धनबाद (झारखंड) - झारखंडमधील धनबाद येथील सरस्वती देवी या २२ जानेवारीला तब्बल ३२ वर्षांनी त्यांचे मौनव्रत सोडणार आहेत. अयोध्येमध्ये सहा डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडल्यानंतर सरस्वती देवी यांनी मौनव्रत धारण केले होते.
रामजन्मभूमीवर राममंदिर उभे राहिल्याशिवाय मौनव्रत सोडणार नाही असा संकल्प सरस्वती देवी यांनी केला होता. त्यांच्या या अनोख्या व्रतामुळे त्या अयोध्येत ‘मौनी माता’ या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या.
सरस्वती देवी या त्यांच्या कुटुंबीयांशी सांकेतिक भाषेतच बोलत असत. त्या दररोज संध्याकाळी तासाभरासाठी त्यांचे मौन सोडून संवाद साधत असत. दरम्यान, अयोध्येमध्ये २०२० मध्ये राममंदिराच्या पायाभरणीचा समारंभ झाल्यानंतर त्यांनी संध्याकाळी तासभर संवाद साधणेही बंद केले आहे.
राम जन्मभूमी आंदोलनातील प्रमुख संत महंत नृत्यगोपाल दास यांच्या शिष्यांच्या वतीने सरस्वती देवी यांना अयोध्येतील कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे. सरस्वती देवी या अयोध्येत दाखल झाल्या असून २२ तारखेला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर त्या त्यांचे मौनव्रत सोडणार आहेत.
रामभक्तीसाठी आयुष्य समर्पित
मौनी माता यांच्या पतीचे १९८६मध्ये निधन झाल्यानंतर त्यांनी त्यांचे सर्व आयुष्य रामभक्तीसाठी समर्पित केले. चार मुली आणि चार मुलगे असलेल्या मौनी माता या त्यांच्या पतीच्या निधनानंतर अधिककाळा तीर्थाटनामध्येच व्यतीत करतात, असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. त्याचप्रमाणे त्यांनी २००१मध्ये चित्रकूटमध्ये सात महिन्यांचे अनुष्ठान केले आहे.
सरस्वती देवी या रोज पहाटे चार वाजता उठून सहा ते सात तास ध्यान करतात, त्याचप्रमाणे त्या दररोज सायंआरती नंतर रामायण आणि गीता यांसह विविध धार्मिक ग्रंथांचे अध्ययन करतात. त्या दिवसातून एकदाच भोजन करतात असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.
त्या आमच्याशी सांकेतिक भाषेत हातवारे करूनच बोलतात. बहुतांशवेळा त्या काय म्हणतात हे आम्हाला समजते. परंतु, त्या बरेचवेळा कागदावरती काही गुंतागुंतीची वाक्ये लिहितात त्याचा अर्थ मात्र आम्हाला लागत नाही.
- इनू अग्रवाल, सरस्वती देवी यांची सून
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.