होता. पण मागणी ‘भारतरत्न’ची होती. खेलरत्नची नाही!

पण विद्यमान सत्ताधीशांना म्हणे देशभरातून पत्रे आली, संदेश आले म्हणून त्यांनी ‘खेलरत्न’ पारितोषिकाला असलेले राजीव गांधी यांचे नाव बदलून ध्यानचंद यांचे नाव दिले. प्रत्यक्षात अशी पत्रे वा संदेश त्यांना पाठवले गेल्याची वा कुणी जाणकारांनी तशी मागणी केल्याची बातमीही कधी कुठे प्रसिद्ध झाली नव्हती. मग हा निर्णय का घेतला असावा? केवळ एका घराण्याचे नाव देशाच्या इतिहासातून पुसून टाकण्याच्या मोहिमेचाच हा भाग आहे की ध्यानचंद यांना ‘भारतरत्न’ द्यायचाच नाहीये काय, असा संशय व्यक्त होतो आहे. त्यात तथ्य असावे, अशी लोकभावना आहे.

ध्यानचंद करंडक स्पर्धा घ्यावी!

खरे तर ध्यानचंद यांचे नाव कायम राहावे अशी इच्छा असेल, तर त्यांच्याच नावाने एखादे मोठे पारितोषिक ठेवावे. जसे अर्जुन पारितोषिक वा द्रोणाचार्य पारितोषिक तसे ध्यानचंद पारितोषिक! त्यामुळेच त्यांचे नाव व सन्मान कायम राहील. आणखी पर्याय आहे. राष्ट्रीय हॉकी स्पर्धा ही ध्यानचंद करंडक स्पर्धा असायला हवी. (जशी क्रिकेटमध्ये रणजी करंडक आहे.) तसे केल्यास देशात हॉकी खेळली जाईल तोवर ध्यानचंद यांचे नाव राहील!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT